आंदोलकांवर गोळीबाराचा तो आदेश नव्हता : विक्रमसिंघे

    दिनांक :19-May-2022
|
-संसदेत दिली हिंसाचारासंबंधी माहिती
 
कोलंबो, 
Mahinda Rajapaksa महिंदा राजपक्षे सरकारविरोधी आंदोलनातील आंदोलकांवर दिसताच क्षणी गोळी मारण्याचा आदेश संरक्षण मंत्रालयाच्या वतीने देण्यात आला नव्हता, अशी माहिती श्रीलंकेचे नवे पंतप्रधान रानिल Vikramasinghe विक्रमसिंघे यांनी आज संसदेत दिली. श्रीलंकन संरक्षण मंत्रालयाने देशात सुरू असलेल्या आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेमुळे होत असलेल्या हिंसाचारात लष्करी जवान, वायुसेना आणि नौदलाला सार्वजनिक संपत्तीची लूट करणार्‍या वा दुसर्‍यांचे नुकसान करणार्‍या कोणत्याही व्यक्तीवर गोळी चालवण्याचा आदेश 10 मे 2022 रोजी दिला होता.
 
 
Vikramasinghe
 
आंदोलकांनी तत्कालिन पंतप्रधान Mahinda Rajapaksa महिंदा राजपक्षे यांचे कुटुंब आणि अन्य लोकांच्या मालमत्तांवर हल्ला चढवल्याच्या प्रकारानंतर संबंधित आदेश देण्यात आले होते. याशिवाय संरक्षण मंत्रालयानेही मागील आठवड्यात अधिक हिंसाचार नियंत्रित करण्याच्या हेतूने दिसताच क्षणी गोळी मारण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले. परंतु, आता असे कोणतेही आदेश देशातील तिन्ही संरक्षण दलांना दिले नव्हते, असा दावा पंतप्रधान Vikramasinghe विक्रमसिंघे यांनी केला आहे. पोलिस आपल्या विवेकाधिकाराचा वापर करू शकतो. गरज भासल्यास गोळीसुद्धा चालवू शकतात. मात्र, त्यासाठी कायदेशीर प्रक्रियांचे पालन करावे लागत असल्याचे त्यांनी संसदेत सांगितले. दरम्यान, गॉल फे स येथे (राष्ट्रपतींच्या सचिवालयाचे ठिकाण) शांततापूर्ण आंदोलन करणार्‍यांवर हल्ला झाल्यानंतर पसरलेल्या हिंसाचारामुळे कोलंबोसह देशातील अन्य भागांत मोठ्या संख्येत लष्कर तैनात केले होते.