समन्वय महर्षी प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज

6 जुलै. प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त...

    दिनांक :06-Jul-2022
|
प्रासंगिक
- अ‍ॅड. वंदना नवघरेे
आज आपण भारताचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत. इतिहासाचा मागोवा घेताना पौराणिक, ऐतिहासिक, राजकीय घटनांचा त्या संदर्भातील ग्रंथाचा अभ्यास कसा आपल्या समोर मांडला गेला, त्याची खंत आपण व्यक्त करीत आहोत. इतिहास कसा लिहावा, तो कोणी लिहावा, कोणत्या इतिहासावर विश्वास ठेवावा, इतिहासाच्या घटना, त्यातील चरित्र, तत्त्वज्ञान यावर समग्र मार्गदर्शन, स्वउत्कर्ष-बोधक इतिहास याचे मर्म सांगणारे, जाणणारे प्रज्ञाचक्षू श्रीसंत Gulabrao Maharaj गुलाबराव महाराज. आषाढ शुद्ध दशमी, 6 जुलै 1881 हा महाराजांचा जन्म दिवस. रुक्मिणीच्या माहेरी अमरावती जिल्ह्यात महाराजांचा जन्म झाला. दृष्टिबाधित असून या प्रज्ञाचक्षूने विविध विषयांवर 137 ग्रंथसंपदा निर्माण केली.
 
 
6 जुलै. प्रज्ञाचक्षू श्रीसंत गुलाबराव महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त...
 
‘धर्म तु साक्षात् भगवत्प्रणीतम्’ भगवंताच्या आज्ञेनुसार धर्मतत्त्वांना स्थापित करण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर आपले सेवक, प्रतिनिधी रूपात संतांना अवतार रूपात पाठवितात. प्रत्येक कालखंडात अशा अवतारी संताचे कार्य ही भरतभूमी-पुण्यभूमीची विशेषता आहे. हिंदू धर्मावरील मळभ श्री शंकराचार्यांनी दूर केलं. यवनी राज्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास स्वामींनी ध्वजपताका फडकवल्या. गुलाबराव महाराजांचा जन्म झाला त्यावेळी इंग्रज अन् निजामाचे राज्य होते. यवन, पठाण, शक यानंतर ख्रिस्ती धर्माचे राज्य ब्रिटिश राजसत्तेत होते. या अमृतमहोत्सवी वर्षात ‘दिव्यांग’ संतसाहित्याचा अभ्यास करताना त्यांच्या द्रष्टेेपणाचा प्रत्यय झाला. इंग्रजांनी नानाप्रकारे हिंदू धर्म संस्कृतीवर आघात करणे सुरू केले होते. थिऑसॉफिकल सोसायटी त्याचं एक अपत्य. फाड्फाड् इंग्रजी बोलणं ऐकून लोक प्रभावित होत. अनेक तरुण, शिक्षित त्यांच्या छताखाली येणे सुरू झाले होते. महाराजांनी त्यांची भाषणं ऐकली. त्यांचे खंडन केले. अनेक तरुणांचा या संघटनेपासून दूर ठेवण्यात Gulabrao Maharaj  महाराज यशस्वी झाले.
 
 
कोणत्याही तथाकथित शाळेत न जाता विविध विषयांचे मार्मिक सडेतोड, तर्कशुद्ध लेखन, प्रबोधन करणारे महाराज अलौकिक अद्वितीय रत्न. वाचकहो, आज पश्चिम बंगालची स्थिती आपण जाणतो. यावर महाराज 1900 च्या पहिल्या दशकांत लिहितात, सांगतात, बंगालमध्ये ही सामाजिक, शैक्षणिक स्थिती राहिली तर 100 वर्षांत तेथे हिंदू अल्पसंख्यक होतील. बंगालमध्ये मोठ्या प्रमाणांत शैक्षणिक क्रांतीतून वैचारिक अध:पतन गुरुदेव ठाकूर स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या काळात सुरू झाले होते. वेदान्ताचे महत्त्व जाणणारे, सांगणारे, तत्त्वज्ञ, ज्यांनी जगाला नरेंद्र रूपात स्वामी विवेकानंद दिलेत, त्यांच्याबद्दल लॉर्ड मॅक्समुलर आपल्या एका पत्रात श्री रामकृष्णांचा ‘महात्मा’ म्हणून उल्लेख करतात. भारताचे दुर्दैव, इंग्रजांनी सुरुवातीला मेकॉलेला शिक्षणमंत्री म्हणून भारतात पाठवले. त्याच्याकडून हवे तसे ख्रिस्तीकरण झाले नाही म्हणून मॅक्समुलरला भारतात पाठवले. मॅक्समुलर आपल्या पत्नीला पाठविलेल्या पत्रात खंत व्यक्त करतात. येथे हिंदू धर्म ग्रामपंचायतपर्यंत रुजलेला आहे. मेकॉले असो वा मॅक्समुलर यांच्या शिक्षण पद्धतीवर इंग्रजांचा धर्मप्रचार-प्रसाराचा कुटिल डाव म्हणून भाष्य करतात. वेद पाठशाळा, संस्कृत पाठशाळा याचं अनुदान, संस्थानिक देत असत. ते रद्द केलं. ब्राह्मणांनी वेदाध्ययन करावे. संस्कृत पाठशाळा पुनर्जीवित कराव्या यासाठी Gulabrao Maharaj महाराजांचा आग्रह होता. यालाच संताचं द्रष्टेपण म्हणतात.
 
 
आर्य म्हणजे सुसंस्कृत विश्वव्यापक आर्य संस्कृतीचा सिद्धांत मांडणारे नव्हे, तर तीन हजार वर्षांपूर्वी सर्व जगात एक आर्य संस्कृतीच होती, असं ठाम सांगणारे गुलाबराव महाराज एक अवतारी संत, पाश्चात्त्य संतांची त्याच्या विविध थिअरीची समीक्षा, चर्चा यातून सर्व चेतनवाद सिद्ध करणारे महाराज कोण...? तर दिव्यांग, दृष्टिबाधित, अंध असूनही भारतीयांचे अथांग विचार-वैभव आपल्या ग्रंथसंपदेतून प्रकट केले. संस्कृत, हिंदी, ब्रजभाषा, मराठी, वर्‍हाडी भाषांमधून गद्य, पद्य पत्रलेखन, अभंग, पदरचना निर्मितीचे जनक प्रज्ञाचक्षू ‘ज्ञानेश्वरकन्या’ म्हणून स्वत:ला समजणारे महाराज आपल्या विदर्भभूमीचे पुत्र. देवर्षी नारदांच्या आज्ञेने भक्तिधर्माच्या स्थापनेसाठी प्रत्येक कलियुगांत संतांचे अवतार कार्य सुरू असते. मधुराद्वैत संप्रदायाला भक्तीचे 16 प्रकार विशद करून महाराजांनी आम्हाला दृष्टी दिली. श्री गोविंदगिरी महाराज, महाराजांवरील प्रवचनांतून जेव्हा चरित्राची ओळख करून देतात त्यावेळेस ते त्यांचा ‘समन्वय महर्षी’ असा उल्लेख करतात. या अल्पायुषी, बुद्धिनिष्ठ, प्रज्ञावंत, प्रतिभावंत संताने भारतीयांना स्वत:ला जाणून घेऊन सत्त्वसंपन्न, समर्थ व्हावे यासाठी प्रबोधन केले. आषाढी देवशयनी एकादशी ते कार्तिक प्रबोधिनी एकादशी चातुर्मासात या दिव्यांग संताचा संक्षिप्त परिचय व्हावा; त्यांचे कार्य सर्वांसमोर यावे यासाठी हा लेखन प्रपंच. संतश्री Gulabrao Maharaj गुलाबराव महाराजांना कोटी कोटी नमन...! 
 
- 9923504616