उंबर्डा बाजार,
नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून ग्राम दुघोरा Social Forestry Department सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने करण्यात आलेली वृक्ष लागवडीला योग्य संगोपना अभावी अखेर एक घरघर लागली असतांना या वृक्ष लागवडीच्या संगोपनाकडे सामाजिक वनीकरण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होतांना दिसुन येत आहे.
सविस्तर असे की सामाजीक वनीकरण विभाग वाशीम परिक्षेत्र कारंजा लाड यांच्या मार्फत ग्राम दुघोरा येथील गट क्र.50 मधील 10 हेक्टर जमीनीवर जुन 2021 मध्ये नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून 11 हजार 110 विविध प्रजातीच्या झाडांची लाखो रुपये खर्च करून लागवड करण्यात आली. मात्र, सदर लागवड करण्यात आलेल्या झाडांच्या संगोपनासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याने जवळपास 60 टक्के नष्ट झाली असून, झाडांना पाणी देणे तर सोडा लागवड करण्यात आलेल्या झाडांच्या सभोवतालचा केर कचरा सुध्दा कापण्यात आलेला नाही. महत्वाची बाब म्हणजे लागवडीसाठी खोदण्यात आलेल्या अनेक खड्ड्यामध्ये वृक्ष लागवड करण्यात आलेली नसतांना हजारो रूपयांची देयके काढण्यात आल्याची जनमानसात जोरदार चर्चा सुरू आहे.
विशेष महत्त्वाचे म्हणजे 10 हेक्टर जमीनीवर 11 हजार 110 झाडे लागवड करण्यात आल्याची नामफलकावर नमुद असतांना प्रत्यक्षात मात्र एकच मजुर गेल्या सात - आठ महिन्यापासून या कामावर देखरेख करीत असल्याचे दिसुन येत असल्याने या कामावर मजुरीच्या नावावर मोठ्या प्रमाणावर हेराफेरी होत असल्याची माहीती असतांना सुध्दा सामाजिक वनीकरण विभागाच्या वरीष्ठ अधिकार्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होतांना दिसुन येत आहे. तरी सामाजिक वनीकरण विभागाच्या वरीष्ठ अधिकार्यांनी ग्राम दुघोरा येथील गट क्र. 50 मधील 10 हेक्टर जमिनीवर लागवड करण्यात आलेल्या 11 हजार 110 झाडांची प्रत्यक्ष पाहणी करून दोषींवर कडक कारवाई ची मागणी मागणी जोर धरीत आहे.