महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात तातडीने हस्तक्षेप करा

    दिनांक :08-Dec-2022
|
- महाविकास आघाडीच्या खासदारांचे गृहमंत्री अमित शाह यांना पत्र

नवी दिल्ली, 
Maharashtra-Karnataka demarcation महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरची परिस्थिती गंभीर असून याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज एका पत्रातून केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच अन्य मंत्र्यांच्या प्रक्षोभक विधानांमुळे या दोन राज्यांच्या सीमेवरची परिस्थिती हाताबाहेर चालली आहे, कोणत्याही क्षणी तेथे हिंसाचाराचा वणवा पेटू शकतो, अशी परिस्थिती उद्भवली आहे, याकडे लक्ष वेधत पत्रात म्हटले की, यामुळे कर्नाटकच्या बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी आणि बिदर येथे राहणार्‍या कायदाप्रेमी मराठी लोकांचा जीव संकटात सापडला आहे.
 
 
Maharashtra-Karnataka
 
Maharashtra-Karnataka demarcation महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असताना अचानक मागील आठवड्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सीमावर्ती सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तसेच जत तालुका कर्नाटकात समाविष्ट करण्याची घोषणा करून वातावरण तापवले. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात येण्यापासून रोखले, मंत्र्यांनी कर्नाटकात घुसण्याचा प्रयत्न केला तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही दिली, एवढेच नाही तर महाराष्ट्रात नोंदणी झालेल्या बसगाड्यांवर कर्नाटकात दगडफेक करण्यात आली, त्यामुळे या वादात हस्तक्षेप करत कर्नाटकला समज देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली. या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, श्रीनिवास पाटील, डॉ. अमोल कोल्हे, शिवसेनेचे विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.