तभा वृत्तसेवा
गोंदिया,
तालुक्यातील कामठा येथील श्री संत लहरी आश्रम येथे ब्रह्मलीन परमपुज्य संत शिरोमणी जयरामदास उर्फ लहरीबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून समारोहाला 1 जानेवारी रोजी सुरुवात झाली असल्याचे येथे 29 जानेवारी रोजी आयोजित पत्रपरिषदेत आश्रमचे अध्यक्ष गोपाल बाबा यांनी सांगितले.
गोपाल बाबा म्हणाले, लहरीबाबा यांनी समाजात अंधश्रद्धेविषयी जनजागृती, व्यसनमुक्ती आणि अध्यात्मिक ध्यानासाठी सन 1975 मध्ये तालुक्यातील कामठा येथे लहरी आश्रमची स्थापना केली. त्यांनी या माध्यमातून गावागावात धार्मिक-अध्यात्मिक, बौद्धिक आणि व्यसनमुक्ती विषयी जनजागृती केली. 7 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या जन्मदिवसाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने आश्रमतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. लहरी बाबा यांचे विचार जनमानसात पोहोचावे यासाठी व्यसनमुक्ती कार्यक्रम, भजन, ग्रामस्वच्छता, संत संमेलन, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, विविध क्षेत्रातील विभूतींचा सत्कार, विविध स्पर्धा, कृषी प्रदर्शन आदींचे आयोजन करण्यात येणार आहे.
रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर यांना अध्यात्मिक व धार्मिक प्रबोधनासाठी निमंत्रित केले जाणार असल्याचेही गोपालबाबा यांनी सांगितले. लहरी आश्रमतर्फे कामठा येथे धर्मार्थ दवाखाना तसेच लहान मुलांना कान्व्हेंटच्या माध्यमातून निशुल्क शिक्षण देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. आश्रमाच्या गोंदिया, भंडारा जिल्ह्यासह यवतमाळ, चंद्रपूर आणि मध्य प्रदेशातील बालाघाट येथे अशा 8 शाखा असून या माध्यमातून बाबांचे विचार, व्यसनमुक्तीचा संदेश, ग्रामस्वच्छता आदींविषयी प्रबोधन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला आश्रमाचे सचिव कान्हा बावनथडे, डॉ. खिलेश्वरी खरकाटे, अनिल ठाकरे, मनोहरलाल गोंडाने, संजय तराड, अपूर्व मेठी, दीपक कुंदानी, विजय कातकडे, विठ्ठलराव भरणे, गोपाल मते आदी उपस्थित होते.