हिमाचलमध्ये दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करू : राहुल गांधी

    दिनांक :08-Dec-2022
|
नवी दिल्ली, 
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर, विश्वास दाखवल्याबद्दल काँग्रेस पक्षाने नागरिकांचे आभार मानले. तुमच्यामुळेच हा विजय शक्य झाला. धन्यवाद हिमाचल प्रदेश, असे ट्विट काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आले. हिमाचल प्रदेशमध्ये दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू, असे पक्षाचे नेते Rahul Gandhi राहुल गांधी यांनी सांगितले आहे.
 
 
Rahul gandhi
 
काँग्रेस आता तीन राज्यांमध्ये स्वबळावर आणि बिहार, झारखंड आणि तामिळनाडूत आघाडी करून सत्तेत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी हिमाचल प्रदेशच्या लोकांचे अभिनंदन केले असून, पक्षाच्या विजयाचे श्रेय त्यांनाच जात असल्याचे सांगितले आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे हिमाचल प्रदेशात मिळालेल्या विजयात मदत केली आहे. निवडणुकीत सोनिया गांधी यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी खडगे यांनी त्यांचे आभार मानले. हा एक लांबचा प्रवास असून, आम्ही एकत्र बसून पुढील मार्गा़वर चर्चा करू. या निर्णायक विजयासाठी हिमाचल प्रदेशातील जनतेचे मनापासून आभार मानतो, असे राहुल गांधी यांनी सांगितले. सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे हार्दिक अभिनंदन. या विजयामागे तुमची मेहनत आणि समर्पण खर्‍या अर्थाने आहे, असे हिंदीत केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे.
 
 
विजयाचे श्रेय प्रियांका वढेरांना
हिमाचल प्रदेशात मिळालेल्या विजयाचे श्रेय काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका वढेरा यांनी केलेल्या प्रचाराला दिले आहे. प्रियांका वढेरा यांनी हिमाचल प्रदेशात अनेक रॅलींमध्ये पक्षाचे नेतृत्व केले आणि निवडणुकीसाठी रणनीती आखण्यातही त्यांचा जवळून सहभाग होता. अनेक नेत्यांनी पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी आणि भाजपाच्या निवडणूक यंत्रणेचा पराभव करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
गुजरातमधील जनादेश मान्य
गुजरातमध्ये झालेला पराभव काँग्रेसने मान्य केला असून, या राज्यातील जनादेश नम्रपणे स्वीकारत असल्याचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. निवडणुकीत पराभव झाला असला तरी, लोकांच्या हक्कांसाठी तसेच देशाच्या आदर्शांसाठी लढत राहू, असे Rahul Gandhi राहुल गांधी यांनी सांगितले.