रोजगार निर्मितीचा 'अग्निपथ' !

Agni Pathतरुणांची संख्या सर्वाधिक असलेला देश

    दिनांक :16-Jun-2022
|
अग्रलेख
Agni Path जगात तरुणांची संख्या सर्वाधिक असलेला देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. तुमच्या देशातील तरुणांमध्ये धाडस करण्याची प्रचंड इच्छा असते; मात्र त्यांच्या धाडसाला वाव आहे काय, हा मोठा प्रश्न असतो, असे म्हटले जाते. Agni Path आता तरुणांची सर्वात जास्त संख्या असलेल्या भारतामध्ये सरकारने तरुणांच्या धाडसाला थेट देशासाठी सैन्यात काम करण्याची संधी देणारी योजनाच जाहीर केली आहे. Agni Path मोदी सरकारने बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्याचा कार्यक्रम धडाक्यात सुरू केला आहे. रोजगार देणे म्हणजे सरकारी नोक-या देणे असा एक सोयीस्कर अर्थ काढून काँग्रेससारखा विरोधी पक्ष सरकारला नोक-या देणार होता; त्या कुठे आहेत, असा खोचक प्रश्न संसदेपासून जाहीरसभांपर्यंत जिथे तिथे विचारत होता. Agni Path त्यांना चोख उत्तर देत दोन दिवसांत दोन योजना सरकारने जाहीर केल्या आहेत. त्यातील मोठी योजना संरक्षण खात्याने जाहीर केली आहे.
 

army  
 
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी सैन्य दलात काम करण्याची इच्छा असणा-या तरुणांसाठी ‘अग्निपथ' Agni Path नावाची एक योजना जाहीर केली आहे. या योजनेत १७ ते २१ या वयोगटातील मुले आणि मुली सहभागी होऊ शकणार आहेत. या योजनेत जे सैन्यात सामील होतील त्यांना ‘अग्निवीर' असे संबोधले जाईल. या वयातील युवा अवस्थेत देशासाठी समर्पित होऊन जाण्याची भावना मनात येत असते. अशा वयात सैन्यात काम करण्यापेक्षा दुसरे भाग्य ते काय असू शकते. मात्र, पूर्वी अशा वयात इच्छा असूनही सैन्यात भरती होणे सोपे नसायचे. Agni Path सैन्यात भरती होण्याची प्रक्रिया माहीत नसणे, प्रक्रिया माहीत झाली तरी त्यातील मापदंडात न बसणे अशा अनेक गोष्टींमुळे अनेक तरुण इच्छा असूनही सैन्यात दाखल होऊ शकत नव्हते. आता ती प्रक्रिया सुलभ केली आहे. अग्निपथ योजनेतून चार वर्षांकरिता सैन्यात दाखल होता येणार आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या सेवेला पात्र असू शकतील, असे म्हटले आहे. अग्निपथमध्ये Agni Path सामील होणा-या अग्निवीराला पहिल्या वर्षी दरमहा ३० हजार रुपये, पुढे अनुक्रमे ३३ हजार ३६.५ हजार, ४० हजार असे वेतन मिळणार आहे.
 
 
 
Agni Pathयातील काही भाग बचत करून सरकार त्यामध्ये तितकीच रक्कम मिसळून सेवा संपताना व्याजासह करमुक्त ११.७१ लाख रुपये देणार आहे. सेवा करीत असताना जखमी झाला किंवा हौतात्म्य आले तर त्याचे वेगळे आर्थिक मदतीचे नियोजन सरकारने केले आहे. सैन्यातील सेवेसाठी अग्निवीरांची निवड झाल्यानंतर सहा महिने एक खडतर प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. त्यानंतर काम सुरू होईल. प्रशिक्षणाचे सहा महिने सेवेच्या चार वर्षांतीलच राहणार आहेत. चार वर्षांनंतर सेवा संपल्यानंतर या अग्निवीरांना राज्य व केंद्र सरकारच्या नोकरभरतीमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. Agni Path २५ टक्के अग्निवीर सेनादलातच सामावून घेतले जाणार आहेत. योजना सुरू होताच पहिल्याच वर्षी ४६ हजार अग्निवीरांची भरती करण्यात येणार असल्याचे राजनाथसिंह यांनी जाहीर केले आहे. सीमेवर लढण्याशिवाय सैन्यात लिपिक, भांडारपाल, ट्रेडमॅन, परिचर सहायक, अशी वेगवेगळी बरीच पदे आहेत. Agni Path त्या पदांवरही आता नियमित भरती न होता अग्निवीर योजनेतून तरुणांना संधी मिळणार आहे.
 
या योजनेत सरकारलाही मोठा फायदा आहे. Agni Path सैन्यदलावर होणा-या खर्चात कपात होणार आहे. पेन्शनचा खर्च राहणार नाही. पगारावरचा खर्च कमी होईल. सैन्यदलाचे सरासरी वय कमी होईल. धाडसी तरुण सैन्यात काम करतील. या योजनेमुळे देशातील देशभक्त युवकांना देशासाठी काम करण्याची मोठी संधी प्राप्त होणार आहे. इस्रायलसारख्या देशात अन्य कामे करत केवळ देशप्रेम म्हणून सैन्यात काम करणा-या नागरिकांची माहिती नेहमी चर्चेत असते. भारतातही नागरिकांना देशासाठी थेट सीमेवर काम करण्याची संधी मिळणार आहे. Agni Path देशभक्ती केवळ शब्दांतून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून मर्यादित काळ काम करीत सिद्ध करण्याची एक संधी युवकांना मिळणार आहे. सामाजिक शिस्त आणि देशभक्ती याबाबतचे आदर्श समाजात गावोगावी या अग्निवीरांच्या रूपाने निर्माण होतील; त्याचाही चांगला परिणाम समाजावर होईल. Agni Path अग्निवीर योजनेमुळे सरकारचा संरक्षणावरचा किती खर्च कमी होईल, हे विचारले असता संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दिलेले उत्तर महत्त्वाचे आहे. ते म्हणाले, ‘‘सशस्त्र सेनादलाला आम्ही बचतीचा विषय म्हणून कधीच पाहात नाही. या योजनेसाठी जितका म्हणून खर्च लागेल तो करण्याची सरकारची तयारी आहे. आमचे ध्येय देशाच्या सीमा सुरक्षित असल्या पाहिजेत, हे आहे. Agni Path त्यासाठी खर्च ही समस्या कधीच असू शकत नाही.'' मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशाच्या संरक्षण खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात सतत वाढत गेली आहे.
 
Agni Path याशिवाय, केंद्र सरकारने बेरोजगारी संपविण्यासाठी थेट प्रयत्न म्हणून आणखी एक पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारचे विविध विभाग आणि मंत्रालयातील रिक्त पदांचा सरकारने आढावा घेतला. त्यात जी रिक्त पदांची माहिती समोर आली, त्यानुसार सरकारने येत्या दीड वर्षात १० लाख पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. Agni Path स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी अभियान समजून ही पदे येत्या दीड वर्षात भरावीत, असे निर्देश दिले आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी, आत्मनिर्भर भारताच्या Atmnirbhar Bharat दिशेने जाण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल, असे म्हटले आहे. १० लाख पदे ही मोठी संख्या आहे. संरक्षण खात्यातील अग्निपथ योजना आणि ही १० लाख नोक-यांची संधी मिळून बेरोजगारीवर मोठा दिलासा मिळणार आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी यावरही टीका केली आहे. Agni Path विरोधासाठी विरोध केला की त्यामागचा हेतू आणि खोटेपणा लक्षात येतो. सामान्य नागरिकांचा विश्वास गमावण्याची नामुष्की अनेकदा येऊनही काँग्रेसचे नेतृत्व त्यातून काही शिकले नाही, ही काँग्रेसची मुख्य समस्या आहे.
 
वास्तविक, बेरोजगारी दूर होण्यासाठी केवळ सरकारी नोक-या हाच एकमेव मार्ग असूच शकत नाही. Agni Path सरकारी नोकरी हा नोकरदार तरुणांना सुरक्षित आणि विश्वासार्ह मार्ग वाटत असला, तरी या नोक-यांना संख्यात्मक मर्यादा असतेच. बेरोजगारी दूर करण्यासाठी उद्योग आणि पायाभूत सुविधांचा विकास हा मोठा मार्ग असू शकतो, हे लक्षात घेऊन मोदी सरकारच्या कार्यकाळात देशभरात रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणावर वेगात विकसित होत आहेत. नितीन गडकरी यांनी या विषयात विक्रमी काम केले आहे. Agni Path देशात अनेक ठिकाणी चौपदरी, सहापदरी रस्त्यांची कामे चालली आहेत. या कामांवर सरकारी, खाजगी आस्थापनेतून मोठ्या संख्येने तरुणांना नोकरीची संधी मिळाली आहे. उद्योगांमध्ये सरकारने स्टार्टअपमधून अनेकांना अर्थसहाय्य देत उद्योगांना, नवकल्पनांना प्रोत्साहन दिले आहे. Agni Path या उद्योगातून अनेक युवकांना रोजगार मिळाला आहे. जगभरात भारताची प्रतिमा मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर उंचावली आहे. त्यामुळे भारतात गुंतवणूक करण्यात अनेक देशांमधून उद्योजक भारतात येण्यास उत्सुक आहेत. Agni Path कोरोनामुळे ठप्प झालेले जगातील व्यवहार सुरू होताच या हालचालींना गती येईल.
 
Agni Path भारतातील उद्योग क्षेत्रातील हालचाली आता गतिमान झाल्या आहेत. त्यामुळे उद्योग, शेती आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रातील कामे गतीने सुरू झाली की, या क्षेत्रातील मनुष्यबळाची मागणी वाढेल. Agni Path सेवाक्षेत्रालाही आपोआप गती येऊन सेवाक्षेत्रातील रोजगार संधी निर्माण होतील. न्याय योजनेसारखे लोकांना थेट पैसे वाटून लोकांचा आणि देशाचा काही फायदा होत नसतो. आपल्याकडे काहीही न करता पैसे घेणे, घेतलेले कर्ज बुडविणे या कल्पना समाजाला न रुचणा-या आहेत. कर्ज फेडता आले नाही तर आत्महत्या करण्याइतपत संवेदनशील समाज आपल्याकडे आहे. Agni Path हे सामाजिक मानसशास्त्र लक्षात घेऊनच सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करावी लागते. लोकांना काम करून कामाचे दाम हवे आहे. ‘देश के हित में करेंगे काम और काम का लेंगे पूरा दाम' अशी लोकांची भावना असते. Agni Path त्यामुळे केवळ रोख रक्कम देऊन किंवा सरकारी नोक-या देऊन सहजासहजी प्रश्न मिटेल, असे नसते. बेरोजगारी दूर करण्यासारखा विषय एक-दोन उपाय करून पूर्ण होणारा नाही. त्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज असते, हे लक्षात घेता केंद्र सरकारने काही उपाय केले आहेत. सरकारी उपक्रमांना विविध क्षेत्रात गती मिळाली की, आपोआप रोजगार निर्मितीचे काही मार्ग त्यातून खुले होत असतात. Agni Path संरक्षण विषयातील अग्निपथ, केंद्र सरकारमधील १० लाख पदांची भरती, पायाभूत सुविधांच्या विकासातील रोजगारवाढ, कृषी, उद्योग व सेवाक्षेत्रातील वाढत्या संधी यामुळे देशातील बेरोजगारी दूर होण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे. देशहित आणि सुरक्षित भवितव्य असे दोन फायदे या उपायांमध्ये अभिप्रेत आहेत, हा त्यातील आणखी महत्त्वाचा भाग आहे.