20 वा पिफ महोत्सवाच्या आभासी नोंदणीला सुरुवात

    दिनांक :15-Feb-2022
|
पुणे, 
फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 3 ते 10 मार्च दरम्यान आयोजित करण्यात येणार्‍या 20 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट 20th PIFF  Festival महोत्सवाच्या अर्थात् पिफ 2022 च्या नोंदणी प्रक्रियेला आज मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. तसेच यंदाचा पिफ चित्रपटगृहांबरोबरच आभासी माध्यमातून देखील आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.
 
20th PIF Festival
 
यंदाच्या पिफची थीम ही भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, चित्रपट क्षेत्रातील चतुरस्त्र व्यक्तीमत्व भारतरत्न सत्यजित रे आणि प्रसिद्ध गीतकार पद्मश्री साहीर लुधियानवी यांच्या जन्मशताब्दीवर आधारित असेल आणि त्यानुसार महोत्सवादरम्यान काही विशेष कार्यक्रम करण्यात येणार आहेत. तसेच 20 वा पिफ दिवंगत भारतरत्न लता मंगेशकर यांना समर्पित करण्यात येणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी आभासीपद्धतीने नोंदणी चित्रपट महोत्सवाच्या संकेत स्थळाच्या माध्यमातून करता येईल.