निकाह हलालावरील याचिकेसाठी नवे घटनापीठ

    दिनांक :24-Nov-2022
|
- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
 
नवी दिल्ली, 
मुस्लिमांमधील बहुपत्नीत्व आणि निकाह हलालाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्‍या याचिकांवर सुनावणी करण्यासाठी पाच न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या नवीन घटनापीठाची स्थापना केली जाईल, असे Supreme Court सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले. यापूर्वीच्या पीठातील न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. हेमंत गुप्ता यांनी पद सोडल्याने या प्रकरणी नवीन घटनापीठ स्थापण्यात यावे, अशी विनंती या मुद्यावर जनहित याचिका दाखल करणारे विधिज्ञ अश्विनी उपाध्याय यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड प्रमुख असलेल्या आणि न्या. हिमा कोहली व न्या. जे. बी. पार्डीवाला यांचा समावेश असलेल्या न्यायासनाला केली.
 
 
Supreme Court
 
Supreme Court : 30 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान न्या. इंदिरा बॅनर्जी, न्या. सूर्य कांत, न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. सुधांशू धुलिया यांचा समावेश असलेल्या न्यायासनाने या जनहित याचिकेवर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय अल्पसं‘याक आयोगाला प्रतिवादी करून उत्तर सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. हेमंत गुप्ता या वर्षी अनुक्रमे 23 सप्टेंबर आणि 16 ऑक्टोबर रोजी निवृत्त झाले आणि बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या प्रथांच्या विरोधात दाखल आठ याचिकांवर सुनावणीसाठी घटनापीठाची पुनर्रचना करण्याची गरज निर्माण झाली. बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला घटनाबाह्य व बेकायदेशीर असल्याचे जाहीर करावे, अशी मागणी याचिकेत आहे.