अस्सं सासर हवं गं बाई!

    दिनांक :09-Dec-2022
|
वेध
- प्रफुल्ल व्यास
समाजात खूप सार्‍या समस्या आहेत. त्या समस्यांना जो लिलया हाताळतो तो सध्याच्या परिस्थितीत खरा यशस्वी म्हणावा लागेल. गेल्या आठवड्यात राज्यातील प्रसिद्ध विचारवंत भाऊसाहेब तोरसेकर म्हणाले की, family system आपल्याकडे सर्व सुविधा आहेत; पण त्याचा वापर करता येत नाही, हीच खरी गोम आहे आणि ते सत्यही आहे. सध्या बाहेर आणि घरात दोन्हीही ठिकाणी कोलाहलच दिसून येतो आहे. बाहेर राजकारणाआड जातीयवाद आणि समाजकारणाआड राजकारण तर घरात सासू-सुना वगैरेंचे वाद नित्याचे होऊ लागले आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीने अनेक प्रश्न उपस्थित केले असले, तरी आजच्या पिढीलाही वेगळे राहायचे आहे आणि वृद्धही ‘मुलाबाळांना कशाला आपला त्रास’ म्हणून वेगळे राहण्याच्या मानसिकतेत आलेले आहेत. आताही उच्च कुळीन आणि उच्च शिक्षण घेतलेल्या विवाहयोग्य युवतींना आई-वडील असणारा नवरा नको आहे. दुसरीकडे मात्र तीच मुलगी आपल्या भावाच्या बायकोला आई-वडिलांचा सांभाळ करण्यासाठी आग्रही असते, असा विरोधाभास समाजात निर्माण झाला आहे. आजची पिढी कितीही सुधारली असली, तरी काही समाजात हुंडाबळी हा प्रकार दिसून येतो तर सासरचा उंबरठा ओलांडून दोन दिवस होत नाही तोच नवी नवरी दुसर्‍या कोणासोबत पळून जाते.
 
 
sa
 
एकंदरीत निसर्गदत्त सारंच काही बदलत चाललेलं आहे. कोणाचाही ताबा कोणावर राहिलेला नाही. कोणीच कोणाच्या भावनांचा आदर करण्याच्या मानसिकतेत राहिलेला नाही. नात्यांमध्ये व्यावहारिकतेने चंचुप्रवेश केला आणि कुटुंबव्यवस्थाच ‘अधू’ झाली आहे. कोणा एकाच्या कुबडीवर ती तेवढी तग धरून आहे, हेच काय ते समाधान! कीर्तनकार, प्रवचनकार, समाजसुधारक family system कुटुंब व्यवस्थेवर बोलतात. वक्ते चांगले बोलले म्हणून बाहेर निघाल्यावर बोलले जाते. परंतु, त्याचा प्रकाश मात्र मोजक्यांच्याही डोक्यात पडतो की नाही हा प्रश्नच आहे. आजकालच्या कीर्तन, प्रवचनांमध्येही कुटुंबव्यवस्था या विषयावर एखादा चिमटा घेतला जातो. सुनेने मुलीसारखे आणि सासूने आईसारखे वागण्याची अपेक्षा केली जाते. परंतु, या दोन्ही गोष्टी अपवादानेच पाहायला मिळतात. ज्या समाजात मायलेकीतच मतभिन्नता असते तिथे सासू-सुनांचे ‘गुण’ मिळण्याची काय अपेक्षा करावी? ‘घरोघरी मातीच्या चुली’ असा सारा प्रकार झाला आहे. family system यात फारसे नावीन्यही राहिलेले नाही. दूरदर्शनवरील मालिकांप्रमाणे वरपांगी सारं काही सुरळीत दिसत असले, तरी आत सारी धुसफूस सुरू असते. कारण माहेरी लेक असलेली मुलगी सून दुसर्‍या घरातून, वेगळ्या वातावरणातून आलेली असते आणि कालपर्यंत सुनेच्या भूमिकेत असलेली सासू झालेली असते. त्यामुळे हे सारं चालणारच आहे. हे विधिलिखित असल्याचे समजून संसाराचे रहाटगाडगे सुरू आहे. परंतु, यातही कुठे कुठे तप्त उन्हाळ्यात दूर कुठून तरी थंड हवा यावी आणि गारवा जाणवावा, असे काहीसे याच समाजात घडते आणि तो आदर्शवादी ठरतो.
 
 
महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी सासरच्यांनी मुलाचे निधन झाल्यानंतर तिला लेक समजून दुसर्‍या मुलासोबत विवाह लावून देण्याचे कर्तव्य पार पाडले आहे. असेच कर्तव्य उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथे पार पाडले. विधवा सुनेचा विवाह सासर्‍याने दुसर्‍या मुलासोबत लावूनच दिला नाही तर तिचे कन्यादानही केले. नुसतेच कन्यादान म्हणजे हातावर पाणीच सोडले नाही तर तिचा यथायोग्य सन्मान म्हणून तिला कार आणि लाखो रुपयांचे दागिनेही भेट दिले. लग्नानंतर मुलाने अवघ्या तीन महिन्यांनीच स्वत: गोळी झाडून आत्महत्या केली होती. एरवी पांढर्‍या पायाची वगैरे दूषणं देऊन तिचा अपमान करण्याचा प्रकार घडत असताना मुलाच्या निधनानंतर तिला मुलीसारखे सांभाळून लग्नासाठी तयार केले. तिच्या होकारानंतरच विवाह ठरवण्यात आला. ही सारी कथा त्या राज्यात घडलीfamily system  ज्या राज्यात महाराष्ट्रापेक्षा शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. ते राज्य म्हणजे उत्तरप्रदेश, जिल्हा सहारनपूर, गाव बडगाव आणि त्या विधवा सुनेच्या बापाचे नाव आहे जगपाल सिंग! समाजात मुलाच्या निधनानंतर सुनांवर अन्याय करणार्‍यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात असताना सुनाही पतीच्या निधनानंतर सासरच्या हिस्स्यासाठी वाद करतानाची अनेक उदाहरणं आहेत. पोटचा गोळा गेल्यानंतर त्याच्या संपत्तीवर हक्क सांगणार्‍या सुनाही आहेत आणि पती गेल्याच्या दु:खात असलेल्या सुनेला घराबाहेर काढून देणारे सासू-सासरेही याच मातीत आहेत. अशावेळी जगपाल सिंग पथदर्शी ठरतो... सासरच्यांना सांभाळून घेणारी सून अन् बाहेरच्या कुटुंबातून आलेल्या मुलीला सांभाळून घेणारे ‘अस्सं सासर हवं गं बाई...!’ तेव्हाच समाजव्यवस्था सुदृढ होईल, असे वाटते. 
 
- 9881903765