विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान, खच्चीकरण व शिक्षकांची भूमिका !

    दिनांक :23-Feb-2022
|
संवाद
रविबाला काकतकर
 
प्रसिद्ध विचारवंत प्राध्यापक कै. ग. प्र. प्रधान एका समारंभात स्वतःच्या लहानपणीची आठवण सांगत होते. इंग्रजीत चांगले गुण मिळाल्याबद्दल बक्षीस म्हणून ‘इप्सेन' या प्रसिद्ध नाटककाराचे पुस्तक देताना, माझे इंग्रजीचे शिक्षक Teacher एक महत्त्वाचे वाक्य म्हणाले, ‘‘तू बी. ए. ला इंग्रजी विषय घ्यावास म्हणून तुला हे पुस्तक भेट देत आहे.'' माझ्या ते कायम स्मरणात राहिले. कॉलेजमध्ये मी खरेच इंग्रजी विषय घेऊन बी. ए. झालो. वेळोवेळी या शिक्षकांना Teacher भेटत राहिलो. मला इप्सेन उत्तमप्रकारे समजेपर्यंत ते कळत-नकळत प्रोत्साहन देत राहिले. आयुष्याला विधायक वळण देणाऱ्या प्रधान सरांच्या या शिक्षकांसारखे Teacher अनेक शिक्षक आजही विद्यार्थ्यांची आयुष्ये घडवत असतात, हे वास्तव आहे. अनेकदा जाणीवपूर्वक प्रसंगी, खिशाला तोशीस लावून वैयक्तिक वेळ खर्च करून हे कार्य ते, अत्यंत तन्मयतेने करीत असतात. पुण्या-मुंबईसारख्या महानगरपालिकेच्या शाळांमधले तसेच आदर्श शिक्षक दासले यांच्यासारख्या ग्रामीण भागातल्या खेड्यांमधलेही काही शिक्षक स्वत:च्या घरी मुला-मुलींची अगदी राहण्याची सोय करूनदेखील अतिशय प्रामाणिकपणे शाळेव्यतिरिक्त मुलांना शिकवीत असतात. म्हणूनच, भारतातल्या मुलांची बुद्धिमत्ता कायमच जागतिक स्तरावर वाखाणली जाते.
 
teacher-with-students.jpg
 
तरीही एक दुर्दैवी बाब आवर्जून मांडावीशी वाटते. मुलांच्या घडणीइतकाच मुलांच्या खच्चीकरणातही शिक्षकांचा Teacher मोठाच वाटा असतो! आपल्या शालेय जीवनातील काही घटनांचे स्वतः जरी स्मरण केले तरी जाणवेल की, नकोशा वाटणाऱ्या अनेक प्रसंगांचे ओरखडे आजही कायम आहेत. शिक्षकांनी वर्मी घातलेले घाव विद्यार्थ्यांच्या जीवनाला वेगळे वळण लावणारे ठरतात. हे शिक्षक Teacher जो विषय शिकवितात, त्या विषयांबद्दल नावड उत्पन्न होणे, अनेकदा शाळेतही जाऊ नये असे वाटण्याइतका मनःस्ताप मुलांना होतो.
 
 
संपूर्ण वर्गासमोर झालेल्या अपमानामुळे मूल खूप खचते. शाळेच्या कुठल्याच कार्यक्रमामध्ये भाग न घेण्याइतके निराश होते. वर्गातल्या मुलांकडून त्याची टर उडविली जाते. शिक्षकांकडून अगदी सहज म्हणून केलेल्या कॉमेंट्स किंवा भर वर्गासमोर केलेल्या टीकेचे परिणाम मुलांच्या मनावर चांगलेच कोरले जातात. ते प्रसंग पुन:पुन्हा आठवले जातात. कधी शिक्षकांच्या ती बाब स्मरणातही नसते. कधी त्या विद्यार्थ्यांने तसा अर्थ करून घेतलेला असतो. परंतु, अनेकदा मुले सुधारावीत, जिद्दीने त्यांनी वर येण्याचे आव्हान स्वीकारावे, म्हणून मी मुद्दामच तसे बोललो, असे म्हणणारेही शिक्षक असतात. क्वचित अपेक्षित परिणाम साध्य होतही असतील; परंतु विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानाच्या म्हणजेच मुलांनी स्वत:चा आदर करण्याच्या अत्यंत आवश्यक अशा प्रक्रियेत पालकांनंतर शिक्षकांचे योगदान मोठे असते, याची अधिक जाणीव शिक्षकांना होणे गरजेचे आहे. आपल्या साध्या बोलण्याकडे, आपल्या स्वत:च्याही वर्तणुकीकडे शिक्षकांनी अधिक डोळसपणे बघणे निश्चितपणे आवश्यक असते. मुलांच्या स्वप्रतिमा (Self-esteem) किंवा आत्मप्रतिष्ठा घडविण्यासाठी अधिक सजगपणाने शिक्षकांनी Teacher प्रयत्न करावेत यासाठी हा लेखनप्रपंच.
 
स्टीव्हन ग्लेन हा लेखक तिसरीत असताना मिस हार्डी नावाची एक शिक्षिका त्याच्या आयुष्यात आली. एका इयत्तेतून दुसऱ्यात जाताना पहिला शिक्षक मुलाची प्रगती याबाबत स्वतःचे भाष्य मुलाच्या प्रगती पुस्तकात नोंदवतो. दुसऱ्या इयत्तेतला शिक्षक, Teacher त्याची कुठलीही शहानिशा न करता, डोळे मिटून त्या मुलाला त्याच्या दोष आणि मर्यादांसकट स्वीकारतो. त्यात पुन्हा आपल्या स्वत:च्या भाष्याची भर घालतो. आता मूल या नव्या लेबलांसकट पुढच्या वर्गात ढकलले जाते. स्टीव्हनबाबत असे व्हायचे की, त्याला फळ्यावरचे नीट दिसायचे नाही. त्यामुळे तो अभ्यासात मागे पडू लागला. त्याच्या या दृष्टिदोषाच्या मुळाशी न जाता, डोळे अधू असल्याचा शिक्षकांचा शेरा घेऊन तो दुसऱ्या इयत्तेत गेला. नव्या शिक्षकांच्या Teacher पूर्वग्रहदूषित वागण्यामुळे स्टीव्हन आता तोतरेही बोलू लागला! त्याच्या मानसिकतेशी असलेल्या तोतरेपणाच्या संबंधात लक्ष न घालता शिक्षकांनी डोळ्यांनी अधू आणि तोतऱ्या स्टीव्हनला तिसऱ्या इयत्तेत ढकलले. या वर्गाची वर्गशिक्षिका मिस हार्डी होती.
 
आल्या दिवसापासून प्रत्येक मुलाच्या मर्यादा, दोष याचा नीट अभ्यास करून तिने, त्यांच्या पालकांशी मुलांच्याही नकळत संवाद साधला. मुलांच्या कोणत्याही अपंगत्वावर लक्ष केंद्रित न करता, प्रत्येकाची बलस्थाने तिने जाणून घेतली. ही मुले कोणती कार्ये उत्तम करू शकतात, याचा शोध घेत असताना, तिला जाणवले की, स्टीव्हनची स्मरणशक्ती दांडगी आहे. वाचताना त्रास झाला तरी त्याची समज उत्तम आहे. एक दिवस ती काचेच्या स्वच्छ गोट्या घेऊन आली. वर्गात उत्तर देताना त्या तोंडात ठेवूनच बोलण्याचा तिने स्टीव्हनला आग्रह केला. थोड्या सरावानंतर आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर स्टीव्हनचा तोतरेपणा पूर्ण नाहीसा झाला. पुढे काही वर्षांनंतर अनेक संसद सदस्य, विविध नेते, काही उद्योगपती असे मिस हार्डीचे सर्व विद्यार्थी, त्या आजारी असल्याचे समजल्यावर देखभाल करण्यासाठी जमले असताना, सर्वांच्या शेअरिंगमधून असे जाणवले की, या प्रत्येक विद्यार्थ्यांला आयुष्यातून उठण्याच्या नेमक्या क्षणी मिस हार्डीने इतके बळ दिले होते की, त्यांच्या आयुष्याला पूर्ण सकारात्मक कलाटणी मिळाली. कृतज्ञतेच्या भावनेने जमलेल्या या विद्यार्थ्यांना मिस हार्डी म्हणजे एक आदर्श शिक्षक Teacher कसा असावा, याचे उत्तम उदाहरण होते.
 
विद्यार्थ्यांना इतर जण कसे वागवतात, यापेक्षा त्याला स्वतःला, स्वतःबद्दल कसे वाटते, ते जाणणे आणि त्यावर काम करणे, हे शिक्षकांनी Teacher महत्त्वाचे मानायला हवे. हे वाटणे मुलांसाठी खूप अभिमानाचे असते. आपण कोणीतरी वेगळे आहोत, सर्वांपेक्षा माझ्यात काही विशेष गुण आहेत, हे मुलांना जाणवून देण्यामुळे मुलांच्या इतर क्षेत्रातल्या कामगिरीवर मोठाच परिणाम होतो. याच बरोबरीने मुले आत्मकेंद्रित, अहंकारी होत नाहीत ना, वागणे बोलणे, उद्दामपणाचे होत नाही ना, या सीमारेषा सांभाळणेही तितकेच आवश्यक असते.
 
असे नेमके परिणाम साधण्यासाठी शिक्षक प्रयत्नपूर्वक काय काय करू शकतात यासाठी काही उपाय आणि निष्कर्ष अमेरिकेच्या self esteem असोसिएशनचा प्रेसिडेंट आणि हायस्कूल कौन्सेलर J. D. Hawkins आणि विविध विचारवंतांच्या व शिक्षणतज्ज्ञांच्या अभ्यासातून मांडले गेले. आपला आत्मसन्मान आणि यशापयश यांचा खूप जवळचा संबंध असतो. आपल्याला स्वतःबद्दल खूप चांगलं वाटत असताना आपल्या हातून अनेक कार्ये उत्कृष्ट घडू शकतात. यासाठी शिक्षकांसाठी Teacher विचारवंतांनी सुचविलेले काही उपाय असे- नकारात्मक वाक्ये, टीका यांचा वापर कटाक्षाने टाळावा.
 
स्पेलिंगमध्ये चुका करू नका, अशा सूचना शंभर वेळा करण्यापेक्षा प्रत्येक स्पेलिंग चपखलपणे लिहा, अक्षर घाणेरडे, गिचमिड नको, असे म्हणण्यापेक्षा सुंदर ओळींमध्ये निबंध लिहा, आकृत्या स्वच्छ काढा, मोत्यासारखे अक्षर काढा या शब्दांचा वापर मुलांच्या मनावर अधिक ठसतो. नेमक्या शब्दांचा वापर केला तर हवी ती प्रगती, कमीत कमी वेळात विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणणे शक्य आहे. शब्द उच्चारल्याबरोबर ती प्रतिमा ऐकणाऱ्याच्या डोळ्यांसमोर निर्माण होते. म्हणून जो परिणाम हवा त्याचेच केवळ नेमके चित्र उभे राहील, असे शब्द शिक्षकांनी Teacher सजगपणे निवडणे अत्यंत गरजेचे असते. नकारात्मक शब्दांमधून नेमके उलटे संकेत मुलांवर ठसतात.
 
परीक्षेत अपयश आले म्हणजे मी जीवनात अपयशी ठरलो, हे समीकरण नव्हे. हा समज त्या नाजूक क्षणी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविला जाणे अतिशय महत्त्वाचे असते. शिक्षकांनी मुलांना समजून घेणे, उमेद देणे खूप गरजेचे आहे. आयुष्यात चढ-उतार येतात; त्याचाच हा एक भाग असतो. हा संदेश पूर्ण वर्गासमोर दिला गेल्यास इतर मुलांकडून चिडविले जाणे टाळू शकते. तसेच, सर्वच मुलांची स्वतःच्या अपयशाकडे बघण्याची एक वेगळी मानसिकता तयार करता येते.
 
‘या परीक्षेची, भाषणाची जबाबदारी तू घे. तुला मदत लागली तर मी आहेच.' असे सकारात्मक संवाद वापरावेत. मुलांना त्यांच्या कृतीची, निर्णयांची जबाबदारी स्वतः घेण्यास प्रवृत्त करावे. अगदी पहिल्या इयत्तेपासून, मुलेही या उपायाला उत्तम प्रतिसाद देतात. पालक, शिक्षक मुलांच्या कृतीची जबाबदारी स्वतःवर घेतात. त्यामुळे मुले अधिकाधिक बेफिकीर होतात.
 
आपल्या शाळेच्या दहावीचा रिझल्ट १०० टक्के लागावा यासाठी अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना कसे प्रवृत्त करावे/ कसे करू नये यासाठीचे उदाहरण असे देता येईल, तुमच्यामुळे शाळेच्या रिझल्टचा अगदी निक्काल लागेल म्हणून आतातरी अभ्यास करा, असे सर्व वर्गासमोर कच्च्या मुलांना सांगितले गेल्यास- लागेना का शाळेचा निकाल काहीही- आम्हाला काय त्याचे? ही भावना वाढीला लागू शकेल. यापेक्षा तुम्ही चांगल्या मार्कांनी पास झाल्यास, आम्हाला प्रत्येकाला तुमचा अभिमान वाटेल आणि शाळेचा रिझल्ट १०० टक्के लागण्यामध्ये तुमचा केवढा मोठा वाटा असेल. तुम्ही हरप्रकारे, आता कामाला लागा. वर्गातील हुशार मुलांकडून मार्गदर्शन घ्या. शिवाय आम्ही सर्व शिक्षक Teacher तुमच्या मदतीला आहोतच. तुमच्यातला प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या प्रगतीला जबाबदार आहे. त्यासाठी आत्ता काय करता येईल, यावर लक्ष केंद्रित करूया. अशा प्रकारच्या संवादांनी तसेच रिझल्टनंतरचे सुंदर चित्र आताच प्रभावीपणे उभे करण्यामुळे, मुले स्वतःच अधिक अभ्यास करण्यास प्रेरित होतील. त्यांची ही स्वयंप्रेरणा खूप मोलाची आहे.
 
अपयशांनी, नैराश्यांनी खचलेल्या विद्यार्थ्यांना त्याच्या आत्तापर्यंतच्या सर्व छोट्या-मोठ्या यशाची आव्हाने, स्वीकारलेल्या क्षणांची यादी करायला सांगावे. यामध्ये पहिलीत चित्रकलेत मिळालेले बक्षीस, नाटकात काम करण्याची संधी, सोसायटीच्या गणेशोत्सवामध्ये मिळालेले प्रशस्तीपत्रक यासारख्या सर्व यशाची नोंद करायला सांगावी. पूर्वी आपण यश मिळविले आहे, तेव्हा आत्ताही मिळवू शकू, ही उमेद वाढण्यास यामुळे नक्कीच मदत होते.
 
दोष, टीका करणे हे व्यक्तिगत असावे. सर्व वर्गासमोर मुलांच्या उणिवा काढण्यापेक्षा त्या मुलाला वर्गापूर्वी किंवा नंतर वेगळे बोलावून सुधारणा घडवून आणण्याबाबत सांगणे अधिक परिणामकारक ठरते. कोणच्याही वयाच्या मुलाला आदराने वागविल्यास त्या मुलाची आत्म-आदराची भावना जोपासली जाते. अन्यथा सर्वांसमोर केलेला उपहास, निर्भत्र्सना मुलांच्या मनावर विपरीत परिणाम करून जातात, याचे भान शिक्षकांनी ठेवणे अत्यंत मोलाचे आहे. मुलांचे खच्चीकरण करण्यापेक्षा त्याची उमेद वाढविणे हा सकारात्मक उपाय आहे.
 
मुलांचा स्वतःबद्दलचा आदर उंचाविण्याच्या रचनात्मक कार्यासाठी शिक्षक स्वतः एक अनुकरणीय अशी आदर्श व्यक्ती मानली जाते. म्हणून मुळात त्यांनी स्वत:बद्दलचा आदर वाढविणे खूप प्रयत्नपूर्वक करायला हवे. मी काय फक्त प्राथमिक शिक्षकच Teacher तर आहे; मी काय करणार? किंवा आम्ही काय नगरपालिकेच्या शाळेतले शिक्षक! आमचे काय? अशी नकारात्मक भाषा सर्वांसमोर आणि त्याहीपेक्षा स्वत:च्या स्व-संवादात वापरणे शिक्षकांनी सर्वप्रथम थांबवावयास हवे. मुलांच्या घडणीचे, संस्काराचे एक महत्त्वाचे कार्य मी माझ्यापरीने करतो आहे आणि मला त्यात खूप आनंद वाटतो, अशी भावना शिक्षकांनी स्वतः जोपासल्यास मुलांच्या जडणघडणीचे कार्य ते अधिक प्रभावीपणे करू शकतील. अखेर संपूर्ण पिढीची जबाबदारी तसेच राष्ट्र उभारणीच्या कार्यामधले शिक्षकांचे योगदान अतिशय मोलाचे आहे. त्यांच्या या कार्याला सलाम!