शेअरबाजाराचा योगीमय कारभार!

    दिनांक :15-Feb-2022
|
अग्रलेख
देशातील सर्वात मोठ्या शेअरबाजाराचा म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा (एनएसई) Nse कारभार आर्थिकतज्ज्ञ वा स्टॉक मार्केटमधील तज्ज्ञ चालवत नव्हते, तर हिमालयात बसलेले एक योगीमहाराज चालवत होते, ही पुढे आलेली माहिती धक्कादायकच म्हणावी लागेल. आपला देश अजूनही रामभरोसे म्हणजे भगवान भरोसे चालवला जात असल्याचे हे द्योतक म्हणावे लागेल. एनएसईचे Nse जॉईंट मार्केट कॅपिटल ४ ट्रिलियन डॉलर आहे. देशात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल शेअर बाजारात होत असते. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या Nse माजी प्रबंध संचालक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांच्या कबुलीजबाबातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. चित्रा रामकृष्ण यांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा केलेला हा सरळसरळ दुरुपयोग म्हटला पाहिजे.
 
nse.jpg
 
स्टॉक एक्स्चेंज वा शेअर बाजारावर देशातील बहुसंख्य लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे कष्टाची आणि घामाची कमाई मध्यमवर्ग लोक अधिक पैशाच्या आशेने शेअर बाजारात गुंतवतात. स्टॉक एक्स्चेंज Nse वा शेअर बाजाराचा कारभार भारतीय रिझव्र्ह बँक वा सेबीच्या नियमांनी आणि कायद्याच्या कसोटीवर शास्त्रशुद्धपणे चालवला जात असेल, असा आजवर लोकांचा समज होता. पण त्याला आता तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
खाजगी जीवनात चित्रा रामकृष्ण यांनी कोणाला आपला गुरू मानावे, कोणाचा आदर्श आपल्यासमोर ठेवावा, हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. आपल्या खाजगी जीवनातील सर्व निर्णय त्यांनी आपल्या गुरूंच्या आदेशावरून आणि सल्ल्यावरूनही घ्यायला हरकत नाही. अगदी लग्न करायचे की नाही, लग्न झाल्यावर मुलं होऊ द्यायची की नाही, मुलं झाली तर त्यांना कोणत्या शाळेत घालायचे हा तसेच असे अनेक निर्णय त्यांनी आपल्या हिमालयातील या गुरूंच्या, ज्यांचा उल्लेख त्या शिरोमणी असा करतात, सांगण्यावरून घेतले तर कोणाची हरकत राहण्याचे कारण नाही. त्यांनी आपल्या या महान गुरूंची सकाळ संध्याकाळ पूजा आणि आरती करायला तसेच त्यांना साष्टांग दंडवत घालयलाही हरकत नाही.
गेल्या २० वर्षांपासून चित्रा आपले सर्व खाजगी आणि व्यावसायिक निर्णयही या गुरूंच्या सांगण्यावरून घेतात. २०१३ ते २०१६ या काळात चित्रा रामकृष्ण या नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या Nse प्रबंध संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या काळात एनएसईशी Nse संबंधित आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय, डिव्हिडंडशी संबंधित निर्णय, त्याचे आर्थिक परिणाम आणि काही गोपनीय माहितीही त्यांनी आपल्या या गुरूला दिली. एनएसईमधील कर्मचा-यांची नियुक्ती, बदली आणि बढतीचे निर्णयही त्या या गुरुमहाराजांच्या सल्ल्याने घेत होत्या, असे समजते.
याच योगीबाबाच्या सल्ल्यावरून चित्रा यांनी आनंद सुब्रमण्यम यांची एनएसईचे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती केली होती. विशेष म्हणजे ही नियुक्ती पूर्णपणे बेकायदेशीर होती. कारण या पदावर नियुक्तीची कोणतीही पात्रता सुब्रमण्यम यांच्याजवळ नव्हती. योगींनी सांगितले म्हणून चित्रा यांनी त्यांचा पगार तीन पगारवाढी देत ४ कोटी रुपये केला. याशिवाय अन्य अनेक सोयीसुविधाही त्यांना मिळत होत्या. या नियुक्तीमुळे सुब्रमण्यम यांना एएसईमधील सर्व महत्त्वाची आणि गोपनीय माहिती सहजपणे उपलब्ध होऊ लागली. त्याचा त्यांनी दुरुपयोग केलाच नसेल, असे म्हणता येत नाही.
चित्रा रामकृष्णा यांची नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या Nse प्रबंध संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्यामुळे या पदावर नियुक्तीसाठी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता आणि व्यावसायिक पात्रता त्यांच्याजवळ असेल, असे आपण समजून घेऊ शकतो. मात्र आपल्या शैक्षणिक ज्ञानाचा, व्यावसायिक अनुभवाचा कोणताही उपयोग न करता चित्रा यांनी आपली संपूर्ण बुद्धी या योगीमहाराजांच्या चरणी अर्पण का केली, असा प्रश्न उद्भवतो. एकतर चित्रा यांचा स्वत:वरच विश्वास नसेल वा योगी महाराजांवर स्वत:पेक्षा अधिक विश्वास असेल. चित्रा रामकृष्ण यांची वागणूक म्हणजे एखाद्या निष्णात डॉक्टरकडे एखादा रुग्ण आल्यानंतर त्याने त्या रुग्णावर आपले वैद्यकीय ज्ञान आणि अनुभवाच्या आधारावर उपचार न करता त्याला झाडफुंक करणा-याकडे पाठवल्यासारखे म्हणावे लागेल.
चित्रा यांच्या हिमालयातील या महान गुरूंची माहिती समोर आली नाही, आतापर्यंत त्या आपल्या या गुरूंना एकदाही भेटल्या नसल्याचे या वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे त्यांची या गुरूंशी ओळख कशी झाली, गुरूंवर त्यांचा एवढा विश्वास कसा बसला, त्या आपल्या या गुरूंशी संपर्क आणि संवाद कसा साधत होत्या, असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात. या योगींचा आणि चित्रा रामकृष्ण यांचा संवाद आणि संपर्क ईमेलच्या माध्यमातून होत होता असे समजते. तीन वेदांच्या सुरुवातीच्या अक्षरांनी या योगींची मेलआयडी होती, असे म्हणतात. मुळात हे योगी हिमालयातील होते, तर त्यांच्याजवळ लॅपटॉप होता का? गेलाबाजार मोबाईत तरी होता का? मोबाईल आणि लॅपटॉप असेल तर त्याला आवश्यक असणारे नेटवर्क त्यांना हिमालयात कसे मिळत होते, असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होतात. चित्रा रामकृष्ण यांच्या या अव्यापरेषू प्रकाराची सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने म्हणजे सेबीने दखल घेतली, त्यांची चौकशी केली, त्यामुळे हा सारा प्रकार पुढे आला. अन्यथा एनएसईचा Nse सारा कारभार नेहमीसाठी रामभरोसे म्हणजे भगवान भरोसे चालला असता.
हिमालयातील या तथाकथित योगीमहाराजांना क्षणात कुठूनही कुठे जाण्याची आणि प्रकट होण्याची सिद्धी प्राप्त होती, असे म्हणतात. चित्रा यांनी या योगी महाराजांना कधी पाहिले नाही, असे म्हणतात, मग हे योगीबहाराज खरोखरच अस्तित्वात आहेत का, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. योगी महाराजांच्या धार्मिक आणि आध्यात्मिक शक्तीबद्दल आम्हाला शंका असण्याचे कारण नाही. पण आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच त्यांना शेअर बाजाराचेही सर्व ज्ञान होते का, आणि असेल तर ते कसे आले, असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे उत्तर चित्रा रामकृष्ण यांच्याजवळ आहे का?.
या योगी महाराजांनी आनंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती करायचा सल्ला चित्रा रामकृष्ण यांना दिला आणि तो त्यांनी शिरोधार्य मानला. म्हणजे हे योगी महाराज आणि आनंद सुब्रमण्यम यांची आधीची ओळख होती का, असेल तर कशी होती, योगींनी सुब्रमण्यम यांना एवढे झुकते माप देण्याचे कारण काय? त्याचप्रमाणे योगी, रामकृष्ण आणि सुब्रमण्यम यांच्या अभद्र युतीने शेअरबाजारात सर्वसामान्य माणसाचे किती अर्थिक नुकसान केले, याचाही सेबीने आता शोध घ्यायला हरकत नाही.
सेबीने या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि चित्रा रामकृष्ण यांच्यासोबत आनंद सुब्रमण्यम, तसेच एनसईचे Nse आधीचे प्रबंध संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रविनारायण तसेच आणखी एकावर काही कोटींचा दंड ठोठावला आहे. मुळात या सा-या प्रकरणात नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे जे प्रतिमाहनन झाले, त्याची भरपाई यातून होणार आहे का? नाही म्हटले तर चित्रा रामकृष्ण यांनी आपल्या वागणुकीने लोकांचा विश्वास काही प्रमाणात गमावला आहे. चित्रा रामकृष्ण यांना ३ कोटींचा दंड करण्यात आला, याशिवाय त्यांना त्यांच्या अतिरिक्त सुट्ट्यांसाठी १ कोटी ५४ लाख तसेच डिफर्ड बोनस म्हणून दिलेले २ कोटी ८३ लाख रुपये परत घेण्याचे आदेशही सेबीने दिले आहेत. मुळात ज्या योगींना आपण दिलेल्या सल्ल्याचे पालन केल्यामुळे आपल्या शिष्येला काही कोटी रुपयांचा दंड होईल, हे आपल्या दिव्यदृष्टीने आधी समजू शकले नाही, त्याच्याजवळ शेअरबाजाराला दिशादर्शन करण्याचे ज्ञान असेल, यावर कसा विश्वास ठेवता येईल.
मुळात हा सारा प्रकार उघड कसा झाला, ते पाहणे महत्त्वाचे आहे. याबाबतची तक्रार सेबीकडे कोणी केली, हे आतापर्यंत समजू शकले नाही. मात्र या तक्रारीची दखल घेत सेबीने या प्रकरणाची कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता जी निष्पक्ष आणि सखोल चौकशी केली, त्याबद्दल सेबीचे अभिनंदन केले पाहिजे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज Nse आणि शेअर बाजाराच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची जी जबाबदारी सेबीवर सोपवण्यात आली, त्याला सेबी न्याय देत असल्याचे म्हणावे लागेल. आपल्या देशात नॅशनल स्टॉक एक्स्चेंज Nse असो वा अन्य कोणत्याही संस्था त्याचा कारभार किती अव्यावहारिक पातळीवर आणि भोंगळपणे चालवला जातो, ते यातून दिसून आले आहे. भविष्यात तरी अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची खबरदारी आपल्या देशातील सर्व नियामक संस्थांना घ्यावी लागणार आहे, हाच या प्रकाराचा शोध आणि बोध म्हणावा लागेल.