बेल्जियमचा कॅनडावर रोमहर्षक विजय

    दिनांक :24-Nov-2022
|
दोहा, 
फिफा फुटबॉल विश्वचषकात बुधवारी मिची बात्शुआयीने 44 व्या मिनिटाला नोंदविलेल्या महत्त्वपूर्ण एकमेव गोलच्या बळावर Belgium बेल्जियमने फ गटाच्या साखळी सामन्यात कॅनडावर 1-0 असा रोमहर्षक विजय नोंदविला. अहमद बिन अली स्टेडियमवर कॅनडाने आपल्या आक्रमक खेळा करून द्वितीय विश्वमानांकित युरोपियन संघाला चांगलेच झुंजविले, परंतु एका गोलच्या बळावर विजय मिळवून बेल्जियमने विश्वचषकात आणखी एक उलटफेर होण्यापासून स्वतःचा बचाव केला. बेल्जियमने कॅनडाचे सर्व मार्गाने केलेले उत्तम प्रयत्न हाणून पाडले. या सामन्यात कॅनडाने बहुतांश वेळ चेंडूवर आपला ताबा ठेवला व वर्चस्व गाजविले, परंतु ते गोलजाळ्यासमोर अपयशी ठरले.
 
 
BELGIUM-2
 
विशेषत: अल्फोन्सो डेव्हिसने पूर्वार्धात पेनॉल्टी किकवर मारलेला फटका Belgium बेल्जियमचा गोलरक्षक थिबॉट कोर्टोइसने चतुराईने रोखला. कोर्टोइसने अ‍ॅलिस्टर जॉन्स्टनचेही प्रयत्न हाणून पाडले. मध्यंतराला काही क्षण शिल्लक असताना टोबी अल्डरवेरल्डने लांब अंतरावरून मारलेल्या चेंडूवर मिची बात्शुआयीने ताबा मिळविला व मिलान बोरजानला हुलकावणी देत डाव्या पायाने चेंडू गोलजाळ्यात धाडला. 44 व्या मिनिटाला मिचीने नोंदविलेला हा गोल बेल्जियमला विजय मिळवून देणारा ठरला. दरम्यान, कॅनडाच्या जोनाथन डेव्हिड व सायल लॅरिनने गोल नोंदविण्याची शानदार संधी वाया घालवली. बेल्जियमचा गोलरक्षक कोर्टोइसनेही सायल लॅरिनपासून बचाव केला. एका गोलने पिछाडीवर राहिलेल्या कॅनडाने उत्तरार्धात बरोबरी साधण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले, परंतु जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या रॉबर्टो मार्टिनेझच्या संघाने पूर्वार्धातील एकमेव गोलच्या आधारावर विजय मिळविला.
 
 
कॅनडा संघ आक्रमक खेळला. त्यांचा खेळ बघता त्यांच्यामध्ये आमच्यापेक्षा सरस असण्याची पात्रता होती. परंतु शेवटी विजय हा विजय असतो. तरीही आम्हाला अधिक चांगले खेळण्याची व आपल्या खेळात प्रगती करण्याची गरज आहे, असे प्रशिक्षक मार्टिनेझ म्हणाले. आज आम्ही आमच्या सामान्य कौशल्याने आणि चेंडूवरील गुणवत्तेने जिंकलो नाही, परंतु जर आम्ही कौशल्यपूर्वक व गुणवत्तापूर्ण खेळाचे प्रदर्शन केले नाही, तर विश्वचषक जिंकू शकणार नाही, असेही ते म्हणाले. कॅनडाप्रमाणे Belgium बेल्जियमकडे वाईट फिनिशिंग आहे, मात्र सुदैवाने ते अर्जेंटिना व जर्मनीप्रमाणे विश्वचषकात पराभवाच्या खाईत ढकलले गेले नाही. बेल्जियमकडे अजूनही केव्हिन डी ब्रुयन व कोर्टोइससारख्या जागतिक दर्जाच्या गोलरक्षकाच्या रूपात गौरवशाली प्रतिभा आहे, परंतु ते कॅनडाच्या आक‘मक खेळासमोर काहीसे थकलेले व असुरक्षित दिसत होते.