युद्ध कुणामध्ये? झळा कुणाला?

    दिनांक :26-Feb-2022
|
अग्रलेख
युद्धाने सर्व समस्या सुटतील, असा तर्क काढून रशियाने युक्रेनवर Ukraine हल्ला चढवला असेल तर त्यातून त्या देशातील राज्यकत्र्यांची वैचारिक निर्बुद्धताच सिद्ध होणार आहे. उपलब्ध सर्व राजनयिक आयुधांचा, चर्चांचा मार्ग न स्वीकारता थेट युक्रेनवर Ukraine स्वारी करण्याचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा निर्णय विध्वंसकच म्हणायला हवा. युद्ध रशिया आणि युक्रेनमध्ये पेटले असले तरी त्याच्या झळा संपूर्ण जगाला बसू लागल्या आहेत. आत्ता कुठे युद्धाचा दुसराच दिवस असताना तेलाचा भाव बॅरलला शंभर डॉलरच्या वर गेला असून, तो आणखी वर जाण्याची शक्यता आहे. तेल महाग झाले की महागाई आणखी वाढत जाते. ज्याचा परिणाम जगातील प्रत्येक देशाला आणि नागरिकाला भोगावा लागणार आहे.
 
Ukraine-war.jpg
 
जग नुकतेच कोरोना महामारीशी दिलेल्या झुंजीनंतर सावरण्याच्या स्थितीत आले असताना या युद्धाने साऱ्या जगाला पुन्हा एकदा चिंताक्रांत करून टाकले आहे. खनिज तेलाच्या किमती कडाडाल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्याशिवाय रहायच्या नाहीत. युद्धाने जागतिक महाशक्तींमध्येही संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, स्पेन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, इटली, जर्मनी, तुर्कस्तान, इस्टोनिया, लॅटव्हिया, लिथुआनिया, चेक प्रजासत्ताक, फिनलंड, नॉर्वे आदी देशांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून, चीन, बेलारूस, अझरबैजान, उत्तर कोरिया, इराण, आर्मेनिया, कझाकस्तान, किर्गिझीस्तान आणि ताजिकिस्तान हे देश रशियाच्या मागे ठामपणे उभे झाले आहेत.
 
 
रशिया आणि युक्रेन Ukraine यांच्यातील वादाचे मूळ नाटो आहे. नाटो अर्थात नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनची सुरुवात १९४९ मध्ये झाली. रशियासाठी नेहेमीच समस्या असलेल्या नाटोमध्ये युक्रेनला सहभागी व्हायचे आहे. पण युक्रेन Ukraine नाटोमध्ये सहभागी झाल्यास नाटो देशांचे सैन्य थेट आपल्या सीमेजवळ येऊन पोहोचेल, अशी रशियाला भीती आहे. त्यामुळेच त्यांचा युक्रेनच्या निर्णयाला ठाम विरोध आहे. रशियाच्या मते युक्रेन हा सार्वभौम देश नसून, तो एक कठपुतळी आहे. रशियाला वाटते की युक्रेनने नाटोचे सदस्यत्व स्वीकारू नये, स्वतःचे निःशस्त्रीकरण करावे आणि एक तटस्थ राष्ट्र म्हणून भूमिका अदा करावी. पण रशियाचा दबाव युक्रेनने झुगारून लावला आहे. माजी सोव्हिएत प्रजासत्ताक म्हणून युक्रेनचे रशियाशी अजूनही घट्ट सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. तथापि, २०१४ मध्ये रशियाने केलेल्या आक्रमणानंतर उभय देशांचे संबंध तणावाचे झाले असून, त्यातूनच आजचा युद्धाचा भडका उडाला आहे.
जागतिक राजकारणात रशिया एक महाशक्ती आहे, हे कुणीच नाकारलेले नाही. पण त्यामुळे त्या देशाला कसेही वागण्याचा हक्क मुळीच मिळत नाही. आज रशियाने युक्रेनवर Ukraine स्वारी केली तर उद्या चीनही शेजारी तैवानविरुद्ध असाच हेकेखोरपणे कारवाई करेल आणि जगापुढे चिंता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. जगात सध्या संक्रमणाचा काळ सुरू आहे. अनेक देशांना मंदीचा सामना करावा लागत आहे. उद्योगधंदे बुडाल्याने ठिकठिकाणी बेरोजगारीच्या प्रश्नाने तोंड वर काढले आहे. अशात जगावर युद्ध लादणे परवडणारे नाही. रशियासारखा शक्तिशाली देश जरी युद्धासारखी कुरापत काढून जगाला युद्धाच्या वातावरणात लोटू पाहात असेल तर त्याचा सर्व शक्तिनिशी विरोध केलाच जायला हवा. तसेही रशियाने केलेल्या हल्ल्याचे परिणाम त्याला भोगावेच लागणार आहेत. या देशावर कठोर निर्बंध लावण्याची घोषणा युरोपीय महासंघाने केली आहे. निर्बंध कशाप्रकारचे असतील ते येत्या काळात स्पष्ट होईल. तथापि, रशियाच्या या कृतीमुळे निश्चितच युरोपातील स्थैर्याला आणि शांततेला धक्का पोहोचला आहे. एकीकडे अनेक देशांनी रशियाचा निषेध केला असताना जागतिक सत्ताकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चीनने मात्र रशियाची साथ दिलेली दिसत आहे.
रशियाने केलेल्या हल्ल्यात दोनच दिवसात युक्रेनची Ukraine वाताहत झाली. सुरक्षित स्थळी जाण्यासाठी सर्वत्र धावपळ सुरू असल्याचे चित्र या देशाच्या राजधानीत आहे. लोकांनी अन्नधान्याचा साठा करायला सुरुवात केली आहे. पण काही तासातच सर्व किराणा मालाची दुकाने रिकामी झाल्याने नागरिकांपुढे अन्नधान्याची समस्या उद्भवणार हे निश्चित. युक्रेनमध्ये Ukraine मोठमोठ्या इमारती दिमाखाने उभ्या दिसतात. गुळगुळीत रस्ते आणि त्यावर धावणा-या वेगवान गाड्यांनी डोळे दीपून जातात. सुबत्ता इतकी की दुचाकी वाहने आणि सायकली तर रस्त्यांवर दिसतच नाहीत.
 
सगळ्यांजवळ आलीशान महागड्या गाड्या आहेत आणि येथील वैद्यकीय महाविद्यालये देशाची शान आहेत. भारतातून दरवर्षी वैद्यकीय शिक्षणासाठी हजारो मुले युक्रेनमध्ये जातात. आजघडीला सुमारे १८ हजार भारतीय विद्यार्थी या देशात अडकलेले असून, त्यांना भारत सरकार मायदेशी नेण्यासाठी काहीतरी पावले उचलेले अशी आशा आहे. युक्रेन Ukraine संपन्न राष्ट्र असले तरी त्यांच्याकडे लष्करी ताकद, सशक्त सेना, अत्याधुनिक शस्त्रास्त्रे यांचा अभाव आहे. शिवाय राष्ट्रभावनाही शुन्यात जमा असल्याने, नेमका याचाच फायदा रशियाने घेतला आणि अगदी काही तासात युक्रेनला मान तुकवायला भाग पाडले. युक्रेनचे सैनिक पळून गेले असून, राष्ट्रपती नागरिकांना युद्धासाठी आवाहन करताना दिसत आहेत.
 
नागरिकांवरील सारे निर्बंध युक्रेनने उठवले असून, त्यांना युद्धासाठी सर्व प्रकारची शस्त्रास्त्रे उपलब्ध करून देण्याची तयारीही दर्शविली आहे. पण या देशातील नागरिकांमध्ये इस्रायली नागरिकांसारखी देशप्रेमाची भावनाच नसल्याने कुणीही नागरिक युद्धासाठी पुढे येण्यास धजावलेला नाही. ऐशोआरामाचे जीवन जगण्यात धन्यता मानणाऱ्या या देशातील सर्व बाजार, शाळा, महाविद्यालये, कार्यालये, कंपन्या बंद झाल्या असून, सारा व्यवहारच ठप्प झालेला बघायला मिळत आहे. भारत ज्या ज्या वेळी शस्त्रास्त्रे खरेदी करतो अथवा अत्याधुनिक विमाने, तोफांची, रणगाड्यांची खरेदी करतो, त्या-त्यावेळी आपल्या देशाला शस्त्रास्त्रांचे भांडार बनवणार का? असे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांच्या डोळ्यात युक्रेनच्या Ukraine परिस्थितीने झणजणीत अंजन घातले गेले आहे. आज हा देश शस्त्रसंपन्न असता, देशातील सैनिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत असती, तर देशाच्या राष्ट्रपतींना नागरिकांपुढे हात पसरण्याची वेळ आलीच नसती.
युक्रेन Ukraine स्वतंत्र राष्ट्र आहे, त्याने कुणाशी संबंध ठेवायचे, कुणाशी नाही, हे ठरवण्याचा त्यांना अधिकार आहे. पण रशियाला हे मान्य नाही. त्याला युक्रेनचे मांडलिकत्व हवे आहे आणि आजचा युक्रेन Ukraine हे मान्य करण्यास तयार नाही. दन्येत्स्क आणि लुहान्स्क या प्रांतांना स्वायत्त प्रदेश म्हणून मान्यता देण्याची पुतिन यांची मागणी आहे. युद्धानंतर जेव्हा तह होईल, तेव्हा या दोन्ही प्रांतात पुतिन यांचा माणूस सत्तास्थानी बसेल. यानिमित्ताने रशियाचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्याचे रशियाचे प्रयत्न आहेत. पण ते आजतरी यशस्वी होण्याची चिन्हे नाहीत. युक्रेन Ukraine आणि भारताचे संबंध फारसे मित्रत्वाचे आहेत असे म्हणता येणार नाही. या देशाने काश्मीर मुद्यावर भारताविरुद्ध मतदान केले आहे. अणू चाचणीच्या वेळीही या देशाने भारतविरोधी भूमिका घेतली होती.
 
संयुक्त राष्ट्र सुरक्षा संघात भारताच्या स्थायी सदस्यत्वालाही या देशाने विरोध केला होता. हा देश पाकिस्तानचा शस्त्रपुरवठादार असून अल् कायदाचाही समर्थक आहे. पण जागतिक शांततेसाठी भारत झाले-गेले विसरून युक्रेनच्या पाठिशी उभा राहिला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना फोन करून सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी तेथे अडकून पडलेल्या भारतीयांच्या सुरक्षेचाही मुद्दा उपस्थित केला आहे. युद्धामुळे सोन्याचे दर कडाडले आहे. दुसरीकडे रशियाचे चलन रसातळाला गेले आहे. मॉस्को शेअर बाजार कोसळला आहे. युक्रेन Ukraine हा सोयाबीनचा मोठा उत्पादक आहे. युद्धामुळे त्याची निर्यात खोळंबल्याने भारतात सोयाबीनचे दर वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमतींवरही याचा परिणाम होणार असून, आभासी चलन असलेल्या क्रिप्टो करन्सीचे दरही कोसळले आहेत. त्यामुळे युद्धा कुणाचे आणि झळा कुणाला ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.