धुक्याचा परिणाम रब्बीच्या पिकांवर

- हरभरा संपण्याच्या स्थितीत

    27-Jan-2022
Total Views |
तभा वृत्तसेवा  
शिरखेड,  
rabi crops मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वत्र पहाटे धुके पसरत असल्यामुळे त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होताना दिसून येत आहे. या बदलत्या वातावरणामुळे गहू, हरभरा व इतर रब्बी पिके संकटात सापडली आहेत, तर दुसरीकडे पिकांवर अळ्यांचे आक्रमण होतांना दिसून येत आहे.
  
rabi crops
 
 
शेतकर्‍यांनी खरिपातील सोयाबीन व इतर पिके काढणीनंतर गहू, हरभरा, कांदा आदी पिकांची मोठ्या उत्साहाने लागवड केली. मात्र वातावरणातील बदलामुळे ही पिके धोक्यात येत आहेत. या बदलामुळे सध्या हरभरा पिवळा पडू लागला आहे. त्याची वाढही खुंटली आहे. रब्बी पिकांची लागवड करून सर्व पिके शेतात हिरवीगार दिसत होती. अचानक अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतातील पिकांना चांगले झोडपून काढले होते. त्यानंतर सर्व काही सुरळीत होईल, अशी आशा धरून शेतकर्‍यांनी रब्बी हंगाम वाचविण्यासाठी आपले प्रयत्न सुरूच ठेवले.
 
 
 
शेतकर्‍यांनी खरीपनंतर जास्त उत्पादन होण्याच्या उद्देशाने हरभरा व गव्हाची पेरणी केली. मात्र वातावरण साथ देत नसल्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली. ऊन सावलीच्या खेळात गहू व हरभरा पिवळा पडतो आहे. खरिपात झालेले नुकसान रब्बीमध्ये भरून निघेल या आशेपोटी शेतकर्‍यांनी रब्बी हंगाम वाचविण्यासाठी त्यावर महागडे कीटकनाशक फवारणे सुरू केले आहे. मात्र पर्यावरण बदलाने हंगाम अडचणीत येत असून कृषी विभागाचा कुठलाही अधिकारी शिरखेड परिसरात फिरताना दिसत नाही.
 
 
 
याबाबत बोलताना शानवाजपूरचे शेतकरी अमोल रंधवे म्हणाले की, हरभरा सध्या फुले येण्याच्या अवस्थेत आहे. त्यावर धुक्याचा विपरित परिणाम होत आहे. वातावरणात ऐनवेळी झालेल्या बदलामुळे गहू, हरभरा पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे व धुक्यामुळे नुकसान होत आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.