एनआयएची अमरावतीत दिवसभर छापेमारी

- एकाची कसून चौकशी
- सात आरोपी मुंबईकडे रवाना

    दिनांक :06-Jul-2022
|
तभा वृत्तसेवा 
अमरावती, 
NIA raids एनआयए अधिकारी व पोलिसांनी बुधवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडीया (पीएफआय) जिल्हाप्रमुखाला ताब्यात घेऊन चौकशी केली. काही तासानंतर त्याला सोडण्यात आल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. सोहेल, असे त्या प्रमुखाचे नाव असून तपासासाठी आवश्यक माहिती मिळविण्यासाठी त्याला बुधवारी सकाळी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. दुपारपर्यंत नागपुरी गेट पोलिस ठाण्यातच त्याची चौकशी झाली. काहीच माहिती समोर न आल्याने चौकशीनंतर त्याला सोडण्यात आले.
 
NIA raids 
 
दरम्यान एनआयएच्या पथकाने NIA raids बुधवारी दिवसभर पाच वेगवेगळे पथक तयार करून ठिकठिकाणी छापेमारी केली. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक पोलिसांचे पथकही होते. ही छापेमारी कोल्हे हत्याकांडात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घरी व धमकीचे फोन करणार्‍यांकडे करण्यात आली. त्यात काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती आहे. सदर प्रकरणाचा एनआयए गंभीरतेने तपास करीत आहे. सर्व शक्यता पडताळून पाहत आहे. नव्याने हाती लागलेल्या एका व्हीडीओची तपासणी सध्या करण्यात येत आहे.
 
 
सखोल माहिती मिळविण्याचा प्रयत्न तपास यंत्रणेकडून होत आहे. दुसरीकडे कोल्हे हत्याकांडात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना बुधवारी सकाळी 50 पोलिसांच्या कडक बंदोबस्तात वाहनाने मुंबईकडे रवाना करण्यात आले. या आरोपींना 8 जुलैला मुंबई न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एनआयए त्यांची कोठडी मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. या प्रकरणातील आठवा आरोपी शमीम यांच्या घरी छापा टाकण्यात आला. सध्या तो फरार आहे. त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे. लवकरच त्यालाही ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. एनआयएचे पथक आणखी काही दिवस अमरावतीतच राहणार आहे.