समान नागरी कायदा आणण्यास कटिबद्ध

    दिनांक :24-Nov-2022
|
- अमित शाह यांची ग्वाही
 
 
नवी दिल्ली, 
लोकशाही पद्धतीने वादविवाद आणि चर्चा झाल्यानंतर भाजपा समान नागरी कायदा आणण्यास कटिबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री Amit Shah अमित शाह यांनी आज गुरुवारी दिली. अमित शाह यांना समान नागरी कायद्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, जनसंघाच्या काळापासून भाजपाने देशातील नागरिकांना दिलेले हे अश्वासन आहे. केवळ भाजपाच नाही तर, संविधान सभेनेही संसद आणि राज्यांना योग्यवेळी समान नागरी कायदा आणण्याचा सल्ला दिला होता. कारण, कोणत्याही धर्मनिरपेक्ष देशासाठी कायदे धर्माच्या आधारावर नसावेत. राष्ट्र आणि राज्य जर धर्मनिरपेक्ष असेल तर कायदे धर्मावर आधारित कसे असतील? प्रत्येक आस्तिकासाठी, संसदेने किंवा राज्यांच्या विधानसभांनी एक कायदा संमत केला पाहिजे, असे त्यांनी एका माध्यम समूहाच्या कार्यक‘मात सांगितले.
 
 
amit shah dksl
 
संविधान सभेची ही बांधिलकी कालांतराने विसरली गेली, असा दावा Amit Shah अमित शाह यांनी केला. केवळ भाजपा वगळता इतर कोणताही राजकीय पक्ष समान नागरी कायद्याच्या बाजूने नाही. लोकशाहीमध्ये निकोप वादाची गरज असते. या मुद्यावरही खुली आणि निकोप चर्चा व्हावी. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरातमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे, जिथे विविध धर्माचे लोक त्यांचे मत मांडत आहेत, असे अमित शाह यांनी सांगितले.
 
 
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येणार्‍या शिफारसींच्या आधारे आम्ही कार्यवाही करू. लोकशाही पद्धतीने चर्चा आटोपल्यानंतर आम्ही समान नागरी कायदा आणण्यास कटिबद्ध आहोत, असे Amit Shah शाह यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 निष्प्रभ करणे हे तुमचे सर्वांत मोठे यश आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना शाह यांनी सांगितले की, कोणतेही यश हे त्यांचे वैयक्तिक यश नाही. कारण, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री होते आणि प्रत्येक यश हे सरकारचे आहे.