आझम, मुख्तारवरील कारवाईने अखिलेश यांना पोटशूळ

27 Jan 2022 21:25:20
- अमित शाह यांची टीका
 
आग्रा, 
Amit Shah : उत्तरप्रदेशातील गुंड प्रवृत्तीचे राजकारणी आझम खान आणि मुख्तार अन्सारीवर कारवाईचा फास आवळण्यात आल्यानंतर अखिलेश यादव यांना पोटशूळ उठला, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गुरुवारी वृंदावन येथे येथील श्रीकृष्ण मंदिरात पूजा केल्यानंतर संतांसोबत निवडणूक बैठकीत केली. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन करण्यासाठी मी येथे आलो आहे, असे अमित शाह Amit Shah यांनी श्रीजी वाटिका येथे संतांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले. कोरोना निर्बंधांमुळे लहान लहान बैठका घ्याव्या लागत आहेत. त्यामुळेच आपल्यासोबत चर्चा करण्याची योजना आखली. मथुरा, वृंदावन आणि गोवर्धन देशभरातील लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. याच क्षेत्राने कान्हाला श्रीकृष्ण बनवले. अत्याचारी कंसाचा वधही येथेच झाला. येथे असुरांचा संहार करून धर्माची स्थापना करण्यात आली, असे अमित शाह यांनी सांगितले.
 
 
Amit shah
 
येथे भाजपा उमेदवाराचा विजय होतो. त्यामुळे मी येथील नागरिकांचा आभारी आहे. उत्तरप्रदेशातील निवडणूक भारताचा निर्णय घेते. नरेंद्र मोदी उत्तरप्रदेशातूनच देशाचे पंतप्रधान झाले. उत्तरप्रदेशात दीर्घकाळ सपा, बसपा आणि काँग्रेसचे सरकार होते. त्यांच्या कार्यकाळात उत्तरप्रदेशच्या विकासाचे स्वप्न पूर्ण झाले नाही. मोदी आणि योगी सत्तेत आल्यावर या राज्याचा विकास झाला. जातीयवाद आणि परिवारवाद राजकारणात असावे का, असा प्रश्न अमित शाह Amit Shah यांनी यावेळी उपस्थित केला. उत्तरप्रदेशात यापूर्वी भ‘ष्टाचार आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात होती. योगी आदित्यनाथ यांच्यावर कुणीही भ‘ष्टाचाराचा आरोप करू शकत नाही. उत्तरप्रदेशात भाजपाचे सरकार आल्यानंतर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शरणागती पत्करण्यास सुरुवात केली, असे शाह यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0