इलय्या राजा, पी. टी. उषासह चार जणांची राज्यसभेत वर्णी

    दिनांक :06-Jul-2022
|
नवी दिल्ली, 
केंद्र सरकारने संगीतकार इलय्या राजा आणि दिग्गज भारतीय धावपटू P. T. Usha पी. टी. उषा यांच्यासह चार जणांची राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. या दोघांसह सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र हेगडे आणि पटकथा लेखक, दिग्दर्शक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनाही राज्यसभेसाठी संधी मिळाली आहे.
 
Ilayya Raja p. T. Usha
 
या चारही सदस्यांना शुभेच्छा देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या चौघांनीही आपापल्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. इलय्या राजा यांच्या सर्जनशील प्रतिभेने अनेक पिढ्यांना मोहित केले आहे. त्यांचा जीवन प्रवासही अतिशय प्रेरणादायी राहिला आहे. आपल्या नम‘तेने त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचाही अमिट ठसा उमटविला.
 
 
पी. टी. उषा P. T. Usha प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेत. क्रीडा क्षेत्रातील तिची कामगिरी सर्वश्रुत आहे, पण गेल्या अनेक वर्षांपासून नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे तिचे कार्यही कौतुकास्पद आहे. वीरेंद्र हेगडे समाजसेवेत आघाडीवर आहेत. धार्मिकस्थळे, आरोग्य, शिक्षण आणि संस्कृतीच्या क्षेत्रात त्यांच्या कामगिरीचे आपण साक्षीदार राहिलो आहोत. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी आपल्या कलाकृतीतून भारताच्या वैभवशाली संस्कृतीचे दर्शन घडविले, असा गौरवपूर्ण उल्लेखही मोदींनी केला.