किशोर उपाध्याय भाजपात दाखल, उमेदवारीही पदरात

    27-Jan-2022
Total Views |
डेहराडून, 
उत्तराखंड काँग्रेसने बरखास्त केलेले माजी प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्याय Kishore Upadhyay यांनी भाजपात प्रवेश केला असून, पक्षाने त्यांना टिहरी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने किशोर उपाध्याय यांना पक्षविरोधी कारवाया केल्याने 6 वर्षांच्या कालावधीसाठी पक्षातून बरखास्त केले होते. त्यापूर्वी त्यांनी भाजपा नेत्यांच्या भेटी घेतल्याने प्रदेश समन्वय समिती अध्यक्षासह पक्षाच्या सर्व पदांवरून दूर सारण्यात आले. या संदर्भात प्रदेश प्रभारी देवेंद्र यादव यांनी किशोर उपाध्याय यांना पत्र पाठवत भाजपा सरकारविरोधात काँग्रेसचा लढा कमकुवत करण्याचा आरोप केला होता.
 

upadhyay 
 
दुसरीकडे ओम गोपाल यांनी भाजपाचा राजीनामा देत काँग्रेसचे सदस्यत्व घेतले आहे. त्यांना नरेंद्रनगर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. तर, मागील दिवसांत काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या सरिता आर्य यांच्या जागी ज्योती रौतेला यांना प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले आहे.
 
 
हरीश रावत यांच्या मुलीला उमेदवारी
काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार हरीश रावत यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यास विरोध होत असतानाच, नव्या यादीत हरिद्वार ग्रामीण मतदारसंघातून त्यांची मुलगी अनुपमा रावत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यातून हरीश रावत यांची नाराजी दूर करण्यात येत असल्याचे राजकीय जाणकारांनी म्हटले आहे. पक्षात झालेल्या नाटकीय घडामोडीत एका रात्रीतून यादी बदलवण्यात आली असून, रावत यांचे राजकीय शिष्य तसेच माजी आमदार रणजितसिंह रावत यांना रामनगरऐवजी सल्ट मतदारसंघ देण्यात आला आहे तर, हरीश रावत यांना लालकुं आ मतदारसंघात संधी मिळाली. केंद्रातून राज्यात परतलेल्या हरीश रावत यांनी 2017 मध्ये हरिद्वार ग्रामीण आणि किच्चा अशा दोन ठिकाणी निवडणूक लढवली. परंतु, पराभूत झाले. 1980 ते 1999 पर्यंत त्यांनी अल्मोडा लोकसभा क्षेत्राचे सतत पाचवेळा प्रतिनिधित्व केले. 2009 मध्ये हरिद्वार येथून जिंकले तर, 2019 मध्ये अजय भट्ट यांनी नैनीताल येथून पराभूत केले.