- भाजपाचा जोरदार पलटवार
नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वेषापोटी Rahul Gandhi राहुल गांधी देशाला बदनाम करीत आहेत. विदेशी भूमीवर सातत्याने गंभीर वक्तव्ये करून ते देशाचा विश्वासघात करीत आहेत, असा पलटवार भाजपाने आज शनिवारी केला. लंडन येथील एका कार्यक्रमात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. सत्ताधारी पक्ष संपूर्ण देशावर रॉकेल ओतत असून, केवळ एका ठिणगीमुळे मोठी आग लागेल, असे वक्तव्य Rahul Gandhi राहुल गांधी यांनी केले आहे.
नरेंद्र मोदी यांच्या द्वेषापोटी Rahul Gandhi राहुल गांधी देशविरोधी वक्तव्ये करतात, असे गौरव भाटिया यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. विदेशात जाऊन देशाच्या विरोधात वक्तव्ये करू नका, असा इशारा त्यांनी काँग्रेसला दिला. 1984 मधील शीखविरोधी दंगलीपासून काँग्रेस दंगली भडकवण्यासाठी रॉकेल ओतत आहे. राहुल गांधी काँग्रेसचे हताश, अपरिपक्व, अपयशी आणि अर्धवेळ नेते आहेत. त्यांनी अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर यासारख्या देशांत अनेकदा देशविरोधी वक्तव्ये केली आहेत, अशी टीका त्यांनी केली.
Rahul Gandhi राहुल गांधी अशा प्रकारचे वक्तव्ये सातत्याने करीत आहेत आणि या माध्यमातून ते देशाचा विश्वासघात करीत असल्याचे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. राहुल गांधी वारंवार देशविरोधी वक्तव्ये आणि दरवेळी मोठी चूक करतात. काँग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष करतात, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, भारताच्या विरोधात बोलण्यापूर्वी त्यांनी दहा वेळा विचार करावा, असे भाटिया यांनी सांगितले.
भारत-पाकिस्तानची तुलना करू नये
त्यांनी भारत आणि पाकिस्तानची तुलना करू नये. पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून अर्ध्यापेक्षा जास्त काळ त्यावर लष्कराची सत्ता होती आणि आपल्या अस्तित्वासाठी हा देश भीक मागत फिरत असतो. भारताची पाकिस्तानसोबत तुलना करताना Rahul Gandhi राहुल गांधी यांनी सावध राहावे. भारत महान देश होता आहे आणि राहील, असे भाटिया यांनी सांगितले.