आसाम-अरुणाचल सीमावाद पुढील वर्षापर्यंत सुटणार

    दिनांक :21-May-2022
|
- अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास
 
 
देवमाली, 
आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील आंतरराज्यीय सीमावाद पुढील वर्षापर्यंत सुटण्याची शक्यता आहे, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री Amit Shah अमित शाह यांनी आज शनिवारी व्यक्त केला. ईशान्येला बंडखोरीपासून मुक्त करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर मागील आठ वर्षांत ईशान्येतील जवळपास नऊ हजार बंडखोरांनी शरणागती पत्करली आहे, असा दावा त्यांनी तिरप जिल्ह्यातील नरोत्तमनगर येथील रामकृष्ण मिशन शाळेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला संबोधित करताना केला. ईशान्य भारतात शांतता आणण्यासाठी तसेच या क्षेत्राचा विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
 
 
Amit Shah
 
आंतरराज्यीय सीमावादावर मैत्रिपूर्ण आणि कायमचा तोडगा काढण्यासाठी आसाम आणि अरुणाचल प्रदेश सरकार काम करीत आहे. ईशान्येतील तरुण आता बंदुका आणि बॉम्ब हाती बाळगत नाही. त्यांच्या हातात आता लॅपटॉप असते आणि ते स्टार्टअप्स सुरू करीत आहेत. या क्षेत्रासाठी अशाच प्रकारच्या विकासाचा विचार केंद्र सरकार करीत आहे, असे शाह यांनी सांगितले. यापूर्वी वर्षभरातून 200 पेक्षा जास्त दिवस मणिपूरमध्ये बंद आणि अडथळे निर्माण केले जायचे. मात्र, आता या राज्यात मोठा बदल होत असून, भाजपाच्या मागील पाच वर्षांच्या सत्ताकाळात येथे कधीच बंद पुकारण्यात आला नव्हता, असे Amit Shah शाह यांनी सांगितले.