भारतविरोधी धक्कादायक वास्तव

‘स्नेक्स इन दी गंगा : ब्रेकिंग इंडिया 2.0’ पुस्तकातून उघड झालेले

    दिनांक :20-Nov-2022
|
भाग-3
राष्ट्ररक्षा
चीनमध्ये भारताहून 100 पट अधिक अत्याचार होत आहेत. त्याहून अधिक अत्याचार अमेरिकेत होतात. मात्र, चीनला काही शिकवायची अमेरिकन विद्वानांची किंवा हार्वर्ड विद्यापीठाची हिंमत नाही; उलट चीन हार्वर्ड विद्यापीठाचा गैरफायदा घेतो. ते चिनी संस्कृतीविषयी, मानवी अधिकाराविषयी हार्वर्ड विद्यापीठाला काहीही बोलू देत नाही. हार्वर्ड विद्यापीठामधील विज्ञान-तंत्रज्ञान विभागात चिनी मोठ्या प्रमाणात कार्यरत असून अमेरिकेमध्ये झालेले संशोधन चोरून ते गैरफायदा घेत असतात. चीन हार्वर्ड अत्याधुनिक पायाभूत सुविधांचा भारतविरोधात वापर करीत आहे.
 
 
Snakes in Ganges
 
'Snakes in Ganges' : चीनने आज विविध मार्गांनी अमेरिकेत घुसखोरी केली आहे. आपल्या आर्थिक ताकदीच्या बळावर अमेरिकेमधील अनेक संस्थांना, विद्यापीठांना मीडियाला आणि विचारवंतांना चीनने विकत घेतले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या मुलांच्या व्यवसायात चिनींचे मोठे समभाग आहेत. त्यामुळे बायडेन पुत्रांवर चीनचा प्रभाव आहे. त्यांच्याकडून चीनला अनुकूल असे धोरण पालटले जाते. अमेरिकन मीडिया चीनविरोधात काहीच बोलत नाही; मात्र अमेरिकेच्या लोकांच्या विरोधात बोलतात आणि भारताच्या विरोधात बोलतात. अशा अनेक सूत्रांवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. अमेरिका पूर्णपणे भारतातून स्थलांतरित होणार्‍या भारतीयांवर अनेक बाबतीत अवलंबून आहे. भारतीय तथाकथित विद्वान, कार्यकर्ते, पत्रकार आणि कलाकार यांच्या सहकार्याने विकसित झालेल्या भारतविरोधी सामाजिक सिद्धांतांचा हार्वर्ड विद्यापीठ ग्राऊंड झिरो आहे. ते भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देते आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी स्पष्ट वर्तमान धोके निर्माण करते. अनेक उच्चभ्रू भारतीय त्यांच्या पैशाने आणि कुटुंबाच्या नावाने हार्वर्डला विश्वगुरू म्हणून उभारण्याकरिता आर्थिक व वैचारिक मदत करीत आहेत. भारतातील काही खाजगी विद्यापीठे वोकीझम आयात करीत आहेत; ज्याचा भारताच्या स्थिरतेवर गंभीर परिणाम होतो. भारतीय कॉर्पोरेट्स त्यांच्या कामाच्या ठिकाणी पर्यावरण, सामाजिक आणि गव्हर्नन्स रेटिंगचे नवीनतम पाश्चात्त्य मान दंड (Western rubric of ratings) आणत आहेत, जे भारताला लागू होत नाही. भारतीय सरकारच्या काही धोरणांमध्ये वेकवाद घुसला आहे. उदाहरणार्थ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हार्वर्डच्या उदारमतवादी कलांचा प्रचार करीत आहे; जे थांबले पाहिजे. भारताला अमेरिकेची वैचारिक वसाहात म्हणून विचारधारा, संस्था आणि तरुण नेत्यांची संपूर्ण परिसंस्था हार्वर्डमध्ये उदयास येत आहे.
 
 
‘हार्वर्ड हे भारत विरोधी सापाचे घरटे आहे’
 इसाबेल विल्करसन नावाच्या कृष्णवर्णीय लेखिकेने तिच्या ‘कास्ट : द ओरिजिन ऑफ अवर डिसकॉन्टेंट्स’ या पुस्तकाद्वारे तिचा अत्यंत चुकीचा सिद्धांत मांडला. तिचे पुस्तक दलित आणि आफ्रिकन लोकांना एकत्र आणणारे आणि त्यांना सर्वात जास्त पीडित म्हणून प्रक्षेपित करण्यात मांडण्यात काहीसे यशस्वी झाले आहे. ती जगभरातील सर्व वर्णद्वेषांना भारतातील जाती पद्धतीमुळे दोष देते. तिच्या मते, याचे श्रेय भारताचे प्राचीन वैदिक स्त्रोत आहेत, जे सर्व वर्णद्वेषाचे मूळ आहे. तिच्या म्हणण्यानुसार ब्रिटिशांनी ते भारतातून उचलून अमेरिकेत नेले आणि त्यामुळे कृष्णवर्णीयांविरुद्ध वर्णद्वेष निर्माण झाला. कृष्णवर्णीय न्यूयॉर्क टाइम्स आणि ओप्रा विन्फ्रे यांनी तिच्या बुक क्लबद्वारे प्रसिद्ध केल्यामुळे विल्करसनच्या पुस्तकाने अमेरिकन मीडियामध्ये मायलेज मिळविले. विल्करसनचा प्रबंध हार्वर्डमध्ये एक प्रस्थापित तष्ट्य/सत्य म्हणून शिकविला जातो आणि त्या विरोधातील प्रति-वाद विचारात घेत नाहीत. अनेक कॉर्पोरेशन या कामाचा उपयोग त्यांच्या वैविध्यपूर्ण प्रशिक्षण उपक्रमांमध्ये, धर्म आणि जातींमधील विविधतेचे प्रशिक्षण करतात (diversity training initiatives). विल्करसनच्या प्रबंधाचे पहिले गंभीर खंडन 'Snakes in Ganges' ‘स्नेक्स इन गंगा’ या पुस्तकाद्वारे केले गेले.
 
 
क्रिटिकल रेस थेअरी, क्रिटिकल कास्ट थेअरी
मार्क्सवादाच्या अमेरिकेकरणामध्ये आर्थिक बाबीपासून मार्क्सवाद आता क्रिटिकल रेस थेअरी म्हणजे अमेरिकेतील कृष्णवर्णीयांवर होणारे अत्याचार यामध्ये बदली केले जात आहे. मार्क्सवादाचे अमेरिकीकरण ही एक संकल्पना आहे; जी आर्थिक मार्क्सवादी सिद्धांतानंतर क्रिटिकल रेस थेअरी म्हणून भारतावर क्रिटिकल कास्ट थेअरी लादत आहे. हा सिद्धांत चुकीने ब्राह्मणांना अमेरिकेतील गोर्‍यांशी आणि ’दलितांना’ कृष्णवर्णीयांशी जोडतो. कृष्णवर्णीयांप्रमाणेच दलितावर अत्याचार, मुस्लिमांनाही अत्याचारित म्हणून दाखविणे हा हेतू आहे. दुसर्‍या देशाच्या सामाजिक संरचनेचे अमेरिकीकरण करणे म्हणजे अहंकार होय. हार्वर्ड हे भारतविरोधी प्रचाराचे केंद्र आहे. हार्वर्डमध्ये भारतातील देशद्रोही आहेत आणि आता ते अनेक भारतीयांना प्रशासनाचे प्रशिक्षण देत आहे. भारतात सध्या असलेली सामाजिक चौकट तोडून समाजात जाती-जमातीच्या नावाने फूट पाडणे, अराजकता माजवणे हा या सिद्धांताचा उद्देश आहे. क्रिटिकल रेस थिअरीप्रमाणे अनेक वर्षांपासून कृष्णवर्णीयांवर अत्याचार होत आहेत. अमेरिकेच्या तंत्रज्ञान कंपन्या आणि कॉर्पोरेट जगतामध्ये कृष्णवर्णीय, गोरे यांची मोजणी व्हावी, अमेरिकेत जे भारतीय काम करतात, त्यामध्ये ब्राह्मण, भारतातल्या मागासलेल्या जाती यांची मोजणी व्हावी असा प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये दिसेल की, ब्राह्मणांची संख्या इतर मागासलेल्या जातीपेक्षा जास्त आहे. म्हणजेच कॉर्पोरेट जगतात ज्या मेरिटॉक्रॅसीचा वापर केला जातो, तिथे सगळ्यांना सारखी संधी मिळावी, असा प्रयत्न केला पाहिजे. अशाच प्रकारची जातीची मोजणी ही प्रत्येक क्षेत्रात केली जावी; ज्यामुळे मेरिटॉक्रॅसीला पूर्णपणे गाडता येईल. अनेक अमेरिकन कंपन्या पोलिटिकली करेक्ट राहण्याकरिता जाती, कृष्णवर्णीयांवर अन्याय होतो अशा प्रकारचे परिसंवाद आपल्या कर्मचार्‍यांकरिता चालवतात.
 
 
भारत विक्रीसाठी आहे का?
'Snakes in Ganges' : भारतातीलच काही विद्वान अमेरिकेत जाऊन भारतात चुकीचे घडत असल्याविषयी अपप्रचार करतात. भारत सरकार पलटले पाहिजे, भारतीय लोकशाही हुकूमशाही बनत आहे, हा सिद्धांत पसरवला जातो. भारत सरकारला लोकांनी निवडून दिले आहे. त्यांना जर वाटले की, सरकार योग्य प्रकारे काम करीत नाही, तर ते पुढील निवडणुकीत याहून चांगले सरकार निवडतील. केंद्रापासून ग्रामपंचायत स्तरापर्यंत लोकशाही मार्गाने निर्णय घेतले जातात. भारतातील अत्यावश्यक असणार्‍या ‘सीएए’ (नागरिकत्व सुधारणा कायदा) आणि ‘एनआरसी’ (राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रिया) या कायद्यांना विरोध करण्यात आला. दिल्लीचे रस्ते बंद करण्यासाठी शेतकर्‍यांना भडकवण्यात आले. अमेरिकेमधील काही भारतातील दुर्बल घटकांवर अन्याय होत आहे, अशा प्रकारचा कांगावा करतात; पण सत्य हे आहे की, भारतीयांवर अमेरिका, युरोप, कॅनडा यांसारख्या देशांमध्ये अनेक वेळा अत्याचार केले जातात. अनेकांना वर्णदृश्यामुळे किंवा रेसिझममुळे मारले जाते. हे देश भारताच्या जनतेने निवडलेल्या सरकारच्या विरुद्ध खालिस्तानी कारस्थान आणि अशी अनेक कारस्थाने करणार्‍यांना सबळ बनवते किंवा त्यांच्याविरुद्ध मतपेटीच्या राजकारणामुळे काहीच कारवाई करीत नाही. अशा प्रकारचे अन्याय जे भारतीयांच्या विरुद्ध होतात, ते जगाच्या मीडियामध्ये मांडणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना कळेल की, ते भारतातील डोळ्यातले कुसळ शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांच्या डोळ्यांमध्ये मुसळ गेलेले आहे. भारतामध्ये कुठल्याच प्रकारचा अन्याय होत नाही असे नाही. परंतु हे समजणे महत्त्वाचे आहे की, भारतातल्या असलेल्या सगळ्या सामाजिक आव्हानांचा मुकाबला हा भारतीय समाज आणि भारतीय सरकार, भारतामध्येच राहून करू शकते. त्याकरिता अमेरिकेतल्या दीड शहाण्यांची काहीही गरज नाही.
 
 
हार्वर्डच्या नेतृत्वाखाली वसाहतीकरण प्रकल्प
'Snakes in Ganges' : ऑक्सफर्डची जागा घेऊन भारताला वसाहत बनविण्याच्या या नव्या प्रयत्नात हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रमुख आहे. ब्रिटिश राजवटीत भारत विरोधी प्रवचनावर ऑक्सफर्ड विद्यापीठाचे नियंत्रण होते. हार्वर्डच्या नेतृत्वाखाली हा वसाहतीकरण प्रकल्प आता अमेरिकनने घेतला आहे. हार्वर्डने तयार केलेले संस्था आणि निधीचे जाळे हे पुस्तक उघड करते. हार्वर्ड हे सापाचे घरटे आहे; त्यांच्या वेबसाईट्स आणि प्रबंध भारतविरोधी आणि हिंदुविरोधी भावनांनी व्यापलेले आहेत, जिथे भारतविरोधी कल्पना उगवल्या जातात. येथे जे नवीन धोके उद्भवले आहेत; त्यांना ओळखणे आणि त्यांना सामोरे जाणे आवश्यक आहे. भारतातील सामाजिक संरचना तोडण्याची इच्छा तुलनेने नवीन आहे. हे पुस्तक तीन भागांमध्ये विभागले गेले आहे आणि देशासाठी धोकादायक असलेल्या संस्थांना समर्थन देणार्‍या व्यक्तींद्वारे अमेरिकन मार्क्सवादाची भारतात निर्यात कशी केली जात आहे, हे स्पष्ट करीत आहे.
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
- 9096701253
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ आहेत.)