- आरती देशपांडे
‘भ्रष्टाचार हाच शिष्टाचार’ अशी परिस्थिती असलेल्या आजच्या काळात अवघ्या जगाने Corruption भ्रष्टाचारविरोधी दिन साजरा करणे, ही म्हटली तर केवळ औपचारिकता आहे आणि म्हटले तर जनजागृतीची उत्तम संधी आहे. आपल्याकडे ‘उडदामाजी काळे-गोरे’ असणारच हे अपेक्षित धरले जायचे. समाजातील सगळेच धुतल्या तांदळासारखे असणे शक्य नाही, हे एका अर्थी यंत्रणेने मान्य केले असून त्यांच्यावर शिक्षा अथवा दंडात्मक कारवाईची तरतूदही करून ठेवली आहे. मात्र, सद्यस्थितीचा विचार करायचा तर काळ्यातून पांढरे शोधणे हे समुद्रात पडलेला ऐवज शोधण्याइतके कठीण काम झाले आहे. भ्रष्ट आचरणाची उदाहरणे पैशाला पासरीभर मिळतील. अर्थात यात कोणा एका पेशाचा अथवा वर्गाचा हात नसून चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि सर्वसामान्यांपासून उच्चाधिकार्यांपर्यंत सर्वजण यथाशक्ती हात धुवून घेत आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भ्रष्टाचाराची कीड आता जवळपास सर्व क्षेत्रांपर्यंत पोहोचली आहे. शिक्षण, क्रीडा, आरोग्य, विज्ञान असे कोणतेही क्षेत्र त्यापासून वाचलेले नाही. किंबहुना ही कीड वाढल्यामुळेच कितीही उपाययोजना योजल्या आणि खोर्याने पैसा ओतला, तरी ते क्षेत्र हवी तशी प्रगती करू शकत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे यंदाचा जागतिक भ्रष्टाचारविरोधी दिन साजरा करताना तो नेमका कोणी आणि कसा साजरा करावा, यावर सर्वप्रथम विचार करायला हवा.
Corruption भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे उपाय योजले जातात. ‘नोटबंदी’ हा यावरील मोठा हातोडा होता. त्यानंतर तरी हे प्रमाण कमी होईल, अशी आशा होती. मात्र, पाण्यात काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही तसेच या उपायाचा मोठा परिणाम आजमितीस दिसून येत नाही. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राजकारणातील अनेक मोठे चेहरे गजाआड असणे, काहींची चौकशी सुरू असणे, काहींना या कारणास्तव सत्तेतून दूर व्हावे लागणे हे एक विदारक, पण वारंवार पाहायला मिळणारे चित्र आहे. शिष्टसंमत पद्धतीने पैसा न मिळणे अथवा त्यामार्गे मिळालेला पैसा न पुरणे ही या समस्येमागील खरी मेख असली आणि वाढलेला हव्यास हे यामागील कारण असले, तरी ही भूक शमणार तरी कधी आणि यामुळे होणारी सार्वत्रिक हानी थोपवायची कशी, हा खरा प्रश्न आहे. म्हणूनच प्रत्येकाने सद्सद्विवेकबुद्धीला साद देऊन या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.
भ्रष्टाचार म्हणजे फक्त लाचखोरीच नव्हे, तर जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीची बेपर्वाई, त्याने केलेला पैशांचा अपव्यय आणि पक्षपाती वागणूक म्हणजेही भ्रष्टाचार. Corruption भ्रष्टाचारामुळे भारताची आणि प्रामुख्याने आशियाई देशांची प्रगती मोठ्या प्रमाणात मंदावली. त्यामुळे भ्रष्टाचाराचे व्यापक दुष्परिणाम आपल्याला रोजच भोगावे लागत आहेत. ‘सोयीच्या विकासासाठी भ्रष्टाचार ही अल्पशी किंमत आहे’ अशी भ्रष्टाचाराची भलावण करणारे काही लोकही आपल्याला आढळतात. परंतु व्यापक विचार करता ही अल्पशी किंमत बरीच महागात पडते असे दिसते. बेरोजगारी, कमी पगार, आर्थिक विषमता याबरोबरच हाव, महत्त्वाकांक्षा, जीवनशैलीविषयीची बदलती तत्त्वे, वाढती महागाई आणि भ्रष्टाचार हा कायदेशीरपणेच नव्हे, तर मानवतेसंदर्भात केलेला गुन्हा आहे अशी टोचणी नसणे ही भ्रष्टाचार बोकाळण्यामागची कारणे आहेत. सोपा मार्ग शोधण्याच्या प्रवृत्तीतून आपली कामे लवकर करून घेण्यासाठी एखाद्याला खूश करणे, त्याला विरोध न करणे, पाठिंबा देणे, भेटवस्तू देणे किंवा पैशांच्या स्वरूपात लाच देणे अशा विविध मार्गांनी पदोपदी भ्रष्टाचार सुरू असतो. याची सवय बालपणापासूनच लावली जाते. आमिष दाखवून अभ्यास करून घेणे हाही एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे. चांगला अभ्यास केल्याबद्दल बक्षीस देणे हे प्रोत्साहन आहे आणि अभ्यास करणे कसे उपयुक्त ठरणार आहे, हे मुलांना त्यांच्या भाषेत पटवून देता येत नसल्यामुळे किंवा त्यात वेळ घालवण्यापेक्षा पळवाट म्हणून त्यांना चॉकलेट-बिस्कीट देणे सोपे असल्यामुळे भ्रष्टाचाराला सुरुवात होते. पुढे हाच भ्रष्टाचार सर्वत्र बोकाळलेला दिसतो आणि शिष्टाचार बनून जातो. भारतासह अनेक देशांमध्ये सरकारी कामे करून घेण्यासाठी लाच दिली जाते आणि ती दिली नाही तर कामे न करणे किंवा ते रेंगाळत ठेवण्याचे प्रकार घडतात. काही वेळा तर नियम तोडण्यासाठी जाणीवपूर्वक लाच दिली जाते. या संदर्भात तुरुंगातील कैद्यांना विशेष वागणूक देण्यासारखे गंभीर प्रकारही अनेकदा उघडकीस आले आहेत. पोलिसाच्या हातावर चिरीमिरी टेकवली की, आपण वाहतुकीचे नियम बिनदिक्कत तोडू शकतो, हे माहीत असल्यामुळेच आज अनेक शहरांमध्ये वाहतुकीच्या बिकट समस्या निर्माण झाल्या आहेत. या Corruption भ्रष्टाचारी मार्गाचा वापर करून अनेक व्यावसायिकांना कायदे वळवून, वाकवून आपला फायदा कसा करून घ्यावा, हे बरोबर माहीत झाले आहे. त्यातूनच देशात कर्जबुडव्यांची प्रकरणे गाजत आहेत. किती खोके मिळाले, याची जाहीर चर्चा होत असल्याने जणू राजकारण डागाळले जात आहे.
ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या 2017 च्या भ्रष्टाचारविषयक आंतरराष्ट्रीय अहवालानुसार, जगातील सुमारे 75 टक्के देशांमध्ये सर्वच क्षेत्रात सरासरी 43 एककं Corruption भ्रष्टाचार आहे. एकूण 180 देशांमध्ये भारत हा जगातील सर्वाधिक भ्रष्टाचारी देशांच्या यादीत गेली अनेक वर्षे सातत्याने झळकत आहे. या अहवालात 0 ते 50 एककांपर्यंत मापन मिळण्याचा अर्थ देश अत्यंत भ्रष्टाचारी आहे असा होतो तर 100 आकडा मिळणे म्हणजे देशात बिलकूल भ्रष्टाचार नसणे असा अर्थ होतो. कोणताही देश 100 मापन मिळवू शकलेला नाही, हे उघड आहे. 2017 मध्ये न्यूझीलंड आणि सिंगापूर यांनी भ्रष्टाचाराच्या बाबतीत सर्वाधिक स्वच्छ देश असा सन्मान मिळविला आहे; तर सोमालिया आणि दक्षिण सुदान यांनी भ्रष्टाचाराने बरबटलेले सर्वोच्च देश असा ‘किताब’(?) पटकावला आहे. जगातील 81 अत्यंत भ्रष्टाचारी देशांच्या यादीत भारत 40 व्या क्रमांकावर आहे. घाना, मोरोक्को आणि टर्कीही आपल्याच पंक्तीत आहेत. आधीच्या तुलनेत आता भारताचे स्थान घसरले असले, तरी Corruption भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्कोअरवरून दिसते. या यादीत पाकिस्तान 117 व्या स्थानावर तर श्रीलंका 91 व्या स्थानावर आहे. बांगलादेश 142 व्या स्थानावर तर मालदीव 112 व्या स्थानावर आहे. चीनने भ्रष्टाचाराच्या प्रमाणात भारताच्या पुढे क्रमांक पटकावला आहे.
थोडक्यात, सध्या आशिया-पॅसिफिक परिसरात Corruption भ्रष्टाचारविरोधी प्रयत्न मंद गतीने आणि अपरिपूर्णतेने सुरू असल्याचे तसेच प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य अल्प प्रमाणात असून नागरी समाजाचे स्थान आक्रसले आहे. मालदीव आणि फिलिपाईन्सबरोबरच भारतालाही अत्यंत वाईट प्रकारचा भ्रष्टाचार असलेल्या देशांमध्ये गणले जात आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर भ्रष्टाचाराला बर्यापैकी आळा घालण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरचा भ्रष्टाचार काही प्रमाणात कमी झाला असला, तरी कनिष्ठ पातळीवरच्या आणि विशेषतः नोकरशाहीतील भ्रष्टाचाराला फारसा आळा बसलेला नाही. आता तर नोटबंदीचा निर्णय आर्थिक पातळीवर चुकीचा होता की नाही, यावरही चर्चा होत आहे. परंतु, रक्तातच भ्रष्टाचार मुरलेल्या लोकांमुळे नोटबंदीमुळे भ्रष्टाचारावर मात करण्याऐवजी भ्रष्टाचारावर येणार्या निर्बंधांवर मात करण्याचे अनेक पर्याय शोधले गेले आणि नोटबंदीचा मूळ हेतू निष्फळ ठरला.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा असला, तरी निवडणुकांमध्ये होणारा वारेमाप खर्च आणि मतदारांपासून खासदारांपर्यंत अनेकांना विकत घेण्यासाठी सुरू असलेले प्रकार यामुळे भारताची लोकशाही पूर्णपणे पोखरली गेली आहे, हे सांगण्यासाठी कोणत्याही अहवालाची गरज नाही. आज Corruption भ्रष्टाचारामुळे अनेक विकास कामे रेंगाळली आहेत. मूठभर लोकांचे खिसे भरले तरी सर्वसामान्य गरिबीत खितपत पडले आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून देश वर्षानुवर्षे ‘विकसनशील’ याच यादीत राहिला आहे. भ्रष्टाचारी यंत्रणांमुळे दहशतवाद पूर्णपणे निपटून काढण्याचे अनेक मार्ग कुचकामी ठरत आहेत. या सगळ्याचा सातत्याने अनुभव घेणार्या लोकांना ‘प्रत्येकाने भ्रष्टाचार न करण्याची सुरुवात स्वतःपासून केली तरी Corruption भ्रष्टाचाराविरोधात मोठं पाऊल उचललं जाईल’ असे सांगणे सोपे असले, तरी ते प्रत्यक्षात घडण्यासाठी किमान मूठभर सक्षम, प्रामाणिक नेतृत्वाच्या पुढाकाराची गरज आहे. ती नाकारण्यात अर्थ नाही.