शिवशाही की मोगलाई?

    दिनांक :21-May-2022
|
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
पवार कुटुंबीय आणि त्यांच्या नातलगांच्या घर, कंपनी आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले. या छापासत्रानंतर ‘‘शिवछत्रपतींचे नाव घेणार्‍या दिल्लीतील नेत्यांनी छत्रपतींच्या विचारांकडे दुर्लक्ष केले. छत्रपतींनी कधीही महिलांना लक्ष्य केले नाही. मुघलांनी मात्र महिलांवर अत्याचार केले,’’ अशा शब्दात शरद पवारांच्या कन्या खासदार Supriya Sule सुप्रिया सुळे यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला होता. केवळ चौकशी केली तर त्याचे मुघलांनी केलेल्या अत्याचाराशी तुलना करणार्‍या ताईंना त्यांच्या तथाकथित शिवशाही म्हणवणार्‍या राज्यात सर्वसामान्यांवर अनन्वित अत्याचार, सरकारी यंत्रणांमार्फत छळ चालला असताना त्याविरुद्ध आवाज उठविण्याची हिंमत दाखविता आली नाही. केवळ चौकशी करणार्‍या प्रक्रियेला मोगलाई म्हणतात की, बीएमसी, पोलिस यासारख्या विविध यंत्रणांना हाताशी धरून सरकारविरुद्ध बोलणार्‍यांचा आवाज दाबण्याचा, एकाच व्यक्तीवर, महिलेवर राज्यभर विविध ठिकाणी गुन्हे नोंदवून छळवाद चालविण्याच्या दमनकारी प्रवृत्तीला मोगलाई म्हणतात...? हे ताईंनी आता स्पष्ट केले पाहिजे.
 
 
supriiya sule
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याद्वारे पीडित करुणा शर्मा, रेणू शर्मा, मेहबूब शेखद्वारा पीडित महिला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश विटेकर यांनी नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केलेली तरुणी, संजय राऊतांद्वारे पीडित डॉ. स्वप्ना पाटकर, माजी मंत्री संजय राठोडद्वारा पिळवणूक झाल्यानंतर आत्महत्या करणारी पूजा चव्हाण, शिवसेनेचा उपनेता रघुनाथ कुचिक यांनी लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केलेली पीडित तरुणी, ज्या अभिनेत्रीसाठी संजय राऊतांद्वारे खालच्या पातळीची भाषा वापरण्यात आली ती कंगना राणावत, केवळ मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेरील रस्त्यावर बसून हनुमान चालीसा वाचतो म्हटलं म्हणून शेकडो शिवसेनेचे कार्यकर्ते घरावर हल्ला चढवून, समाजमाध्यमांवर अश्लील पोस्ट टाकून धमकी दिल्या गेलेल्या खासदार नवनीत राणा, विद्या चव्हाणने छळ केलेली सून... ही झाली Supriya Sule सुप्रिया सुळेंच्याच नेत्यांद्वारे केल्या गेलेल्या महिलांवरील अत्याचाराची प्रातिनिधिक उदाहरणे... साकीनाका परिसरात टेम्पोमध्ये बलात्कार आणि खून झालेल्या प्रकाराप्रमाणे, राज्यातील सर्वसामान्य महिला-तरुणींवरील अत्याचारांच्या घटना तर अगणित आहेत. पण सुप्रिया ताई कधी बोलणार तर, ते केवळ आपल्या सोयीचे राजकीय भांडवल करता येईल तेव्हा. ताईंच्या मते त्यांच्या पक्षाच्या महिला आणि त्यांची अब्रू हीच महत्त्वाची; बाकी पक्षातील आणि अन्य राज्यातील सर्वसामान्य महिलांची अब्रू वगैरे त्यांच्या लेखी काही नाही...धनंजय मुंडे, मेहबूब शेख, संजय राऊत, रघुनाथ कुचिक, राजेश विटेकर, संजय राठोड आदींद्वारे पीडित महिलांविषयी ताई ब्र देखील काढणार नाही आणि त्याच नेत्यांच्या गळ्यात गळे घालणार आणि त्यांच्यासमवेत नृत्य करणार! उलट या पीडित महिलांनाच, पिस्तुलं ठेवून, देशद्रोहासारख्या विविध प्रकरणात अडकवून, एका प्रकरणातून सुटले तर दुसर्‍या प्रकरणात फसविण्याची तजवीज करून, घर पाडून सरकार पुरस्कृत दमनकारी कारवाया केल्या जातात. त्यावर मात्र, Supriya Sule सुप्रियाताई कधीही काहीही बोलल्याचे ऐकिवात नाही. नुकतेच स्मृती इराणी यांच्या सभेवेळी झालेल्या घटनेनंतर महिलांवर हात उगाराल तर, हात तोडून हातात देऊ, ही भाषा आहे आमच्या ताईंची. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही त्यांनी बजावल्याचे ऐकण्यात आले. मग ताईंच्या पक्षाचे राज्यात सरकार असताना महिलांना असे खोटे बनावटी एकापेक्षा अधिक गुन्हे राज्याच्या विविध पोलिस ठाण्यात दाखल करून छळ करण्याची संस्कृती या महाराष्ट्राचीच आहे; नाही का ताई?
 
 
अभिनेत्री केतकी चितळे हिने कोण्या एका व्यक्तीने रचलेली समाजमाध्यमावर दिसलेली कविता आपल्या फेसबुक वॉलवर शेअर केली. त्यात तसे प्रत्यक्ष नाव घेतलेले नसले, तरी त्या कवितेतील काही घटना, वस्तुस्थिती आणि शब्द हे राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयीच असल्याचा भास होतो. अशी भाषा ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे पुन्हा ताई खडसावून सांगतात... त्याचवेळी माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी असणार्‍या अमृता फडणवीसांवर अत्यंत खालच्या दर्जाची टिप्पणी, टीका केली गेली तेव्हा ताईंना महाराष्ट्राची संस्कृती आठवली नाही. अर्वाच्च भाषेचा वापर होत असताना ही आपली संस्कृती किंवा आई-वडिलांची शिकवण नाही, अशा शब्दात आपल्या समाजबांधवांना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना Supriya Sule ताईंनी खडसावले नाही. शिवीगाळ करणे हा बहुधा संस्कारांचा भाग आणि आई-वडिलांची शिकवण असेल, कदाचित ताईंच्या दृष्टीने. कारण त्यावेळी ताईंनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही किंवा कारवाईची मागणीही करताना ताई दिसल्या नाहीत.
 
 
केतकीची चूक काय? तर कविता शेअर करणे... कवितेच्या मूळ कवीवर काही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. का तो वकील आहे म्हणून त्याच्यावर हात घालायची हिंमत या महाविकास आघाडी सरकारमध्ये नाही. केवळ महिलांनाच हे आपल्या बेंडकुळ्या दाखवणार? कविता शेअर करणार्‍या केतकी चितळेवर इतकी तातडीची कारवाई करणार्‍या पोलिसांनी तर केतकीप्रमाणे आता तिची पोस्ट शेअर करणार्‍या 772 लोकांवर कारवाई केल्याचेदेखील ऐकिवात नाही. बरं आता त्या 772 लोकांच्या वॉलवरून शेअर करणारे देखील असतील. त्यामुळे हा आकडा हजारोंच्या वर गेलाच असेल. मग या सगळ्यांवर कारवाई करणार का हे महाविकास आघाडी सरकार? मूळ कवी आणि अन्य शेअर करणार्‍यांवर कारवाई नसेल तर केवळ केतकीच यांचे लक्ष्य का, हा मूळ प्रश्न आहे. एका कवितेने कुणाच्या भावना दुखावल्या म्हणून एखाद्या व्यक्तीला या महाराष्ट्रात अटक होऊ शकते तर मग ‘साल्यांनो, तुमच्या देवांचा मी बाप आहे’ या मूळ कवितेत नसलेल्या शिवराळ ओळी घुसडून हिंदू समाजाच्या भावना दुखावणार्‍या व्यक्तीचे काय? दुसर्‍या कुणाची कविता शेअर केली म्हणून एका महिलेला बलात्काराची धमकी देणार्‍यांचे काय? ‘फ्री काश्मीर’ची मागणी म्हणजे देश तोडण्याची मागणी. हा खरा देशद्रोह! मात्र, असा फलक फडकविणार्‍या मेहक मिर्झावर कारवाईचे काय? सरकारच्या नावावर टिच्चून महाराष्ट्राच्या भूमीत येऊन हिंदूंविषयी गरळ ओकणार्‍या शरजील उस्मानीचे काय? फडणवीसांविषयी अश्लील भाषेचा प्रयोग करणार्‍या अभिनेत्री दीपाली सय्यदचे काय? छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून हत्या करणार्‍या क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणार्‍याचे काय? देशाचे पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांविषयी अश्लाघ्य भाषा वापरणार्‍या अभिनेता किरण मानेचे काय? केतकीवर हल्ला चढवणार्‍या, शाईफेक करणार्‍यांचे काय? असे बरेच प्रश्न या आघाडी सरकारला विचारण्यासारखे आहेत.
 
 
एका वृत्तपत्राच्या संपादकाने लिहिलेल्या पुस्तकावरून भावना दुखावल्याने त्या संपादकावर शाईफेक झाली होती. त्यावेळी शरद पवारांनी ‘‘देशाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य स्वीकारले आहे. आपल्या मनाविरुद्ध एखाद्या लेखकाने एखादी गोष्ट लिहिली तर त्या लेखकावर व्यक्तिगत हल्ला करणं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी आहे. आम्ही त्याचा पुरस्कार कधीही करणार नाही. ही घटना निंदनीय आहे व महाराष्ट्राला शोभा देणारी नाही,’’ असे म्हटले होते. हाच न्याय मात्र पवार केतकी प्रकरणी लावू शकले नाही. यावर मतदेखील व्यक्त करावेसे त्यांना वाटले नाही. या दोन्ही घटनेतील पवारांची भूमिका बघितल्यानंतर पवारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ काय असू शकतो, हे समजून येते.
 
 
कायद्याची ऐसीतैसी
बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर मुंबई बंद पाडली होती. तेव्हा त्याविरोधात मुंबईमध्ये दोन मुलींनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. त्यामुळे भावना दुखावल्याच्या कारणाने मुलींवर गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली होती. सदर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाच्या कानाखाली वाजवत माहिती तंत्रज्ञान कायद्यातील सेक्शन 66 (अ) ला रद्दबातल ठरवले आणि कारवाईवर ताशेरे ओढले होते. महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या केतकी चितळे प्रकरणात ज्या ‘पवार’ व्यक्तीचा उल्लेख कवितेत आहे, त्याने तक्रार करायला हवी. त्रयस्थ व्यक्ती तक्रार करू शकत नाही. संबंधित व्यक्तीने तक्रारच केलेली नाही; मग केतकीवर विविध प्रकारचे गुन्हे आणि तिचा रिमांड ही कारवाई कशी काय होऊ शकते?, 505 (2) हे कलम कसे काय लावण्यात आले? 153 ए हे कलमही का लावण्यात आले? असा सवाल उपस्थित करीत यशस लिगलच्या कोणी योगेश देशपांडे नामक व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवाय ज्या पद्धतीने ही सगळी प्रक्रिया सुरू आहे ती पाहता व्हिजिलन्सकडे न्यायाधीशांची तक्रारदेखील करण्यात आली आहे. ही कायद्याची ऐसीतैसी असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. 
 
- 9270333886