आशेचे कवडसे

    दिनांक :22-May-2022
|
- स्वाती पेशवे
देशाच्या दिशेनं होणार्‍या Monsoon मान्सूनच्या प्रवासाची माहिती घेणं, त्याच्या आगमनाची तारीख जाणून घेणं आणि प्रत्यक्षात अंदमानमध्ये दाखल झाल्यानंतर त्याने देवभूमीमध्ये प्रवेश करून पुढचा प्रवास सुरू करणं हा सगळा घटनाक्रम दरवर्षी अनुभवत असलो, तरी प्रत्येकाच्याच मनात त्याविषयी उत्सुकता आणि अनोखी धडधड असते. नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांच्या प्रवासात एखादा छोटासा अडथळा आला वा कुठल्याशा प्रभावाने त्याचा प्रवास लांबणीवर पडला तरी या कृषिप्रधान देशासाठी तो फार मोठा धक्का असतो. कारण दरवर्षी ठरावीक दिवसांमध्ये Monsoon पाऊसकाळ अनुभवण्याची चैन भारतीयांना अनुभवता येत असली, तरी सध्याचे उन्हाळे अतिशय तीव्र होत आहेत. खेरीज कितीही पाऊस पडला तरी पावसाचं पाणी साठविण्यासाठी आवश्यक ती दूरदृष्टी आणि सहायक यंत्रणेच्या अभावी पावसाचं बरंचसं पाणी थेट समुद्राला जाऊन मिळतं. त्यामुळेच उन्हाच्या प्रकोपामुळे एकदा का धरणांनी तळ गाठायला सुरुवात केली, पाणवठे कोरडेठाक पडले की गावाखेड्यांमधून पाणी मिळविण्याची जीवघेणी धडपड सुरू होते. जीवाची लाही लाही करणारी काहिली, पाण्याचं दुर्भिक्ष्य, उष्माघातानं बळावणारे आजार या सगळ्यामुळे उन्हाळ्याचं शेवटचं पर्व कधी संपतंय आणि कधी एकदा पाऊस येतोय, असं होऊन जातं. यंदा मात्र ही प्रतीक्षा लवकर संपली असून नेहमीच्या वेळेआधीच Monsoon मान्सून अंदमानात तसंच देवभूमीत दाखल झाला आहे. या आनंदवार्तेनं प्रत्येक भारतीय मन सुखावलं असून गेली दोन वर्षे घरातून अनुभवलेला पाऊस आता प्रत्यक्ष सरींमध्ये चिंब नहात अनुभवता येईल, ही भावनाच आनंदानं ओलीचिंब करणारी आहे.
 

rain 
 
कोणत्याही दडपणाविना Monsoon मान्सूनचं स्वागत करण्यासाठी आपण सज्ज आहोत. मान्सूनला सामोरं जाण्यासाठी वळीवही गर्जना करीत येऊ घातले आहेत. त्यांचा दडपवून टाकणारा दणदणाट, दंगा, धसमुसळेपणा आपल्याला ठाऊकचआहे. साहजिकच ऋतुबदलाचा हा काळ अनुभवण्यात पुढचे काही दिवस आपण दंग असणार आहोत. त्यामुळेच सर्वप्रथम या आनंदघनांचं स्वागत करू या आणि बदलत्या ऋतूला सामोरं जाण्याची सज्जता करत एका नवीन पर्वाला सामोरं जाऊ या. आधी वळवाचं आणि नंतर Monsoon पावसाचं असं स्वागत करण्याचे क्षण असतात प्रतीक्षापूर्तीचेे आणि एका समृद्ध काळाचं आगमन होत असल्याच्या संकेताचे... सरींची ती शिंपण केवळ तापलेल्या जमिनीवरच नसते तर सहनशीलता आणि संयमाचा कडेलोट झालेल्या मनोवस्थेवरही असते. म्हणूनच वळवाचे चार थेंब पडताच उधळणार्‍या मृदगंधाच्या लाटांवर जणू आपल्या वृत्तीच विराजमान होतात. कोण जाणे इतक्या अल्पशा काळात त्या कुठे कुठे विहरून येतात. तो सुगंध रोमारोमात पाझरतो आणि रंध्रांनाही धुमारे फुटू लागतात. असेच धुमारे आता सर्वांच्याच मनोभावनेला फुटले आहेत.
 
 
माणसाचं पावसाशी एक आगळंवेगळं नातं आहे. सगळेच ऋतू माणसाच्या अस्तित्वाशी, त्याच्या जगण्याशी संबंधित असले, तरी Monsoon पावसाशी सलगी अंमळ अधिक आहे. म्हणूनच वळवाच्या पावसापासून मिळणारी त्याच्या आगमनाची वार्ता आपल्याला सुखावते. खरं तर वळीव लयकारी नसतो, त्यात नादमाधुर्य नसतं. त्यात असतो एक वेगळाच रांगडेपणा, उन्मत्तपणा... त्याच्या येण्याची ना कुठली वेळ, ना कोणता मुहूर्त. तो येणारही अवचित, अवेळी आणि कोसळणारही अनिवार... कधी टपोर्‍या गारांसवे, कधी मोठाल्या थेंबांसवे, वादळवार्‍यांना संगे घेऊन तो आला की खरं तर दैनाच उडते. त्याचा तो जोर न सोसल्याने वृक्ष उन्मळून पडणं, फांद्या तुटणं, चंद्रमोळी घरं उघडी पडणं, विजांचं तांडव सुरू असताना त्यांच्या वेगवान पदन्यासाखाली काही जीवांची राख होणं या तर नित्याच्या बाबी. हा वळीव भरलेल्या शिवारात शिरला की हाताशी आलेल्या पिकांचीही खैर नसते. ते नुकसानही बरंच मोठं असतं. पण तरीही त्याचं येणं आश्वासक, आधार देणारं वाटतं. कारण पहिला आवेग ओसरल्यानंतर त्याचं हे रूप शांत होणार असतं. धसमुसळेपणाने हैदास घालणार्‍या बालकाने थोड्याच वेळात समजूतदारपणा दाखवावा आणि अगदी शिस्तीत वागावं तसं काहीसं अनुभवायला मिळणार असतं. काही दिवसातच पावसाची झड लागणार असते. तो रजतरस ढेकळांमध्ये विरघळून शेतात सोनं पिकवणार असतो. म्हणूनच वळवाच्या पावसाचं अप्रूप कधीही संपत नाही; ते संपणारही नाही.
 
 
Monsoon वळवाच्या पावसाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा... गृहिणींना वळीव येण्यापूर्वी उन्हाळकामं उरकण्याची घाई असते. आता वर्षभर सगळे जिन्नस बाजारात उपलब्ध असले, तरी वाळवणं करण्याचा हाच तो काळ. कुरडया, सांडगे, पापड, भरल्या मिरच्या, खारवड्या, शेवया, तिखट, मसाले अशी सगळी बेगमी झाली की गृहिणीची वर्षाची चिंता मिटली. आजही अनेक घरांमध्ये वळवाच्या आधी ही कामं आटोपण्याची लगबग असते. दुसरीकडे घराच्या शाकारणीची लगबग, शेतीच्या कामासाठी लागणार्‍या अवजारांची दुरुस्ती करून पेरणीची सिद्धता, इकडे शाळांना सुट्ट्या असल्याने बालगोपाळांची मजामस्ती अशा सगळ्या वातावरणात वळीव प्रत्येकासाठी वेगळा संदर्भ घेऊन येतो. हे ऋतुबदलाचे संकेत असतात. म्हणूनच हवामान खात्याने Monsoon पावसाचा अंदाज वर्तविल्यापासून मनात आशेची बरसात सुरू होते. स्वप्नं अंकुरायला लागतात. डोळ्यांसमोर सृष्टीच्या वैभवाची दृश्यं तरळायला लागतात. बाहेर हे देखणं वैभव फुललं तरच घराघरांत वैभवाचे पदरव ऐकायला मिळण्याची शक्यता असते. त्यामुळेच वळवाचा अपूर्व नाद ऐकण्यास सगळ्यांचे कान आतुरलेले असतात.
 
 
Monsoon निसर्गाच्या सान्निध्यात वाढलेला माणूस मुळात निसर्गभक्त आहे. काळाच्या ओघात त्याच्या या भक्तीवर व्यावहारिकतेची पुटं चढत असली, तरी वळवाच्या दोन थेंबातच ती वाहून जातात. मग असं लेपविरहित झालेलं अनावृत्त मन तो आवेग नवथरतेनं झेलत राहतं. ही आतुरता असते म्हणूनच वळीव येताच त्यातले चार शिंतोडे झेलण्यासाठी खिडकीच्या गजांमधून ओंजळ बाहेर निघते; आनंदाने चित्कारत बालगोपाळच नव्हे, तर मोठेही अंगणाकडे धाव घेतात आणि सचैल न्हाऊन निघतात. Monsoon पावसापासून स्वत:चा बचाव करणारे वळवाचा पाऊस मात्र मोकळेपणाने झेलतात. त्यावेळी त्यांना कोणत्याही आच्छादनाची गरज भासत नाही. अचानक कोसळणारा तो जलभार पेलण्यात गुंतलेल्या पशुपक्ष्यांची लगबग न्याहाळण्यात एखाद्याला अपूर्व आनंद मिळतो. पानांवर निथळणारे आणि मोत्याप्रमाणे खाली ओघळणारे ते थेंब पाहण्यात तासन्तास जातात. न्हाऊमाखू घातलेल्या बाळसेदार बाळाप्रमाणे दिसणारं सृष्टीचं देखणं रूप न्याहाळण्यासाठी निसर्गभक्तांचे पाय निसर्गरम्य ठिकाणांच्या दिशेने वळतात. एकंदरच वळवात न भिजणारं निर्लेप मन शोधूनही सापडणार नाही. म्हणूनच वळवाचं अप्रूप कायम आहे.
 
 
Monsoon वळवाच्या पाण्यावर पिकांचं पोषण होत नाही, भूजल पातळीत वाढ होत नाही, जलसंचय होत नसल्याने नदी-नाले आणि विहिरींमधला पाणीसाठाही वाढत नाही. हा भीजपाऊस नसल्यामुळेे जमिनीत मुरत नाही तर पन्हाळ्यांमधून ओघळतो आणि थेट वाहून जातो. रसरसून तापलेल्या जमिनीवर पडल्याने त्यातल्या बहुतांश पाण्याची वाफच होते. म्हणूनच आदल्या दिवशी वळीव पडला तरी दुसर्‍या दिवशी त्याचं नावनिशाण राहात नाही. उलट, वाफसा आल्यानं धुमस वाढते. उष्मा अधिक तीव्र होतो; पण तरीही वळवाच्या Monsoon पावसाचा आधार वाटतो. कारण हा पाऊस म्हणजे एका प्रतीक्षेची अखेर असते. प्रतीक्षा पूर्ण होणार असल्याची ही भावनाच तनामनाला नवी उभारी देण्याचं काम करते. हीच एक आशा मनातली कार्यासक्ती वाढवते. असं बरेच वेळा झालं असेल की वळीव पडले, पण पर्जन्यकाळ यथातथाच राहिला. किंबहुना, जनांना अवर्षणाचा सामना करावा लागला. परिस्थिती समोर उभी ठाकते तेव्हा निकराचा प्रतिकार करणं माणसाच्या स्वभावातच आहे. ती त्याची प्रवृत्ती आहे. आपण सहसा कोणापुढेही हार पत्करत नाही; अगदी प्रतिकूलतेपुढेही नाही. मात्र, प्रतिकूलता समोर येणार असल्याची शंका, अस्थिरतेची भीती, अप्रिय घटनेची चाहूलच आपल्याला इतकी घाबरवून टाकते की, संकटाशी दोन हात करण्यापूर्वीच आपण परिस्थितीपुढे हात टेकतो. भयशंकित मन कार्यक्षमतेला वाळवीप्रमाणे पोखरून टाकतं. या दाहाने आपल्यातली ऊर्जा आणि क्षमतेचा स्त्रोत आटून जातो. अशा अशक्त भावविश्वात एखाद्या अप्रिय वार्तेनेही वादळ उठू शकतं; जे आवरणं भल्याभल्यांना शक्य होत नाही. त्यात ते मुळापासून हादरतात, उन्मळून पडतात. म्हणूनच आयुष्याला वळवाचा आधार हवा. सुख-समृद्धीचा सांगावा घेणारा असा एखादा दूत हवा. त्याने व्यक्त केलेले, आश्वासकता वाढविणारे दोन शब्द कानावर पडायला हवेत.धगीने होरपळणार्‍या जीवांना शांत करणारा तो क्षणिक थंडावा हवा. कारण ती सावली असते माथ्यावरच्या उन्हात आधार देणारी, थकलेल्या पावलांखाली आशेचे कवडसे पसरणारी...