धुक्यात हरवती वाटा...

    दिनांक :20-Nov-2022
|
- स्वाती पेशवे
ऋतुचक्र बदलत असल्याची तक्रारवजा भीती सध्या सगळीकडूनच ऐकू येत आहे. वातावरणातला बदल आता स्पष्ट जाणवू लागला आहे. पर्यावरणविषयक काम करणार्‍या विविध संस्थांकडून यासंबंधीच्या घातक परिणामांची चर्चाही होत आहे. गेली काही वर्षे लांबणार्‍या मान्सूनच्या रूपाने आपण हा बदल अगदी जवळून अनुभवत आहोत. पावसाप्रमाणेच कडाक्याच्या थंडीच्या रूपानेही हा बदल आपल्याला धोक्याची सूचना देऊन जात आहे. आपल्या देशातल्या काही भागांमध्येच बर्फवृष्टी होत असली, तरी कमालीच्या winter season थंडीने तिथे ठप्प होणारे जनजीवन आणि तिथून वाहणार्‍या गार वार्‍यांच्या प्रभावामुळे देशाच्या इतर भागांमधल्या गारठणार्‍या राज्यांचे प्रमाण यातला संबंधही अभ्यासण्याजोगा आहे. अर्थात हे सगळे गंभीर मुद्दे लक्षात घेतानाही थंडीचे दिवस एक वेगळे महत्त्व राखून आहेत, याबाबत शंका नाही.
 
 
Mahabaleshwar_mist_walk1
 
winter season थंडीला दिली जाणारी ‘आल्हाददायक’ ही उपमा अन्य कोणत्याही ऋतूला दिली गेलेली नाही, ही यातली पहिली लक्षणीय बाब. खरेच हे दिवस आल्हाददायकच असतात. दिवस पुढे सरकला तरी आळशीपणे मागेच रेंगाळणारी क्लांत सूर्यकिरणे, बराच काळ धुक्यामध्ये गुरफटून पडणारी वाट, अंगावर शिरशिरी आणणारा वातावरणातला गारवा, सणांची धामधूम संपल्यामुळे सार्वत्रिक पातळीवर जाणवणारा आळस अथवा शैथिल्य आणि फळबाजार तसेच भाजीबाजारात डोकावणारा रसरशीतपणा... ही सगळीच या काळातली वैशिष्ट्ये म्हणता येईल. या काळात व्यायामप्रेमींना नव्याने जोम चढतो, भटकंतीचे वेध लावलेली भटकी पावले अनवट पायवाटा शोधू लागतात, जिभेचे चोचले पुरवू इच्छिणार्‍यांना गोड आणि तिखट चवींची अनोखी मेजवानी मिळते आणि साहित्य- संगीत- व्याख्याने आदींची आवड असणार्‍यांना पुरेपूर भिजवून काढणारी कलावर्षा याच काळात होते. थोडक्यात, ‘जो जे वांच्छिल, तो ते लाहो...’ ही प्रार्थना प्रत्यक्षात येण्याचा हा काळ असतो, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आता आपण अशाच मुलायम थंडीचा आस्वाद घेत आहोत. सगळीकडे थंडीचे साम्राज्य पसरू पाहात आहे. तेव्हा त्याचा आनंद लुटण्याची सज्जता तर व्हायलाच हवी. हा मनभावन ऋतू सृष्टीची अनोखी रूपे दाखवून जातो. खरे पाहता हे दिवस पानगळीचे, तृणपात्यांनी हिरवाकंच साज उतरवून हलक्या सोनसळी रंगी रंगण्याचे, रानफुलांचे ताटवे फुलण्याचे आणि शेतातील उभ्या पिकांनी अंगोपांगी मोहरण्याचे... निसर्ग या काळात हे सगळे वैभव मनसोक्त उधळतो आणि सृष्टीची रम्यता शतपटीने वाढते.
 
 
आधी उल्लेख केल्याप्रमाणे थंडीने साहित्यविश्वात मानाचे स्थान पटकावले आहे. पावसाचे प्रेमीयुगुलांशी नाते जुळलेले आहे तसे winter season थंडीशीही जुळलेले आहे. या गुलाबी थंडीचा आस्वाद घेत, जिवलगाची आराधना करताना कितीतरी गाणी जन्माला आली. त्यापैकी अनेकांमध्ये थंडीचा उल्लेख आढळतो. ‘थंडी गुलाबी, हवा ही शराबी’, ‘थंडीत राहू, मस्तीत गाऊ’, ‘झटपट शेकोटी पेटवा’ यासारखी अनेक गाणी तुफान गाजली. मराठीतच नाही तर अन्य भाषांमध्येही थंडी स्पेशल गाण्यांनी जन्म घेतला. हिंदी चित्रपटांमध्ये अनेक गाण्यांमध्ये थंडीचा उल्लेख आहे. ‘मुझको ठंड लग रही है’, ‘ठंडी हवाएं लहराके आए’ यासारख्या गाण्यांचा समावेश त्यामध्ये करावा लागेल. थंडी हा प्रणयी जोडप्याचा अत्यंत आवडता काळ... एकंदरच थंडीबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. एखादी प्रिय व्यक्ती मनात स्थान मिळवते. थंडीनेही बहुतेकांच्या मनात तसेच स्थान मिळविले आहे. ‘जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते’ अशा ओळी असणारे सावरकरांचे लोकप्रिय गीत आहे. या गीतातील उत्तम, उन्नत हे सारे थंडीच्या दिवसांमध्येही आहे. कदाचित त्यामुळेच काव्यलेखन करणार्‍यांच्या लेखणीला थंडीने भुरळ घातली असावी. थंडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवसात भरपूर भूक लागते. उन्हाळ्यात उकाड्यामुळे किंवा वारंवार तहान लागत असल्याने पाणी भरपूर प्यायल्यामुळे फार काही खाण्याची इच्छा होत नाही. पण, winter season थंडीमध्ये तसे घडत नाही. या दिवसात सकाळी समोर आलेला नाश्ताही भरपूर प्रमाणात पोटात उतरतो. दुपारच्या जेवणाच्या वेळीही बरेच अन्नपदार्थ आकृष्ट करतात. तीच गोष्ट रात्रीच्या जेवणाच्या बाबतीत होते. शिवाय मधल्या वेळेत पोटात ढकलण्यासाठी नाना प्रकारची फळेही उपलब्ध असतात. केव्हाही जावे आणि त्यांचा आस्वाद घ्यावा, असे हे दिवस असतात. या दिवसात भरपूर सकस अन्नपदार्थ पोटात गेल्यामुळे प्रकृती चांगली राहते. याचा अर्थ आरोग्य चांगले राहण्यासाठी थंडीचा फायदाच होतो. शिवाय या दिवसात व्यायाम केला तर आणखी ऊर्जा मिळते. प्रकृती ठणठणीत ठेवायची असेल तर थंडीच्या दिवसात जीममध्ये जाऊन अथवा शक्य असेल तर घरीच वेगवेगळे व्यायाम प्रकार करायला सुरुवात करावी. थंडीच्या दिवसात सुरू केलेला हा व्यायाम पुढच्या काळातही सुरू ठेवता येतो.
 
 
एकूणच winter season थंडी हे अजब रसायन आहे. कोणाला ती नकोशीही वाटत असेल. पण, अशा लोकांचे प्रमाण अल्प असेल हे निश्चित. ज्यांना तसे वाटत असेल त्यांना जीवनातला आनंद खर्‍या अर्थाने लुटणे जमलेच नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. मात्र, एका गोष्टीचे वाईट वाटते. बरेच लोक थंडीपासून रक्षण करण्यासाठी अंगावर रजई पांघरून झोपी जातात. बाहेर कार्यक्रमांना जाताना उच्च मध्यमवर्गीय स्त्रिया अंगाभोवती भरजरी शाल लपेटतात. पण, काही लोक असे असतात की, त्यांना या थंडीपासून बचाव करता येत नाही. घर नाही म्हणून रस्त्यावर झोपणारी अनेक माणसे, कुटुंबे आपण पाहतो. खरे तर सतत रस्त्यावरच झोपल्यामुळे तेच त्यांचे घर बनलेले असते. त्याला ना खिडक्या असतात ना दरवाजे! रात्री झोपले की चहुबाजूंनी थंडी झोंबत असते. पण, ती माणसे इतकी दुर्दैवी असतात की, त्यापासून बचाव करण्यासाठी पुरेसे ऊबदार कपडेही नसतात. शाली, रजई आदी तर दूरच; एखाद्याला कधीतरी कोणीतरी वापरात नसणारे, खराब झालेले कपडे देतात. त्यामध्ये कधी चादरीही असतात. असे कपडे मिळाले तर त्या लोकांसाठी दिवाळीच ठरते. अशा कपड्यांनी त्यांची थंडी थोडी दिलासादायक ठरते. थंडी आणि तिच्या रूपाविषयी असे बोलावे तेवढे थोडेच आहे. एखाद्या सुंदर ललनेची प्रशंसा करताना शब्दही अपुरे ठरावेत तसे थंडीचे वर्णन करताना होते. तिच्या नाना रूपांविषयी बोलताना कोणते शब्द पुरेसे ठरणार? प्रत्यक्षात जे सुंदर आहे त्याची प्रशंसा वेगळ्या शब्दात करण्याची गरज नसते. थंडीच्या बाबतीतही तेच आहे. आजवर थंडीने माणसाला भरपूर दिले आहे आणि तिच्यातला औदार्याचा हा गुण यापुढेही कायम राहील.
 
 
या दिवसात आहारात होणारा बदलही हवाहवासा वाटणारा... गरमागरम सूप, पानात पडणारी गरम पोळी अथवा भाकरी, या दिवसात आवर्जून केली जाणारी बाजरीची भाकरी, तिळाचा कूट वापरून तयार होणारे रुचकर आणि खमंग पदार्थ, ताटाची डावी बाजू सजवणारी सॅलेड्स, चटकदार उसळी, अन्य तळलेले पदार्थ या सर्वांमुळे थंडीतल्या भोजनाला एक वेगळीच चव मिळते. एरवी फारसे केले न जाणारे काही पदार्थ खास winter season थंडीतच केले जातात. त्यामुळे जिभेची रुची वाढली नाही तरच नवल! साधी कढी ती काय, पण थंडीत खिचडीसवे गरमागरम कढीची अथवा कढणाची चव अशी काही अफलातून लागते की विचारू नका! गरम असो वा तिखट, या दिवसात सगळेच पदार्थ विशेष रुचकर लागतात. त्यातच सुरू होते लग्नसराई... ही तर अनोखी पर्वणी. उन्हाळ्याच्या किचकिचाटात साजर्‍या होणार्‍या लग्नसमारंभांपेक्षा हिवाळ्यात साजरे होणारे लग्नसमारंभ विशेष खुमासदार ठरतात. मंडळी या समारंभाचा निवांतपणे आनंद लुटू शकतात. हे दिवस विशेष आनंद देऊन जातात. म्हणूनच थंडीचा काळ कुठल्याही कार्यक्रमामध्ये मध्यंतर असल्यासारखा असल्याचे नेहमी वाटत राहते.
 
 
हिंदीत एक छान शब्द आहे... ठहराव, थबकणे. पुढच्या वेगवान प्रवासासाठी हे थबकणे गरजेचे असते. सतत वेगावर स्वार होऊन केलेल्या प्रवासात काही काळासाठी मंदावलेला वेग एक प्रकारचा निवांतपणा देऊन जातो. या निवांतपणात खूप काही साधता येते. रंगणार्‍या, बौद्धिक भूक भागवणार्‍या कार्यक्रमांचा आस्वाद घेता येतो, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी झोडता येते, वैचारिक कार्यक्रमांना उपस्थित राहून मेंदूची क्षमता वाढविता येते, मुलाबाळांच्या गॅदरिंगचा आनंद अनुभवताना हळूच आपल्या गतकाळाच्या कुशीत शिरता येते, नातलग अथवा मित्र-मैत्रिणींबरोबर सहलीचा आनंद उपभोगता येतो. हा बदल मनस्वी आनंद देणारा आहे. रुटीनमधून बाहेर काढणारा आहे. स्वत:साठी जगण्याची प्रेरणा देणारा आहे.