विमाने लडाख सीमेपासून दूर ठेवा

    दिनांक :05-Aug-2022
|
- भारताने चीनला सुनावले
 
नवी दिल्ली, 
आपली लढाऊ विमाने लडाख सीमेपासून दूर ठेवण्यास India-China भारताने चीनला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे. मागील काही दिवसांत चिनी विमाने भारतीय सीमांपर्यंत येऊन पोहोचली होती. यानंतर हा इशारा देण्यात आला आहे. शिवाय दोन दिवसांपूर्वी अमेरिकन सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर चीन आगपाखड करीत असतानाच भारताने ही खंबीर भूमिका घेतली आहे, हे विशेष. भारताने उपरोक्त मुद्यावर मागील मंगळवारी चीनसोबत चुशूल मोल्डो येथे लष्करी मेजर स्तरावर एक बैठक आयोजित केली होती. यात पूर्व लडाख क्षेत्रात शेजारी देशाकडून होत असलेल्या प्रक्षोभक कारवायांबाबत विरोध व्यक्त केला. यावेळी वायुसेनाचे एअर कोमोडोर सुद्धा उपस्थित होते. उल्लेखनीय म्हणजे, लष्कराच्या एखाद्या बैठकीत भारतीय वायुसेनाच्या अधिकार्‍याने उपस्थित राहणे, ही बाब पहिल्यांदा घडली असल्याचे सूत्राने सांगितले.
 
 
India-China
 
बैठकीत भारतीय अधिकार्‍यांनी चिनी विमानांनी आपल्या मर्यादेतच उड्डाण करावे तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि 10 किमीच्या विश्वासदर्शक रेषेचे पालन करावे, असे स्पष्ट शब्दांत नमूद केले. या संदर्भात एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, भारत प्रत्यक्ष नियंत्रणे रेशेच्या पलीकडील हालचाली आणि कारवायांवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. दरम्यान, India-China भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाख क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी अनेक वेळा आणि विविध स्तरावर बैठका पार पडल्या आहेत. परंतु, दुसर्‍या बाजूने सातत्याने प्रक्षोभक कृत्ये होत असल्याचे आढळून आले आहे. मागील एक ते दोन महिन्यांच्या कालावधीत विमानांनी भारतीय सीमेच्या अतिशय जवळून उड्डाण केले होते.