तभा वृत्तसेवा
पथ्रोट,
सर्वसाधारणतः ऑक्टोबरनंतर सकाळी धुके (Fog) पडते, मात्र यंदा श्रावण मासातच धुके पडल्याने शेतकरी धास्तावला आहे. पथ्रोट परिसरात शुक्रवारी सकाळची पहाट धुके घेऊन उगवली.
आपल्या सभोवतालच्या हवेत पाण्याची वाफ असते, ज्याला आपण आर्द्रता म्हणतो. शतकानुशतके पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील उबदार हवेत असलेली पाण्याची वाफ वरील थंड हवेच्या थरामध्ये मिसळून गोठते. या प्रक्रियेला संक्षेपण म्हणतात. जेव्हा हवेत जास्त संक्षेपण होते तेव्हा ते जड होते आणि पाण्याच्या लहान थेंबामध्ये बदलू लागते. सभोवतालच्या थंड हवेच्या संपर्कात आल्यावर त्याचे स्वरूप धुराच्या ढगासारखे होते. यालाच हवामानशास्त्रज्ञ धुक्याची निर्मिती म्हणतात.
धुक्यास ग्रामीण भागात धुवारीही म्हटल्या जाते. अवेळी पडलेले धुके शेतशिवारातील पिकांना बाधक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. धुके पडल्यानंतर त्यावर पावसाची हजेरी लागल्यास पिके बाधित होत नसल्याचे जुनीजाणती मंडळी सांगतात. धुवारी पडल्याने पिके दवाळतात अर्थात किटकांचा, मावा, तुडतुडे, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. सर्वाधिक फटका ज्वारी, वेलवर्गीय भाजीपाला, फळबागासह कडधान्य वर्गीय मूग, उडीद, बरबटी, वाल यांना बसतो, असे शेतकर्यांनी सांगितले. धुके पडल्याने शुक्रवारी काहींनी तात्काळ किटकनाशकांची फवारणी केल्याचे शिवारात फटका मारला असता दिसून आले. सुलतानी संकट, वन्यप्राण्यांचा हैदोस, शेतात माजलेले तण, मजूर टंचाईसह आता आसमानी संकटातील धुकेही पिकांच्या जीवावर, मुळावर उठणार काय हा प्रश्न बळीराजास पडला आहे.