लढण्याचे मार्ग संवैधानिकच हवेत!

    28-Jan-2022
Total Views |
अग्रलेख
एकीकडे विद्यार्थी Student चळवळ किंवा तरुणांच्या चळवळी थंडावल्याची चर्चा होत असताना अलीकडच्या काळात तरुणांचे समूह अचानक हिंसक झाल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ असो वा तत्सम काही संस्थांमधील घटना असोत, तरुण मंडळी एकदम अन्याय-अन्याय ओरडत उठतात आणि हिंसक होतात. हे चित्र गेल्या काही वर्षांमध्ये नव्याने दिसायला लागले आहे. अन्यायाविरुद्ध पेटून उठणे किंवा अन्यायाचा प्रतिकार करणे चुकीचे नाही. पण, अन्याय झाला म्हणून मी साऱ्या दुनियेला आगच लावून टाकतो, हा पवित्रा कदापि समर्थनीय ठरू शकत नाही. मसालेबाज हिंदी चित्रपटात पूर्वी अशी मारामारी-हिंसा असायची.
 
bihar-rail-result.jpg
 
एक हिरो असायचा. त्याच्यावर काहीतरी अन्याय झालेला असायचा. तो सुडाने पेटून उठायचा आणि प्रचंड हिंसाचार करायचा. खलनायकाला त्याच्या खानदानीसकट संपवायचा. मधल्या वेळेत नायिकेसोबत झाडाभोवती नाच-गाणे करायचा. पण, त्यातही त्याचा संताप कधीतरी दिसायचाच. पडद्यावर पाहताना ते तसे बरे वाटते. पडद्यावरच्या हिरोचे ‘अँग्री यंग मॅन' रूप अनेकांना भावते. कारण त्यातून आपल्या भावनांचा निचरा होतो. जे आपण करू शकत नाही, परंतु जे व्हायला हवे, असे आपल्याला वाटते, ते आपल्याला प्रेक्षक म्हणून पाहायला मिळणे हा दिलाशाचा भाग असतो. कारण त्यातून आपल्याला हलके वाटते, आपल्या भावनांना वाट मोकळी होते. अ‍ॅरिस्टॉटलच्या पोएटिक्समध्ये यालाच ‘कथार्सिस' असे नाव आहे. पण, रंगमंचावरच्या नाट्यातून किंवा चित्रपटातून प्राप्त होणाऱ्या निचऱ्याचा लाभ प्रत्यक्षातील जाळपोळ किंवा हिंसाचारातून मिळत नाही.
 
 
झाली तर त्यात हानीच होते. त्यामुळे या घटनांमुळे ज्यांना आनंदाची उकळी फुटलेली दिसते आहे, त्यांना निचऱ्यापेक्षा विकृतीत आनंद शोधण्याची सवय आहे, असेच म्हटले पाहिजे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा किंवा उमेदवारांवर Student अन्याय केला जात असल्याचा आरोप करून बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये तरुणांनी केलेला हिंसाचार असाच हानिकारक आणि चिंताजनक आहे. त्यामुळेच विद्याथ्र्यांनी त्यांचा राग व्यक्त केल्याचे कुणाला समाधान मिळत असेल किंवा झाले ते बरे झाले असे कुणाला वाटत असेल, तर तेही चिंताजनक म्हटले पाहिजे. लोकशाही व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचा हिंसाचार समर्थनीय ठरू शकत नाही आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांचे-Student उमेदवारांचे आरोप अगदी खरे असतील तरी त्यांचा हिंसाचार समर्थनीय ठरू शकत नाही. फक्त कुणीतरी सांगतो, उचकावतो म्हणून हे कथित उमेदवार Student प्रयागराजमध्ये रेल्वे रोखण्याचा प्रयत्न करतात, जेहानाबादमध्ये पंतप्रधानांची प्रतिमा जाळतात, पाटणा-गया मार्गावर तासन्तास गाड्या अडवून धरतात आणि बिहारमध्ये रेल्वेला आग लावतात, हे सारे प्रकार निषेधार्ह आहेत.
 
आपण सध्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करतो आहोत. २६ जानेवारीला गणराज्य दिन होता. त्याच्या मागे-पुढे या हिंसाचाराच्या घटना घडतात. त्यामुळे या घटनाक्रमाच्या मागे कुणीतरी आहे, अशी शंकाही येते. उत्तरप्रदेश, उत्तराखंडमध्ये यंदा निवडणुका आहेत. वातावरण तापलेले आहे. भाजपाच्या विरोधात वातावरण निर्मिती करणे सुरू आहे. त्यामुळे अशी शंका घेण्यास वाव आहे. विद्यार्थ्यांवर Student अन्याय झाल्याची आणि त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी वक्तव्ये विरोधकांनी केली. ती होणारच आहेत. चौकशी समिती गठित झाली आहे. सरकारने परीक्षेची प्रक्रिया थांबविली आहे. विद्यार्थ्यांवरील Student कारवाईदरम्यान अतिरेक करणाऱ्या पोलिसांवर कारवाईदेखील झाली आहे.
 
त्यासंदर्भातील औपचारिक घोषणा झालेल्या आहेत. पण, मुद्दा एवढ्यावर संपत नाही. यापूर्वी अनेक परीक्षांमध्ये घोटाळे, गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले. काही सिद्ध झाले, काही झाले नाहीत. याचा अर्थ सदासर्वकाळ सारे काही व्यवस्थित चालते असे नव्हे. माणसं आहेत, तिथे लोभ असणार आणि लोभापोटी घोटाळे होतात, हेही वास्तव आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने सुमारे ३५ हजार जागांसाठी जाहिरात काढली होती. अर्ज आले तब्बल सव्वा कोटी. ८० लाखांवर विद्यार्थ्यांनी Student परीक्षा दिल्या. २०१९ मध्ये पदभरतीची जी अधिसूचना निघाली होती, तीत केवळ एकच परीक्षा म्हटलेली असताना तिचा दुसरा टप्पा जाहीर करणे, हा आमच्यावर अन्याय आहे, असे उमेदवारांचे म्हणणे. मात्र, त्याचवेळी परीक्षेचा दुसरा टप्पा अधिसूचनेत स्पष्ट केलेला होता, असे रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे. चौकशीअंती यातले खरे काय ते उघडकीस येईलच. अन्याय झाला असेल, कुणी घपला केला असेल, गडबड केली असेल तरी ते उघडकीस येणार आहे. विद्यार्थ्यांचे Student म्हणणे ऐकून घेण्यासाठी सरकारने स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. परंतु, विद्यार्थी Student किंवा उमेदवारांच्या संदर्भात याहून अधिक काही आक्रित घडले असे गृहीत धरले, तरी हिंसाचारातून त्यावरचा तोडगा निघणार नाही. निघू शकत नाही.
 
हिंसाचार करण्यासाठी, जाळपोळ करण्यासाठी किंवा कुणाच्या जिवावर उठण्यासाठी ही शत्रुराष्ट्राशी चाललेली लढाई नाही किंवा हे स्वातंत्र्याचे युद्धही नाही की, ज्यासाठी जीव देण्या-घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. आंदोलनाच्या संदर्भात नेहमी एक म्हटले जाते. ते असे की, आंदोलन सुरू करणे सोपे आहे. त्याला योग्य वळण देणे आणि त्याचा तार्किक शेवट करणे हे सर्वात कठीण काम आहे. हे आंदोलन ठरवून झाले असेल तर ते नियोजनात फसले. तसे झाले नसेल तर ते परिणाम साधू शकले नाही. प्रयागराजमध्ये दोन-चार पोलिसांच्या हडेलहप्पीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांवर Student अन्याय झाल्याच्या आवया उठवण्यात आल्या आणि नंतर हिंसाचार-जाळपोळ सुरू झाली. उत्तर भारतातील रेल्वे सेवा त्यामुळे विस्कळीत झाली. आता हे ज्यांनी कुणी केले, त्या साऱ्यांवर गुन्हे नोंदवले जाणार. त्यांच्यावर खटले चालणार.
 
हे सारे लांबत गेले तर भविष्यातील परीक्षेच्या प्रक्रियेतून अनेक उमेदवार आपसूक बाहेर फेकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे अशांचे भविष्य आपसूक नासले. याचा अर्थ असा की, स्वतःवर अन्याय झाला असेल तरी नुसते त्यासाठी पेटून उठणे किंवा पेटवणे हा काही मार्ग असू शकत नाही. ते सिनेमा-नाटकात शोभत असेलही. परंतु, तसे प्रत्यक्षात घडले. आपण आग लावणाऱ्यांची छायाचित्रे पाहिली तरी त्यांचा पवित्रा काय होता, हे लक्षात येते. बेकारीचा प्रश्न फक्त बिहार किंवा उत्तरप्रदेशपुरता मर्यादित नाही. तो साऱ्या देशाचा प्रश्न आहे. झालेच तर तो साऱ्या जगाचा प्रश्न आहे. अर्थकारणातील उलाढालींवर रोजगाराच्या संधी ठरत असतात. त्यातही रेल्वेतून नियमितपणे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. त्यात नेहमीच उत्तर भारतीयांची संख्या मोठी असते. तरीही उत्तर भारतात हे घडत असेल तर त्यामागे केवळ विद्यार्थी Student आहेत, असे समजून चालणार नाही. या घटनांमागील कार्यकारणभाव, त्यामागचे हात आणि पुढे दिसणारे मोहरे या सर्वांना चौकशीच्या जाळ्यात खेचले पाहिजे. कुणीतरी सोशल मीडियावरून उमेदवारांना चिथावले म्हणतात. त्याचाही शोध घेतला पाहिजे आणि त्याच्या मागे असलेल्या प्रवृत्तीही हुडकून काढल्या पाहिजेत.
 
संघटित होण्याचा, आंदोलन करण्याचा आणि अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार आपल्या सर्वांना भारताचे नागरिक म्हणून मिळालेलाच आहे. परंतु, या सर्वांना शांतता आणि संयमाची पूर्व अट आहे. ती न पाळता असे काही केले जाते, तेव्हा त्याला कायदेभंग म्हणतात आणि त्यावर कारवाई होते. ती कारवाई न्याय्य असते. कारण, अन्याय आक्षेपार्ह असेल तर हिंसाचारदेखील निषिद्ध असतो. परंतु, सध्या काही प्रवृत्ती संधी मिळेल तिथे हिंसाचार किंवा कायदेबाह्य कामांना पाठबळ देताना दिसतात. त्यामागे राजकीय हेतू असतो, हे अनेकवार उघडकीस आले आहे.
 
उत्तरप्रदेश आणि बिहारातील ताज्या जाळपोळ-हिंसाचाराच्या घटनांच्या अनुषंगाने काही व्यक्तींची नावे चर्चेत आली आहेत. त्यांचे बोलविते आणि करविते धनी कोण हे आज ना उद्या उघड होणार आहे. आपण यातून हा धडा घेतला पाहिजे की, आपण स्वीकारलेली व्यवस्था पूर्णतः निर्दोष नसली, तरी ती कल्याणकारी आहे. तीत अन्याय झाल्यास दाद मागण्याची व्यवस्था आहे. मात्र, दाद मागण्याचे मार्ग संवैधानिकच असायला हवेत. त्या मार्गापासून आपण दूर जातो तेव्हा देशाचे, प्रदेशाचे, त्या भागाच्या प्रतिमेचे तर नुकसान होतेच; शिवाय संबंधित व्यक्तींचेही होते, हेच या प्रकरणात घडले. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने प्रयत्न केलेच पाहिजेत; पण आपण कुणाच्या तरी हातले बाहुले बनून आपले सर्वस्व पणाला लावायला निघालो नाही ना, याची खातरजमा तरुण पिढीनेदेखील प्रत्येक पावलागणिक करून घेतली पाहिजे.