गिलगिट-बाल्टिस्तान चीनला देणार पाकिस्तान?

    दिनांक :23-Jun-2022
|
इस्लामाबाद,
Gilgit-Baltistan चीनच्या कर्जाखाली दबलेला पाकिस्तान आर्थिक संकटामध्ये अडकत चालला आहे. या कर्जातून मुक्त होण्यासाठी पाकिस्तान काश्मीरमधील (पीओके) बेकायदेशीरपणे ताब्यात असलेला गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग चीनच्या ताब्यात देण्याची तयारी करत असल्याचे समोर येत आहे. असे केल्याने पाकिस्तानला चीनचे कर्ज फेडण्यात काहीसा दिलासा मिळू शकतो. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तात पाकिस्तानच्या योजनेची माहिती देण्यात आली आहे. असे झाल्यास भारताची डोकेदुखी पुन्हा वाढू शकते.  मात्र, अमेरिका या कारवाईवर नाराजझाल्यास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) पाकिस्तानला मिळणाऱ्या मदतीवरही अडचणी येऊ शकतात. दक्षिण आशियात आपले वर्चस्व वाढवण्यासाठी संधी शोधणाऱ्या चीनसाठी  ही आयती संधी असू शकते. कारण, चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) केवळ गिलगिट-बाल्टिस्तानमधून जातो.
 
 
pak
तज्ज्ञांच्या मते- गिलगिट-बाल्टिस्तानचा Gilgit-Baltistan भाग आगामी काळात संघर्षाचे एक नवीन ठिकाण म्हणून उदयास येऊ शकतो. चीनला हे क्षेत्र बळकावणे इतके सोपे नसेल. आंतरराष्ट्रीय निषेधासोबतच गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये राहणारे लोक याविरोधात रस्त्यावर उतरू शकतात. सीपीईसीबद्दल तेथील लोक आधीच नाराज आहेत. गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशात सरकारने आधीच स्थानिक प्रशासनाला कमी अधिकार दिले आहेत. गिलगिट-बाल्टिस्तानमधील लोक रोजगार, वीज, शिक्षण यासारख्या अत्यावश्यक सेवांच्या अनुपलब्धतेमुळे त्रस्त आहेत. एका अहवालानुसार - पाकिस्तानातील एकूण आत्महत्यांपैकी ९% आत्महत्या याच भागात होतात. दुसरीकडे, गेल्या वर्षी अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर अमेरिका चीनला गिलगिट-बाल्टिस्तानवर कब्जा करू देण्याच्या स्थितीत नाही. अमेरिकन नेते बॉब लॅन्सिया यांच्या मते - जर गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग भारतात असता किंवा स्वतंत्र देश असता तर अमेरिका चीनला चोख प्रत्युत्तर देऊ शकली असती. अफगाणिस्तानला शस्त्रे पोहोचवण्यासाठी अमेरिकन सैन्य पाकिस्तानवर अवलंबून नाही.