ब्राह्मण समाजाविषयी वक्तव्य करणार्‍यांना समज

    दिनांक :21-May-2022
|
-शरद पवारांनी केली विविध संघटनांसोबत चर्चा
 
पुणे,
आपल्या पक्षातील सहकार्‍यांनी ब्राह्मण समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांना योग्य ती समज देण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष Sharad Pawar शरद पवार यांनी आज शनिवारी दिली. ब्राह्मणविरोधी असल्याचा आरोप झाल्यानंतर पवारांनी आज राज्यातील विविध ब्राह्मण संघटनांसोबत चर्चा केली. मागील काही दिवसांपासून आपल्या पक्षातील सहकार्‍यांकडून केलेल्या वक्तव्याबद्दल नाराजी होती. पुन्हा या पद्धतीने कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात न बोलण्याच्या सूचना आपण संबंधितांना दिल्या आहेत. एखाद्या नेत्याच्या अशाप्रकारच्या बोलण्याबद्दल समाजात गैरसमज होऊ शकतो आणि तो दूर करण्याची जबाबदारी आपली आहे, असे Sharad Pawar शरद पवार म्हणाले.
 
 
sharad pawar 21
 
अलिकडच्या दिवसांत ग्रामीण भागातील हा समूह शहरी भागात येत आहे. त्यामुळे नोकरीत त्यांना अधिक संधी मिळावी. त्यासाठी आरक्षणाची गरज असल्याची मागणी ब्राह्मण समाजाने केली होती. आपण त्यांना आरक्षणाचे सूत्र समजावून सांगत, इतरांच्या आरक्षणाला विरोध करू नये, असे आवाहन केले. समाजाच्या विकासाला, व्यवसायाला मदत करण्यासाठी परशुराम महामंडळाची मागणी त्यांनी पुढे आणली. यावेळी हा विषय आपल्या अधिकारात नसून, राज्याकडे असल्याचे स्पष्ट केले. आपण मुख्यमंत्र्यांसोबत ब्राह्मण समाजाची बैठक घडवून आणण्याची ग्वाही दिल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. दरम्यान, शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ रामदास नव्हते, दादोजी कोंडदेवदेखील त्यांचे गुरू नव्हते, असे म्हटले होते. याशिवाय त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळेही ब्राह्मण समाज नाराज असल्याचे सांगण्यात येते. भरीसभर पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाविरोधात वक्तव्य केल्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने Sharad Pawar पवारांनी राज्यभरातील ब्राह्मण समाजातील पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता.