महागाईविरोधात काँग्रेसची निदर्शने

    दिनांक :05-Aug-2022
|
- राहुल गांधी, प्रियांका वढेरासह अनेक नेत्यांना अटक

नवी दिल्ली, 
महागाई, बेरोजगारी तसेच खाद्यपदार्थांवर जीएसटी लावण्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज शुक‘वारी देशव्यापी निदर्शने केली. राजधानी दिल्लीत निदर्शने करताना Congress काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियांका वढेरा यांच्यासह अनेक नेत्यांना अटक करण्यात आली. काँग्रेसने संसद भवनापासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला. मात्र, राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचण्याआधीच विजय चौकात पोलिसांनी राहुल गांधी आणि अन्य नेत्यांना अटक केली. अटक केल्यानंतर या सर्व नेत्यांना किंग्ज-वे पोलिस कॅम्पमध्ये नेण्यात आले.
 
 
rahul priyanka
 
महागाई आणि अन्य मुद्यांवरून Congress काँग्रेसने देशव्यापी निदर्शनांची घोषणा केली होती. या अंतर्गत काँग्रेसने दिल्लीत 7 लोककल्याण मार्ग म्हणजे पंतप्रधान निवासस्थानाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. सोबतच ब्लॅक फ्रायडे पाळण्याची घोषणाही केली होती. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वढेरा तसेच अन्य सर्व काँग्रेस नेते काळे कपडे परिधान करून होते. संसद भवनातून काढण्यात आलेल्या मोर्चात सोनिया गांधी काही वेळासाठी सहभागी झाल्या. पंतप्रधान निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी प्रियांका वढेरा 24 अकबर रोड या काँग्रेस मुख्यालयात आल्या होत्या. पोलिसांनी काँग्रेस नेते मुख्यालयातून बाहेर पडू नये म्हणून अडथळे उभारले होते. प्रियांका वढेरा यांनी या अडथळ्यावर चढून बाहेर उडी मारली. नंतर त्या तिथेच धरण्यावर बसल्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांना आणि अन्य नेत्यांना अटक केली. देशात लोकशाहीची हत्या केली जात असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी ट्विटमधून केला होता.
 
 
महागाईमुळे लोक त्रस्त असताना मोदी यांनी देशाची संपत्ती आपल्या काही मुठभर मित्रांना विकली. या लोकांजवळ भरपूर पैसे असल्यामुळे त्यांना महागाई जाणवत नसल्याचा आरोप प्रियांका वढेरा यांनी केला. महागाई, बेरोजगारी, जीएसटी आदी मुद्यांवरून आज पुन्हा एकदा Congress काँग्रेसच्या खासदारांना निदर्शने करण्यापासून रोखण्यात आले, असा आरोप करताना जे घाबरतात, तेच दुसर्‍याला घाबरवतात, असे ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी केले.