गूढरम्य धक्कातंत्र!

    दिनांक :03-Jul-2022
|
- प्रा. नंदकुमार गोरे
परवा सर्व वाहिन्यांवर आणि अन्यत्र भारतीय जनता पक्षाचे Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याच्या बातम्या झळकत असताना देवेंद्र आणि काही ठरावीक लोकांना मात्र राज्याच्या राजकारणात काही तरी वेगळं होणार असल्याची कुणकुण लागली होती. एका वाहिनीवर काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखतीत राज्याच्या राजकारणात अनेक धक्कादायक निर्णय झालेले पाहायला मिळतील, असं म्हटलं होतं. Devendra Fadnavis देवेंद्र असे धक्कादायक निर्णय घेण्यात माहीर आहेत. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विश्वासात घेतलं असलं, तरी गेल्या दहा दिवसांमध्ये त्यांनी किंवा एकनाथ शिंदे यांनी कधीही चेहर्‍यावर तसे भाव येऊ दिले नव्हते. शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत तीव्र प्रतिक्रिया होती. पूर्वानुभव लक्षात घेता शिवसैनिक शिंदे किंवा त्यांच्या सहकार्‍यांना रस्त्यावर फिरू देणं शक्य नव्हतं. त्यातच ठाकरे यांनी एक शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर त्या सरकारला पाठिंबा द्यायला तयार होते. अशा अनेक अंतर्विरोधी घटनांमुळे राज्यातल्या ताज्या सत्तानाट्याचा शेवटचा अंक पार पडला आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारत Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातली सत्तास्पर्धा संपुष्टात आणली. आता पडद्यामागे हे सारं का आणि कसं घडलं याची चर्चा आहे.
 
 
nadd modi shah
 
राज्यातल्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवताना फडणवीस गेले काही दिवस अशा बारीकसारीक गोष्टींचा सतत विचार करत होते. सत्तेत येणार्‍या सरकारला फार त्रास होणार नाही, याची दखल त्यांना घ्यावी लागत होती. त्याचबरोबर शरद पवार, ठाकरे यांच्या व्यूहनीतीला शह देण्याचा Devendra Fadnavis देवेंद्र यांचा प्रयत्न होता. भाजपच्या जागा जास्त असल्या तरी कमी जागा असलेल्या गटाकडे मुख्यमंत्रिपद देऊन, महत्वाची पदं आपल्याकडे घेण्याची खेळी भाजपने यापूर्वी बिहारमध्ये खेळली होती. आताही नितीशकुमार भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री आहेत. जास्त जागा असल्यानं भाजप इतर राजकीय पक्षाला दबावाखाली काम करायला भाग पाडतो आणि आपल्याला जे साध्य करायचं आहे, ते करून दाखवतो, असं वारंवार प्रत्ययाला येतं. मात्र राजकारणात असं धक्कातंत्र वापरून राजकीय शह-काटशह देण्यात भाजपचा हात कुणीही धरू शकणार नाही, असं या घटनेनंतर अनेकांना जाणवलं.
 
 
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यामागे भाजपचा मोठा राजकीय हिशेब आहे, असं जाणवतं. भाजपने स्वतः सत्तेत दुय्यम भूमिका घेऊन शिंदे यांना मोठेपण देण्यामागे व्यूहनीती आहे. शिंदे यांच्या जिल्ह्यात राज्यातल्या सर्वाधिक महानगरपालिका आणि नगरपालिका आहेत. तिथे नजिकच्या काळात निवडणुका होणार आहेत. म्हणूनच ठाकरे यांच्या शिवसेनेला शह देण्यासाठी शिंदे यांच्यासारख्या मोहर्‍याला मुख्यमंत्री करण्याची खेळी Devendra Fadnavis फडणवीस यांनी केली. भारतीय जनता पक्षाला मराठवाडा, विदर्भात चांगलं यश मिळतं. पश्चिम महाराष्ट्रात मात्र भाजपला आपली पाळमुळं तयार करायची आहेत. धनंजय महाडिक यांच्यासारख्यांना राज्यसभेची उमेदवारी देणं असो वा अन्य निर्णय; भाजपने पश्चिम महाराष्ट्रात विस्तार करताना शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना जादा प्रतिनिधित्व दिलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापासून देवेंद्र यांनी बाहेर राहण्याविषयी शंका घेतली जात होती; मात्र ते सत्तेत सहभागी होत आहेत. देवेंद्र यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहायचं ठरवलं होतं; परंतु नड्डा आणि शहा यांच्या आदेशानुसार त्यांनी सत्तेत सहभागी होण्याचं ठरवलं. शिंदे यांच्या रुपाने ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद मिळणार आहे. भाजपच्या भूमिकेने देशातल्या राजकीय वर्तुळाला धक्का बसला आहे.
 
 
गेल्या 25 वर्षांमध्ये एकही निवडणूक न हरलेल्या, रिक्षाचालक म्हणून आपला प्रवास सुरू केलेल्या शिंदे यांना मिळालेली मुख्यमंत्रिपदाची संधी लक्षवेधी आहे. त्यांच्या निमित्ताने सातारा जिल्ह्याला चौथ्यांदा मुख्यमंत्रिपद लाभलं आहे. मुख्यमंत्रिपदाची घोषणा झाल्यावर शिंदे म्हणाले, मी खर्‍या अर्थाने आज राज्याचा विकास घेऊन पुढे निघालो आहे. मतदारसंघातले प्रश्न, निवडणुकीत येणार्‍या अडचणींच्या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला. ज्या राज्याबरोबर केंद्र सरकारची ताकद उभी राहते, ते सरकार मजबूत आहे. ठाणे महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम केल्यानंतर 2004 पासून एकनाथ शिंदे विधानसभेवर निवडून जात आहेत. ‘आक्रमक शिवसैनिक ते शाखाप्रमुख ते जबाबदार मंत्री’ अशी त्यांची ओळख आहे. शिवसेनेत येण्याअगोदर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेचे प्रमुख होते. आता एक शाखाप्रमुख मुख्यमंत्री झाल्याचा आनंद संघाला साजरा करता येईल. शिंदे आणि भाजपमध्ये एक पूल उभा राहण्याला शिंदे यांची ही ओळखही उपयोगी पडली असावी.
 
 
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असताना Devendra Fadnavis फडणवीस-शिंदे युतीवर जोरदार निशाणा साधला होता. बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरण्याचं ‘पुण्य’ तुम्हाला लागेल, तर तुमच्यावर विश्वास ठेवण्याचं ‘पाप’ माझ्या माथी लागेल, असं वक्तव्य उद्धव यांनी केलं होतं. महाविकास आघाडीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला; पण एकनाथ शिंदे शिवसेनेचा मुख्यमंत्री करू शकतील का, असा प्रश्न राऊत यांनी केला होता. फडणवीस यांनी आपल्या कृतीतून या टीकेला अगदी चपखल उत्तर दिलं. आपण शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं, हे दर्शवण्यासाठी फडणवीस यांनी ही खेळी खेळली आहे. यामुळे शिवसेनेविरोधातली लढाई सोपी जाईल. बंडखोर एकत्र राहतील, हा त्याचा आणखी एक फायदा असू शकेल. महाराष्ट्रात ठाकरे नावाचा ब्रँड आहे. सध्या ठाकरेच सत्तेतून बाहेर गेले आहेत. शिवसेना हा केडर बेस पक्ष असल्याने ही प्रक्रिया राज्यभरात भाजपच्या विरोधात जाणारी आहे. म्हणूनच त्यांनी हा डाव खेळला. आम्ही ठाकरे ब्रँड पुसला नाही; ठाकरेंच्याच पक्षात घडलेले शिंदे हे शिवसैनिक महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून दिले, हा त्यांच्या डावपेचाचा पहिला आणि महत्त्वाचा भाग आहे. हा शिवसेनेवर तिच्याच शस्त्राने करण्यात आलेला वार आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं ते सांगू शकतील. उद्या होऊ शकणार्‍या टीकेला त्यांनी आधीच उत्तर दिलं आहे. शिंदे यांच्या बंडानंतर उरलीसुरली शिवसेनासुद्धा आपल्या बाजूने खेचून घेण्याचा विचार Devendra Fadnavis फडणवीस यांच्या डोक्यात सुरू असू शकेल. दुसरं म्हणजे, प्रादेशिक पक्षांना संपवण्याच्या राजकारणाचा तो भाग असू शकतो. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आल्याने इतर शिवसैनिक त्यांच्या पाठिशी येऊ शकतात.
 
 
लोकसभा निवडणुका आणखी दोन वर्षांनी आहेत. अशा वेळी शिवसेनेला सोबत घेणं भाजपसाठी महत्त्वाचं आहे. राजकारणात काहीही शक्य असल्यामुळे ‘झालं गेलं विसरून जा’, इथून पुढे सोबत राहू, असाही एक संदेश त्यांना शिवसेनेला नंतर देता येऊ शकेल. शिंदे यांच्या नियुक्तीतून आपणच महाराष्ट्राचा खरा नेता आहोत, बाकी कुणी महाराष्ट्राचे नेते नाहीत, असं भाजपला दर्शवायचं आहे. सध्याच्या सरकारवर कोर्ट-कचेर्‍यांची टांगती तलवार आहे. आगामी काळात सरकारला स्थैर्य प्राप्त झाल्यावर Devendra Fadnavis फडणवीस मुख्यमंत्री होतीलही; पण सध्या तात्पुरता का होईना, त्यांनी या पदापासून दूर राहायचं ठरवलं. आता ते मुख्यमंत्री झाले असते तर फडणवीस उतावळे आहेत, असं चित्र होऊ शकलं असतं; पण आपल्याला पदाची लालसा नाही, असं दाखवून पहाटेच्या शपथविधीचा डाग पुसण्याचा प्रयत्नही केला आहे. राज्यशकट वकुबाने हाकण्यात ठाकरे यांच्या वरचढ असल्याच्या मुद्यामुळेही फडणवीस यांनी शिंदे यांना संधी दिलेली असू शकते. कारण ठाकरे सत्तेवरून गेले असल्यामुळे त्यांच्याशी सतत तुलना होत राहणार, हे निश्चित. यामुळे तुलना होणार हे नक्की. याचा विचार करूनच फडणवीस यांनी शिंदे यांना ‘बॅड पीच’वर खेळण्यासाठी पाठवलं आहे.
 
 
Devendra Fadnavis फडणवीस गेल्या काही वर्षांपासून मराठा लॉबीचं राजकारण करत आहेत. हा त्याचाही एक भाग असू शकतो. फडणवीस यांनी एक मोठा प्रोजेक्ट आपल्या हाती घेतला आहे. या प्रोजेक्टमध्ये त्यांना ओबीसीपेक्षा मराठा समूह राजकारणासाठी महत्त्वाचा आहे. याला ‘मराठा कॉन्फिडन्सी’ असं संबोधतात. म्हणजे पहिल्या बाजीरावांच्या काळात मराठा कॉन्फिडन्सी राज्यात निर्माण झाली होती. मराठा कॉन्फिडन्सीचा अर्थ मराठा नेत्यांची एक प्रकारची लॉबींग. उदाहरणार्थ, विखे-पाटील, मोहिते पाटील, महाडिक, भोसले आणि आता शिंदे यांच्यासारखे मोठे मराठा नेते फडणवीस आणि भाजपने आपल्या बाजूने उभे केले आहेत. फडणवीसांचा हा प्रोजेक्ट यशस्वी झाला तर कदाचित पुढच्या 20 वर्षांमध्ये राज्यात भाजपचीच सत्ता असेल. हा भाजपचा दूरदृष्टीचा आणि लांब पल्ल्याचा प्रोजेक्ट असेल. या प्रोजेक्टसाठी Devendra Fadnavis फडणवीसांनी हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय असू शकतो.