नारद विदित- धर्मलक्षणे !

    28-Jan-2022
Total Views |
जीवन जिज्ञासा 
- प्राचार्य प्र. श्री. डोरले
 
भारतीय जीवन पद्धतीच्या विविध अंगांना पोषक आणि धर्म Dharma जीवनाचे अधिष्ठान स्वरूप, मनुस्मृतीने सर्व सामान्यांसाठी किमान आचरणीय असणारी अशी महत्त्वाची १० लक्षणे, त्यांची ओळख आपण करून घेतली. भारतीय धर्मशास्त्राचा Dharma इतिहास, तत्त्वज्ञानाचा विकास या गोष्टी अथांग महासागरसारख्या आहेत. धर्म Dharma पुरुषार्थाचा, जीवनाचे अधिष्ठान म्हणून आवश्यक त्या मर्यादेत आपण विचार करण्याचा प्रयत्न करू.
 

jj  
 
वेद काळापासून तो आधुनिक काळातील अनेक तत्त्वज्ञानी, विचारवंत यांनी धर्म Dharma या संज्ञेचा सखोल, मूलभूत विचार केला आहे. त्यामुळे आचरणासाठी आवश्यक अनेक जीवनमूल्ये सहजपणे अस्तित्वात आलीत. त्यांच्या आचरणामुळे लौकिक जीवन शांत, समृद्ध आणि समाधानी होण्यात जशी मदत झाली त्याचबरोबर आंतरिक जीवनाचा सहज विकास होऊन काम, क्रोध, मद, मोह, मत्सरादि षड्रिपूंवर सहजपणे ताबा मिळविता आला. हे सर्व दुर्गुण आध्यात्मिक विकासामध्ये विघ्न निर्माण करणारे आहेत. त्यांचा कमीत कमी प्रादुर्भाव व्हावा अशीच आचारसंहिता निर्माण झाल्याने भारतीय जीवनाचा प्रवास, धर्म Dharma, अर्थ, काम आणि मोक्ष या मार्गाने सहजपणे होऊ लागला. आज जसा एखादा चौपदरी रुंद, स्वच्छ, आवश्यक त्या सुविधांनी युक्त असलेल्या ‘नॅशनल हायवे'वरून वेगाने आणि निर्भयपणे आपला प्रवास होऊन कमीत कमी वेळात आपण आपल्या नियोजित स्थळी सुखरूपपणे पोहोचू शकतो, त्याप्रमाणे धर्माधिष्ठित असलेल्या या चौफेर ‘कल्चरल-हाय-वे'वरून मानवी जीवन प्रवासाचे अंतिम गंतव्य, लक्ष्य, मोक्ष तेथपर्यंत सहजपणे पोहोचण्याची व्यवस्था हे भारतीय जीवन पद्धतीचे अविभाज्य अंग आहे. ते सहजपणे व्हावे त्यासाठी प्रदीर्घकालीन केलेल्या साधनेद्वारा सत्याचा साक्षात्कार झालेल्या ऋषिमुनींनी, संत-महंतांनी, ज्ञानी सत्पुरुषांनी, भक्तीने आपल्या आराध्याशी एकरूप झालेल्या भक्तांनी, निष्काम कर्मयोगाचे आचरण करून प्राप्त झालेल्या वैश्विक अनुभूतीशी एकात्म झालेल्या कर्मयोगींनी आणि ‘शिवशक्ती' सामरस्याची अनुभूती घेणाऱ्या महायोग्यांनी धर्माची अनेक लक्षणे, स्वरूप आणि मूल्ये (व्हॅल्युज) संशोधित केली.
 
 
 
संपूर्ण मानव जातीचे कल्याण व्हावे या एकाच परोपकारी भावनेने त्यांचा उपदेशाच्या द्वारा, ग्रंथांच्या लेखनाद्वारा, गुरुशिष्य परंपरेद्वारा प्रसार, प्रचार केला. त्यातूनच व्यक्तिजीवन, सामाजिक जीवन, सांस्कृतिक जीवन आकारीत होत गेले. त्यातूनच परंपरा, समाजाचे, व्यक्तीचे, राष्ट्राचे चारित्र्य घडत गेले. हा प्रकार जगातल्या सर्व धर्मांच्या बाबतीत सहजपणे घडला आहे. धर्ममूल्ये वा धर्मसंकल्पना ही मुळात निर्गुण स्वरूपाची असते. (अ‍ॅबस्ट्रॅक्ट) सर्वसामान्यांच्या बुद्धीला तिचे सहजपणे आकलन होत नाही. मग त्यासाठी काही प्रतीकांची निर्मिती होते. त्या प्रतीकांमधूनच मग ‘प्रतिमांची' निर्मिती होते. ‘निर्गुण' असलेले परमेश्वरी तत्त्व ‘सगुण' रूपाने अस्तित्वात येते. त्या सगुणरूपाने अवतीर्ण झालेल्या परमेश्वराच्या आराधनेसाठी त्या त्या विशिष्ट वातावरणात, नैसर्गिक अवस्थेत, त्याजागी वावरत असलेल्या मानव समाजाच्या भावनिक, मानसिक, आध्यात्मिक गरजांच्या पूर्तीसाठी त्यानुरूप ‘धर्म' उत्पन्न होतो. जगातील अस्तित्वात असलेल्या सर्व प्रमुख धर्मांचा, Dharma उत्पत्तीचा इतिहास जर आपण पाहिला तर आपल्या हे सहजपणे लक्षात येईल. स्वामी विवेकानंद म्हणतात- ‘मुळात अनंत स्वरूपी असलेल्या परमेश्वराचा शोध घेण्याच्या अंत:स्फूर्तीतूनच जगातील सर्व धर्म, Dharma संप्रदाय, तत्त्वज्ञान उदयाला आले आहे. त्यातून एकाच परमेश्वराचा शोध घेण्याच्या विविध मार्गांचेच दर्शन घडते.' (स्वामी विवेकानंद ग्रंथावलीमधून)
 
भारतात प्रारंभापासूनच ‘ऋत' या संकल्पनेपासूनच वर्षानुवर्षे यावर चिंतन झाले. त्यातून स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत धर्माच्या अनुभूतीचे क्षेत्र, शास्त्र विकसित झाले. त्यातूनच सामान्य धर्म, विशेष धर्म, Dharma लौकिक धर्म, पारलौकिक धर्म, व्यक्तिधर्मापासून तो विश्वधर्म, मानव धर्मांपर्यंतच्या कक्षा विस्तारत गेल्यात. हा आपल्या धर्मशास्त्राचा इतिहासाचा निर्वाळा आहे. कौतुकाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे धर्मजीवनाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुभूती. अनुभूतीसाठी उपासना, साधना आवश्यक आहे. त्या उपासनेचे, साधनेचे शास्त्र भारतात जितके विकसित झाले आहे तितके अन्य धर्मांमध्ये क्वचितच विकसित झाले असेल. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थांप्रमाणेच उपासनाशास्त्रातही ज्ञान, कर्म, योग आणि भक्ती हे प्रत्यक्षानुभूतीचे उपासना मार्ग निर्माण करण्यात पूर्वसूरींना प्रचंड यश मिळाले आहे, ही गोष्ट आता जगातील सर्व धर्मांच्या Dharma तत्त्वज्ञानाचा, त्याच्याशी निगडित असलेल्या विविध ज्ञानशाखांचा तुलनात्मक अभ्यास, संशोधन करणारे संशोधक, विचारवंत जे आहेत ते आता प्रामाणिकपणाने मान्य करू लागले आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात विल ड्युरांट यांनी त्यांच्या ‘द केस ऑफ इंडिया' या ग्रंथात भारतीय संस्कृतीबद्दल विवेचन करताना असे म्हटले आहे की, ‘भारतीय संस्कृती हीच ग्रीक, रोमन, युरोपियन या मानवी समूहांची जननी असून संपूर्ण जगाला ज्ञान प्रदान करणारी आहे...' ‘‘इंडिया वॉज द मदरलँड ऑफ आवर रेस अँड संस्कृत, द मदर ऑफ युरोपियन लँग्वेजेस, शी वॉज द मदर ऑफ आवर फिलॉसॉफी.... आवर मॅथेमॅटिक्स अँड अदर सायन्सेस अँड ऑफ द आयडियल्स एम्बॉडाईड इन ख्रिश्चॅनिटी. मदर इंडिया इज इन मेनी वेज द मदर ऑफ अस ऑल.'' (‘अ परस्पेक्टिव्ह ऑफ इंडिया' - प्र. २ रे)
 
धर्म Dharma, ऋत या अमूर्त कल्पना आहेत. ‘ऋत' म्हणजे ‘कॉस्मिक लॉज' हे आज मान्य झाले आहे. त्यांना मानवी आकलनाच्या कक्षेत आणून, मानवी जीवनाच्या विकासासाठी त्यांचे योग्य ते आचारशास्त्र, व्यवहारशास्त्र, उपासनाशास्त्र आणि त्यादृष्टीने सहाय्यभूत होणारी शाश्वत, नैतिक जीवनमूल्ये निर्माण करणारी भारतीय प्रज्ञा ही सहस्रावधी वर्षे कार्यरत आणि चिंतनशील राहिली आहे. त्यातूनच आधुनिक विज्ञानही संशोधनाच्या ज्या शक्यतांपर्यंत (पॉसिब्लिटिज) पोहोचू शकलेले नाही. त्या सर्व विषयांवरचे संशोधित, शास्त्रीय ग्रंथ हे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, काशी, उज्जैन या विविध प्रमुख ऐतिहासिक नगरींमध्ये शिकविल्या जात असत. त्या विद्यापीठांमध्ये शिक्षित झालेले युवक त्यांच्या घरी परत गेल्यावर आपापल्या गावांमध्ये पाठशाळा चालवत. त्यामुळे भारतावर, इंग्रजांची राजवट चालू होण्यापूर्वी आणि लॉर्ड मेकॉले साहेबांनी ‘मागासलेल्या' (पॅगन) भारतवासीयांचा शिक्षणाच्या माध्यमातून ‘उद्धार' करण्याच्या शेकडो वर्षे आधी परंपरागत शिक्षणाच्याद्वारे खेड्यापासून तो नगरवासीयांपर्यंत सुशिक्षितांचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत असायचे. याच्या अधिक तपशिलासाठी जिज्ञासूंनी डॉ. धर्मपाल यांच्या या विषयावरील ‘द ट्री ऑफ इंडिया' वगैरे ग्रंथांचा मागोवा घ्यावा.
नारदांनी सांगितलेली धर्म लक्षणे
मानवी जीवनाच्या अंतर्बाह्य विकासासाठी किमान आवश्यक असणाऱ्या धर्म लक्षणांचा- जे संख्येने १० आहेत त्यांचा उल्लेख ‘मनुस्मृती' ग्रंथांत आला आहे. त्याचे थोडक्यात विवेचन आपण केले. स्मृतिग्रंथ हे त्या विशिष्ट युगात जीवन व्यवहार, लौकिक आचरण (कोड ऑफ कंडक्ट) कसे असावे याचे मार्गदर्शन करणारे असतात. ते संपूर्ण समाजासाठी, सर्व आश्रमांसाठी, सर्व पुरुषार्थांसाठी, किमान आवश्यक (मस्ट) या स्वरूपाचे असतात. त्या आदेशांचे पालन करण्याने जीवनात आवश्यक असलेले अनुशासन सहजपणे निर्माण होते. धर्माज्ञा Dharma म्हणून ते केले जात असल्याने त्यातून स्वाभाविकपणेच श्रद्धा, निष्ठा, भक्ती या नैतिक मूल्यांचे त्यांना स्वरूप प्राप्त होते. त्यातून व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय स्तरावरील वाटचालीत सामंजस्य, सहकार्य, एकात्मता, परोपकार, सहनशीलता अशा गुणांचा सहज प्रादुर्भाव होतो. त्यामुळे जीवनाची वाटचाल सुख, समृद्धीने परिपूर्ण, शांतता पूर्णतेने होत राहते. अशाच समाज जीवनात चिंतन, मनन, निदिध्यासन या आंतरिक प्रवासासाठी आवश्यक असलेली परिस्थिती, वातावरण असते आणि मग त्याच काळात निश्चिंत असलेली, निवांत झालेली, बुद्धी, प्रतिमा, ज्ञान, मानवी प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या विविध शास्त्रे, कला, व्यवसाय, अतींद्रिय शक्तीवर आधारित गूढ शास्त्रांच्या संशोधनात व्यग्र होऊन अनेक शास्त्रीय ग्रंथ, विद्या यांची निर्मिती करू शकते.
 
वेदकाळापासून सहस्रावधी वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीचा इतिहास आपल्याला हेच सांगतो. त्याचमुळे जगातील इतर संस्कृतीच्या तुलनेत ‘ज्ञान विज्ञानाची गंगोत्री' म्हणून भारतीय संस्कृतीच नावारूपाला आली. जगातल्या अनेक संशोधक, विचारवंत यांचे आकर्षण आजही हीच संस्कृती आहे. वरील सर्व सामर्थ्यांचे उगम स्थान, मूळस्रोत, धर्मप्रेरणा हीच आहे. त्यामुळे धर्मपुरुषार्थाचा नीट परिचय होण्यासाठी महर्षी नारदमुनींनी भक्त शिरोमणी, कयाधुपुत्र प्रल्हाद याला श्रीमद भागवतात धर्माची जी ३० लक्षणे सांगितली आहेत, त्यांची माहिती करून घेणे जरूर आहे. भारतीय पुराण वाङ्मयातील भक्त प्रल्हाद याचे चरित्र म्हणजे ‘सुर आणि असुर', ‘सत् आणि असत्' या दोन प्रेरणांचा, अनादि काळापासून मानवी जीवनात चालत आलेल्या संघर्षाचे प्रतीक आहे. तसेच ‘धर्मोरक्षति रक्षित:' Dharma या शाश्वत सत्याचा तो ज्वलंत पुरावाही आहे.
 
श्रीमद्भागवत हा ग्रंथ भक्तिरसप्रधान ग्रंथ आहे. कलियुगातील दुष्परिणामांपासून मनुष्याला वाचविण्याचे सामर्थ्य या ग्रंथातील तत्त्वज्ञानात आहे. त्यात विविध कथांच्या माध्यमातून परमेश्वराच्या भक्तीचे माहात्म्य वर्णन केले आहे. भक्तिमार्ग सुलभ, सुकर व्हावा यासाठी धर्माचरण Dharma केले पाहिजे. कारण त्या मार्गावरून वाटचाल प्रारंभ झाली की, मानवी जीवनाचे परमश्रेष्ठ, उद्दिष्ट, लक्ष्य म्हणजे मोक्ष तेथपर्यंत सहजपणे जाऊन पोहोचता येते. त्यासाठी जीवनातील आचरणात कशाला महत्त्व दिले पाहिजे, कोणत्या गुणांचा स्वीकार केला पाहिजे ज्यांना आपण धर्माची Dharma लक्षणे म्हणू शकतो, त्याचा समग्र उपदेश देवर्षी नारदमुनींनी भक्त प्रल्हाद यास दिला आहे. त्यात एकूण तीस धर्ममूल्यांचा उल्लेख केला आहे. ती लक्षणे पुढीलप्रमाणे (तक्ता बघणे) आहेत- मूळ उतारा संस्कृतमध्ये आहे.
 
सत्य सारासार विचार त्याग भोगवादाची निवृत्ती सर्वाभूती परमेश्वराची जाणीव नामस्मरण
दया मनाचा संयम स्वाध्याय मौन परमेश्वरांच्या लीलांचे चिंतन भगवद्पूजन
तपस्या इंद्रियनिग्रह सरलता आत्मचिंतन मनन देव-ऋषि-पितृयज्ञ
पावित्र्य अहिंसा संतोष क्षणभंगुरतेचे अवधान निदिध्यासन सख्यभक्ती
तितिक्षा ब्रह्मचर्य समदर्शिता अन्नदान कीर्तन आत्मसमर्पण
वरील ३० धर्म लक्षणे म्हणजे अप्रत्यक्षपणे धर्माच्या आज्ञाच आहेत. वरील सर्व गुण, लक्षणे ‘आज्ञार्थी' वापरलेत की त्याच धर्माज्ञा- कमांडमेंटस होतात. जसे ‘सत्याचे पालन करा', ‘सर्व प्राणिमात्रांवर दया करा', ‘अहिंसा, ब्रह्मचर्य, स्वाध्यायव्रताचे पालन करा', ‘स्वाध्यायान्मा न प्रमद:' इत्यादी.
 
(आज जगात इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख इत्यादी अनेक धर्म, संप्रदाय अस्तित्वात आहेत. जगातील मान्यवर विद्वान, संशोधक, सर्व धर्मांचा विविध दृष्टिकोनातून (थ्रु व्हेरिड अँगल्सने) आज विचार संशोधन करीत आहेत. त्यातून एकच सत्य अधोरेखित होते आहे की, ‘‘सृष्टीच्या उत्पत्तीपासून तो प्रलय होईपर्यंतच्या स्थितीपर्यंत, मानवाच्या जन्मापासून तो मृत्यूपर्यंत, एक पेशीय ‘सेल'पासून तो ‘ब्रेनमधील' अब्जावधी ‘न्युरॉन्स'पर्यंतच्या बाह्य आणि आंतरिक विकसनापर्यंत, ‘जड आणि चेतन' या अवस्थांचा आजच्या आधुनिक विज्ञानातील संशोधनाला सुसंवादी असलेले ‘धर्म तत्त्वज्ञान' जर कोणते असेल तर ते एकमेव भारतीयांचे धर्म तत्त्वज्ञान म्हणजे ‘वेदान्त तत्त्वज्ञानचं' होय.'')
 
भारतीय जीवन पद्धतीचा मूलाधार, हेच वेदान्त तत्त्वज्ञान आहे, असे विख्यात तत्त्वज्ञ आणि विचारवंत डॉ. राधाकृष्णन् यांनीही त्यांच्या ‘हिन्दू व्ह्यू ऑफ लाईफ' या प्रसिद्ध ग्रंथात म्हटले आहे. ते म्हणतात - ‘‘द बेस ऑफ इंडियन कल्चर अँड लाईफ इज वेदान्त अँड स्पिरिच्युअ‍ॅलिटी' व्हॉट डज स्पिरिच्युअ‍ॅलिटी मिन्स? ‘द इंटिग्रेटेड व्ह्यु ऑफ मॅन अँड कॉस्मॉस मॅन इज अ सटल पार्ट ऑफ युनिव्हर्स, वुईच इज कॉल्ड अ मॅक्रोकॉझम. बट बोथ आर इंटिग्रेटेड अ‍ॅज अ होल.'' स्वामी विवेकानंदांनी यालाच ‘देअर इज अ अनब्रोकन युनिटी इन ‘मायक्रोकॉझम' अँड ‘मॅक्रोकॉझम' असे म्हटले आहे तर संतांनी जगाचे स्वरूप वर्णन करताना- ‘पिंड ब्रह्मांडाचा हा खेळ चालिला-खेळियाचा शोध कोण घेई?' असे म्हटले आहे.
 
याप्रमाणे धर्म Dharma पुरुषार्थाची व्यापक संकल्पना आहे. हा आशय जर अखंड लक्षात ठेवला तर कोणत्याही अवस्थेत आपल्या मनाचा, बुद्धीचा कौल धर्मानुकूलच राहील, यात काहीही शंका घेण्याचे कारण नाही. कारण अनुभूतिसंपन्न आपल्या संत-महंतांनी एक शाश्वत सिद्धांत सांगून ठेवला आहे की, ‘अंतरिचे धावे स्वभावे बाहेरी'- त्यामुळे ‘अंतरंगाकडेच' आज अधिक लक्ष देण्याची खरी गरज आहे. जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांनीही हेच सांगितले नाही का, की- ‘इनर रिव्होल्युशन इज द ओन्ली ट्र्यु रिव्होल्युशेन.'