काँग्रेसवर होणार निवडणूक निकालांचा परिणाम!

    दिनांक :10-Feb-2022
|
दिल्ली वार्तापत्र
 श्यामकांत जहागीरदार
 
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे Election पहिल्या टप्प्यातील मतदान आज १० फेब्रुवारीला होत आहे. पहिल्या टप्प्यात फक्त उत्तरप्रदेशात आणि तेही पश्चिमी उत्तरप्रदेशातील ५८ मतदारसंघांत निवडणूक Election होत आहे. गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश अशा पाच राज्यांत ही निवडणूक होत असली, तरी यात पंजाब वगळता उर्वरित चारही राज्यांत भाजपाची सत्ता आहे. एकट्या पंजाबमध्येच काँग्रेसची सत्ता आहे. तशीही देशात इनमीनतीन म्हणायलाच जागा आहे. फक्त तीनच राज्यांत काँग्रेसची सत्ता आहे. यातील एक पंजाब तर उर्वरित दोन राजस्थान व छत्तीसगड.

indian-congress.jpg
 
सद्य:स्थितीत पंजाबमधील सत्ता कायम ठेवायलाही काँग्रेसला मोठा संघर्ष करावा लागत आहे. हा संघर्ष काँग्रेसला आपल्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांशी नाही तर काँग्रेसमधील विविध गटच एकदुस-याशी करीत आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता दूरदूरपर्यंत कुठे दिसत नाही. याहीउपर पंजाब टिकवण्यात काँग्रेसला यश आले तर तो मोठा राजकीय चमत्कारच म्हटला पाहिजे.
 
 
पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू तसेच प्रचार समितीचे प्रमुख सुनील जाखड असे तीन प्रमुख गट आहेत. पंजाबमधील निवडणूक Election काँग्रेसने चन्नी यांच्या नेतृत्वात लढविण्याची घोषणा केल्यामुळे सिद्धू आणि जाखड असे दोन गट नाराज झाले आहेत. सुनील जाखड यांनी तर राजकारण संन्यासाचीही घोषणा करून टाकली आहे. आपण दुस-या कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे जाखड यांनी सांगितले असले, तरी ते काँग्रेसचाही पाहिजे तसा प्रचार करणार नसल्याचे त्यांच्या विधानावरून जाणवत आहे.
सिद्धू काय करतील हे तर ते स्वत:ही सांगू शकत नाही. मात्र, सिद्धू कोणत्याही स्थितीत चन्नी यांना दुस-यांदा मुख्यमंत्री बनू देणार नाही, यात शंका नाही. यासाठी जे जे करणे आवश्यक आहे, ते करायला ते मागेपुढे पाहणार नाहीत. पंजाबमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा सत्ता मिळविता आली तर काँग्रेसमधील फूट टळू शकते, पण पंजाबमध्ये काँग्रेसने सत्ता गमावली तर पंजाब काँग्रेसमधील फूट अटळ आहे. सामान्यपणे प्रत्येकच राजकारणी हा महत्त्वाकांक्षी असतो. मात्र, सिद्धू जास्तच महत्त्वाकांक्षी आहे. या महत्त्वाकांक्षेतून ते भाजपा सोडून काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेसमध्ये महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नसेल तर त्यांच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये राहण्यात अर्थ उरत नाही. त्यामुळे सिद्धू काँग्रेसला रामराम ठोकून दुस-या पक्षात जाण्याचा मार्ग अवलंबू शकतात.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा पंजाब काँग्रेसवर जसा परिणाम होणार आहे, तसाच तो काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वावरही होणार आहे. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची प्रतिष्ठा या निवडणुकीतून Election पणाला लागली आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला समाधानकारक विजय मिळाला नाही, तर पंजाबप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावरही काँग्रेसमध्ये फूट पडली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यामुळे काँग्रेससमोर पंजाब कायम ठेवत गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या तीन राज्यांतील किमान आणखी एक राज्य मिळविण्याचे आव्हान आहे. पाचपैकी दोन राज्यांत काँग्रेसला सत्ता मिळविता आली तर काँग्रेसचे नेतृत्व आपल्याच हाताने आपली पाठ थोपटून घेऊ शकते. पण सध्या तरी काँग्रेसच्या हातात यातील एकही राज्य येण्याची शक्यता अतिशय कमी आहे.
 
काँग्रेसने पंजाब आपल्या हाताने गमावले तर उर्वरित चार राज्ये तर त्याची नव्हतीच. सत्ता असलेले राज्य काँग्रेसला टिकविता येत नसेल तर सत्ता नसलेली राज्ये काँग्रेस आपल्याकडे खेचून आणण्याची कल्पनाही करता येत नाही. पाच राज्यांतील निवडणूक Election निकालांचा प्रत्यक्ष परिणाम काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर होणार नाही. मात्र, याचा अप्रत्यक्ष फटका त्यांनाही बसणार आहे. राजकारणातील त्यांचा सूर्य मावळतीकडे चालला असल्याचे सर्वांना माहिती आहे. सर्वांनी तसे मान्यही केले आहे. काँग्रेसमध्ये आज नेतृत्व म्हणून ख-या अर्थाने राहुल गांधी आणि प्रियांका वढेरा सक्रिय आहेत. त्यातही प्रियांका वढेरा यांनी स्वत:ला गेल्या काही महिन्यांपासून उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत झोकून दिले आहे. प्रियांका वढेरा खरोखर उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेस पक्षासाठी खूप मेहनत घेत आहेत, यात शंका नाही. पण, त्यांच्या मेहनतीचा खूप जास्त परिणाम तेथे होण्याची शक्यता नाही. राज्यात काँग्रेस आधीही चौथ्या स्थानावर होती; आताही त्याच स्थानावर आहे. आतापर्यंत राज्यात जेवढ्या जनमत चाचण्या झाल्या, त्यातील एकाही चाचणीत काँग्रेसला १० पेक्षा जास्त जागा दाखवल्या नाही. एखाद्या ढ विद्यार्थ्याला परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी एखादा हाडाचा शिक्षक आपले सर्वस्व पणाला लावतो, तरीसुद्धा तो मुलगा नापास होतो; तशी स्थिती काँग्रेसची उत्तरप्रदेशात आहे. प्रियांका वढेरा यांची मेहनत म्हणजे पालथ्या घड्यावर पाण्यासारखी आहे.
उत्तरप्रदेशातील निवडणूक निकालाचा काँग्रेससोबत प्रियांका वढेरा यांच्या प्रतिमेवरही परिणाम होणार आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांनाही त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. जे राहुल गांधी करू शकत नाही, ते प्रियांका वढेरा करू शकतात, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. त्यामुळे अधूनमधून अगदी काँग्रेसचे अध्यक्षपदच नाही तर पंतप्रधानपदासाठीही त्यांच्या नावाची चर्चा केली जात होती. प्रियांका वढेरा या आतापर्यंत काँग्रेससाठी झाकली मूठ सव्वा लाखाची होत्या, पण त्यांची मूठही पोकळ असल्याचे उत्तरप्रदेशच्या निवडणूक Election निकालावरून दिसून येणार आहे.
राहुल गांधींच्या नावाची पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी चर्चा आहे. याआधी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या Election आधी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवत काँग्रेस पक्षाची पार वाट लावून टाकली होती. काँग्रेस पक्षातील संघटनात्मक निवडणुकीची Election प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया सप्टेंबरमध्ये पूर्ण होऊन ऑक्टोबरमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल, असे समजते. राहुल गांधींची या पदावर पुन्हा निवड करण्याचे जवळपास ठरले आहे. राहुल गांधींच्या नावाला आताच पक्षातील अनेक नेत्यांचा विरोध आहे. मात्र, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही राज्य जिंकता आले नाही, तर त्यांच्या नावाला असलेला विरोध वाढू शकतो. सध्या तरी राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी अविरोध निवड व्हावी, असा प्रयत्न आहे. पण काँग्रेसला किमान एक राज्यही जिंकता आले नाही तरी त्यांच्याविरोधात अध्यक्षपदासाठी बंडखोर गटातील एखादा नेता उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वातील ग्रुप २३ ने पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्यासाठी सोनिया गांधी यांना पत्र पाठविले असले, तरी त्यांना राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष करणे मान्य नाही. राहुल गांधींना सोडून कोणालाही अध्यक्ष करा, असे या गटाचे म्हणणे आहे. एखादवेळ हा गट प्रियांका वढेरा यांचे अध्यक्षपदही मान्य करेल; पण राहुल गांधींना अध्यक्षपदावर कदापि स्वीकारणार नाही. त्यामुळे अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासमोरील आव्हाने वाढणार आहेत.
राहुल गांधींनी आतापर्यंत पक्षाला एकही निवडणूक  जिंकून दिली नाही तसेच त्यांच्यामुळे पक्षाचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त झाले आहे. राहुल गांधींची मनमानी वागणूक आणि ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा विरोध वाढत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष करणे सोनिया गांधींसाठी सोपे नाही. या परिस्थितीतून त्या कसा मार्ग काढतील, ते येणा-या काळात दिसणारच आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या Election निकालाने काँग्रेसच्या आणि त्याच्या नेतृत्वाच्याही अडचणी वाढणार आहेत, यात शंका नाही.
९८८१७१७८१७