प्रतीक्षा युद्धविरामाची!

    दिनांक :21-May-2022
|
अग्रलेख
युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धाला war दोन महिने पूर्ण झाले आहेत. युक्रेनची कितीतरी शहरे बेचिराख करून रशियाने त्यावर ताबा मिळविला आहे. बूचा, मारियोपूल, कारकिव्ह, इरपिन आदी शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. असे असले, तरी राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना अजूनही म्हणावे तसे यश मिळालेले नाही. गेल्या दोन महिन्यात युद्धाची परिमाणे बदलली असली, तरी युद्ध जारी आहे. युद्ध प्रारंभ झाल्यानंतर त्यात ८ ते १५ दिवसात विजय मिळेल असा रशियाचा कयास होता. तथापि, युक्रेनियन सरकार आणि नागरिकांनी देशभक्तीचा परिचय देत रशियाविरुद्ध आघाडी उघडली आणि त्यांना जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली.
 
WAR
 
आज अशी स्थिती आहे की, नाटो राष्ट्रांसह अनेक मित्र राष्ट्रांनीही रशियाविरोधात युक्रेनला विविध प्रकारची मदत करण्यास प्रारंभ केला आहे. शस्त्रास्त्रांची मदत सुरू असून दारूगोळाही पाठविला जात आहे. त्यामुळेच एकीकडे युक्रेनची जीवितहानी होत असताना रशियातील सैन्याला युद्धात war मुकावे लागत आहे. त्यांचीही विमाने आणि युद्धनौका निकामी केल्या जात आहेत. पण युद्ध न थांबल्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. कुणीच माघार घेण्यास तयार नसल्याने येत्या काळात त्याचे परिणाम जगावर आणि विशेषतः अर्थकारणावर पडणार आहेत. अन्नधान्याची, इंधनाची आणि नैसर्गिक वायूची टंचाई जगाला जाणवल्याशिवाय राहायची नाही. त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर थांबणे, हे जगाच्या हिताचे ठरणार आहे.
 
 
संयुक्त राष्ट्र संघानेही या युद्धाबद्दल war चिंता व्यक्त केली असून युद्ध war आटोक्यात न आल्यास जगात अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळे काही देशांना दीर्घकालीन दुष्काळाचा सामना करावा लागण्याची स्थिती उद्भवू शकते, असा इशारा दिला आहे. त्या इशाऱ्याकडे बघता युद्ध थांबणे, हे रशिया आणि युक्रेनच्याच नव्हे, तर सर्व देशांच्या हिताचे ठरणार आहे. आजचीच स्थिती अशी आहे की, युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. सर्वसामान्यांना हे दर पुरविणारे नसल्याने, त्याविरोधात आंदोलने आणि धरणे प्रदर्शन ठिकठिकाणी होणार हे निश्चित. कोरोना काळात भारताने केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे भारतात दिवाळखोरीसारखी स्थिती उद्भवली नाही.
  
पण शेजारचा श्रीलंका आणि पाकिस्तानसारखे देश देशोधडीला लागण्याची स्थिती आहे. अयोग्य अर्थकारणाच्या आखणीमुळे पाकिस्तानात आज पेट्रोल २०० रुपये लिटरपर्यंत चढले आहे. दुधाचे, साखरेचे, पाणी, वीज आणि जीवनावश्यक वस्तूंचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत. श्रीलंकेत तर सरकारविरोधी आंदोलनाचा फटका अनेक नेत्यांना बसला आहे. अनेकांवर देश सोडून पलायन करण्याची पाळी आली आहे. ही सारी परिस्थिती कोरोनानंतर उद्भवलेल्या युक्रेन-रशिया युद्धामुळेच war उद्भवली नसली, तरी या जगव्यापी समस्येचा अशी स्थिती उद्भवण्यात बराचसा वाटा आहे, हे नाकारता येणार नाही. पुरवठा साखळी खंडित झाल्यामुळेही अन्नधान्याच्या आणि खाद्यतेलांची किमती गगनाला भिडल्या आहेत. महागाईने जगात महागाईचा आगडोंब उसळला असून भारतात गेल्या महिन्यात घाऊक आणि किरकोळ महागाईच्या दराने उच्चांक गाठला आहे. कित्येक वर्षांनंतर एप्रिल महिन्यात घाऊक महागाईचा दर १५ टक्क्यांच्या वर गेला. हा आकडा १९९८ नंतरचा सर्वात मोठा आहे.
 
रशिया अण्वस्त्रसज्ज असला आणि त्याने जगाला युक्रेनविरुद्ध प्रसंगी अणुहल्ला करण्याच्या धमक्या दिल्या असल्या, तरी अण्वस्त्र हल्ल्याचे ब्रह्मास्त्र रशिया वापरेल अशी स्थिती अजूनतरी उद्भवलेली दिसत नाही. शक्तिसंपन्न रशियाला ६० दिवसांनंतरही युक्रेनची नाडी पुरती दाबता आलेली नाही. उलट त्याला युक्रेनमधील काही इलाख्यांमधून प्रचंड विरोधामुळे माघार घ्यावी लागली आहे. युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागातील वस्त्यांमध्ये रशियाचा आक्रमक लढा war सुरू असतानाही, त्यांचे अभियान थंडावताना दिसत आहे. विशेषज्ञांच्या मते रशिया आपल्या युद्धनीतीत war बदल करून युक्रेनच्या जमिनी आणि शहरे काबीज करण्यावर येत्या काळात जोर देणार आहे.
 
युक्रेनची निर्यात युद्धपूर्व स्थितीत न आल्यास जागतिक अन्न संकट उद्भवणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे. रशियासोबत युद्ध war सुरू झाल्याने युक्रेनमधून होणारा धान्यसाठाचा पुरवठा कमी झालेला आहे. त्यामुळे जगातील मका, गहू यासारख्या धान्याच्या निर्यातीवरही परिणाम झालेला आहे. त्यामुळे यापासून तयार होणाऱ्या वस्तूंच्या किमती भडकल्या आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या एका सर्वेक्षणानुसार गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यावर्षी जागतिक अन्नधान्याच्या किमती सुमारे ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्ध, जागतिक हवामान बदल, कोरोना स्थिती आणि साथीच्या आजारांमुळे लाखो लोकांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. जगाच्या अनेक भागांमध्ये अन्न असुरक्षितता वाढू शकते, असा इशाराही संयुक्त राष्ट्र संघाच्या या सर्वेक्षणातून देण्यात आलेला आहे. हे युद्ध थांबावे यासाठी जागतिक नेते प्रयत्नशील आहेत. पण अजूनही कुणाला म्हणावे तसे यश आलेले नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा उभय देशांच्या प्रमुखांशी याबाबत चर्चा करीत शांतता हाच एकमेव तोडगा असून उभयतांना युद्धसमाप्तीचा सल्ला दिलेला आहे. या युद्धावरून जगात समर्थक आणि विरोधकांचे दोन गट झाले असले, तरी या दोन्ही देशांशी असलेले संबंध पाहता भारताने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलेला आहे.
 
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार रशिया आणि युक्रेन जगातील ३० टक्के गव्हाचे उत्पादन करतात. युद्धापूर्वी युक्रेनकडे जगाची ब्रेड बास्केट म्हणून बघितले जात होते. युक्रेन आपल्या बंदरांमधून ४.५ दशलक्ष टन कृषी निर्यात करीत असे. युद्धानंतर निर्यातीत प्रचंड घट झालेली आहे. त्याचा परिणाम किंमतवाढीवर झालेला आहे. सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट ब्लॉगच्या लेखकांच्या अंदाजाचा हवाला देऊन, जागतिक बँकेने म्हटले आहे की, खाद्यपदार्थांच्या किमतीतील ताज्या वाढीमुळे अतिरिक्त ४० दशलक्ष लोक १.९० प्रतिदिन दारिद्र्यरेषेखाली जाऊ शकतात. आयएमएफनेही अशीच चिंता व्यक्त केली आहे.
 
अन्न आणि इंधनाच्या किमतीत वाढ झाल्याने आफ्रिका, लॅटिन अमेरिकेपासून कॉकेशस आणि मध्य आशियापर्यंत काही प्रदेशांमध्ये अशांततेचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, तर काही भागांमध्ये अन्न असुरक्षितता आणखी वाढण्याची शक्यता आहे. संघर्षामुळे युक्रेनची लागवड आणि कापणीचा हंगाम विस्कळीत झाला आहे. विशेषतः पूर्व युक्रेनमधील कोठारे, पायाभूत सुविधा आणि उत्पादन नष्ट झाले आहे. युद्धजन्य war परिस्थितीमुळे काळ्या समुद्रातून शिपिंग थांबविण्यात आली आहे; जेथून युक्रेनचे सुमारे ९० टक्के धान्य निर्यात केले जाते. रशियात युद्धाला विरोध करू शकणा-या बहुतांशी माध्यमांवर निर्बंध लादण्यात आले असून रशियासह युक्रेनमधील माध्यमेही तेथील जनतेला अतिरेकी राष्ट्रवादाच्या कैफात युद्धज्वराधीन करण्याची भूमिका बजावत आहेत.
 
युक्रेनच्या सहाय्यासाठी अमेरिका व युरोपियन देश येतील आणि यातून तिसऱ्या महायुद्धाची बिकट स्थिती उद्भवू शकते, असा अंदाज अनेक सामरिक अभ्यासक आणि राजकीय तज्ज्ञांनी लावला होता. परंतु तशी स्थिती दृष्टिपथात नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका या खंडात अनेक लहान-मोठ्या देशात छोटी-मोठीयुद्धे झाली. परंतु त्या युद्धांची व्याप्ती सीमित राहिली. युक्रेन प्रकरणात नक्कीच तिस-या महायुद्धसदृश परिस्थिती असली, तरी अमेरिका व युरोपियन देश प्रत्यक्ष युद्धात उतरणार नसल्याने अशी भीषण स्थिती ओढवण्याची शक्यता मावळली आहे. युक्रेनसारख्या अत्यंत लहान व दुर्बल देशाला रशियाच्या बलाढ्य महासत्तेच्या आक्रमणाला एकाकीपणे झुंजावे लागत आहे, हे सत्य मात्र नाकारता येऊ शकत नाही. आज सारे जगच दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे असताना युक्रेन-रशिया युद्ध war परवडणारे नाही. आर्थिक मंदीने जगभरातील अर्थतज्ज्ञांची झोप उडालेली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्कदेखील चिंतातुर झाले आहेत. जगाच्या एकॉनॉमिक स्लोडाऊनमध्ये रशिया-युक्रेन युद्धाचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक चिघळण्यापूर्वी युद्धविराम होण्याची खरी गरज आहे.