शेतकरी आत्महत्या रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य

    दिनांक :24-Nov-2022
|
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जागतिक बँकेला माहिती
- दुष्काळग्रस्त भागातील प्रकल्पाला अर्थसहाय्य करण्याचे आवाहन

मुंबई,
राज्यातील मराठवाडा, विदर्भ भागातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी प्रकल्पांसोबतच दुष्काळग्रस्त भागात पुराचे पाणी वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने तयार केला असून त्यासाठी जागतिक बँकेने अर्थसहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री Eknath Shinde एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केले. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आपल्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जागतिक बँकेचे भारतातील प्रमुख ऑगस्टे तानो कौमे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प, हवामान बदल आणि त्यामुळे कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प, बेस्टसाठी इलेक्ट्रीक बसेस याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
 
 
Eknath Shinde
 
जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्रात कौशल्य विकास कामे सुरू असून त्याद्वारे क्षमता बांधणीस मदत होत आहे. भविष्यातही अशाचप्रकारे राज्यातील विविध क्षेत्रातील प्रकल्पांना सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. राज्यातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकारमार्फत सुरू असलेल्या विविध योजनांपैकी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक‘ा) मराठवाडा आणि विदर्भातील सुमारे पाच हजार गावांना फायदा होत आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेचे सहाय्य लाभले असून प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वीतेनंतर दुसर्‍या टप्प्यास मान्यता देण्याचे आवाहनही Eknath Shinde शिंदे यांनी केले.
 
 
पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागात वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पिण्याच्या पाणी उपलब्ध होणार असून लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. यामुळे शेतीला फायदा होणार असून त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे Eknath Shinde शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात शबनम सिन्हा, आदर्श कुमार, सुदीप मोजुमदार, झियांग वाँग सदस्यांसमवेत निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग आदी उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाला जलसंपदा, कृषी प्रकल्पांची माहिती देण्यात आली.