गोवंश तस्करीतील वाहन परत करण्यास न्यायालयाचा नकार

    दिनांक :06-Jul-2022
|
अकोला, 
Cattle Smuggling Vehicle कत्तलीच्या हेतूने अवैध गोवंश वाहतूक करणारा कंटेनर बोरगावमंजू पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे शाखेने 25 नोव्हेंबर 2021 रोजी पकडला होता. त्या वाहनात 21 गोवंशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील जप्त कंटेनर परत मिळावा यासाठी संबंधितांकडून न्यायालयात अर्ज करण्यात आला. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत वाहन ताब्यात देण्यास नकार दिला आहे.
 
Cattle Smuggling Vehicle
 
Cattle Smuggling Vehicle स्थानिक गुन्हे शाखेने 25 नोव्हेंबर 2021 रोजी सापळा रचून युपी 27 टी 2672 क्रमांकाच्या कन्टेनरची तपासणी केली. यात 44 गोवंश निर्दयतेने कोंबलेले आढळले. यातील 21 गोवंशांचा मृत्यू झाला होता. तर 23 गोवंश गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. या कंटेनरची तपासणी करीत असताना चालक व वाहक पळून गेले. जिवंत गोवंश तातडीने पोलिसांनी उपचार व संगोपनाकरिता आदर्श गोवसेवा एवं अनुसंधान प्रकल्पाकडे पाठविले. तेव्हापासून ते संस्थेकडेच आहे. तब्बल सात महिन्यांनी बोरगाव मंजू पोलिसांनी या घटनेतील आरोपीला अटक केली. उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेला गोवंश तस्कर बहारे आलम याने कन्टेरनवर मालकी हक्क सांगून तो सुपूर्तनाम्यावर ताब्यात देण्याचा अर्ज न्यायालयात केला होता.
 
 
पाचवे प्रथम श्रेणी न्या. मृणालिनी भराडे यांच्या न्यायालयात त्यावर सुनावणी झाली. त्यात आदर्श गोरक्षण संस्थेमार्फत आरोपीच्या अर्जावर हरकत दाखल करून जप्त वाहन गोवंशाचा सांभाळ खर्चाकरिता सुरक्षा म्हणून प्रकरण संपेपर्यंत कायम स्वरूपी जप्त करण्याची विनंती न्यायालयाला केली. जप्त गोवंशाचा सांभाळ खर्च मिळाल्यानंतरच वाहन आरोपीच्या ताब्यात देण्यात यावे असे हरकतीत नमूद करण्यात आले. याप्रकरणी न्यायालयाने वाहनाचा मालक गोवंशाचे चारा व सांभाळ करण्याचा खर्च देण्यात मनाई करत असेल तर त्याला त्याचे वाहन परत करता येणार नाही, असा निर्वाळा देत आरोपीचा अर्ज खारिज केला.