तृणमूल नेता माणिक भट्टाचार्यची बँक खाती गोठवली

    दिनांक :08-Dec-2022
|
- शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात ईडीची कारवाई
 
नवी दिल्ली, 
शिक्षक भरती घोटाळ्यातील बेकायदेशीर सावकारी प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने तृणमूल काँग्रेसचा आमदार माणिक भट्टाचार्य आणि त्याच्या कुटुंबीयांची 7.93 कोटी रुपयांची बँक खाती आणि मुदती ठेवी गोठवल्या आहेत, अशी माहिती अधिकार्‍यांनी आज गुरुवारी दिली. Manik Bhattacharya माणिक भट्टाचार्यने मित्र आणि नातेवाईकांच्या नावावर 61 बँक खाती उघडली होती. तपास यंत्रणांची नजर जाऊ नये म्हणून ती खाती उघडण्यात आली होती, असे ईडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. बेकायदेशीर सावकारीसाठी वापरलेले असे एक खाते माणिक भट्टाचार्यची पत्नी सतरूपा भट्टाचार्य आणि 2016 मध्ये मृत्यू झालेल्या मृत्युंजय चॅटर्जी यांच्या नावावर अस्तित्वात असल्याचे आढळले असल्याचे ईडीने सांगितले.
 
 
manik
 
Manik Bhattacharya माणिक भट्टाचार्य पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचा माजी अध्यक्ष असून, शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात ईडीने त्याला ऑक्टोबरमध्ये अटक केली आहे. सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणातील पैशांचा माग ईडी काढत असून, सीबीआय भरतीतील अनियमिततांचा तपास करीत आहे. शिक्षक भरती परीक्षेमध्ये खराब कामगिरी करणार्‍या अनेकांना लाखो रुपयांच्या मोबदल्यात शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले तर, पात्र उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोप आहे. शालेय सेवा आयोग भरती घोटाळा प्रकरणात ईडीने पश्चिम बंगालचा माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी याला जुलैमध्ये अटक केली आहे.