शाळा नव्हे, विद्यार्थ्यांचा कोंडवाडा!

- पाच वर्गातील 76 मुले एकाच खोलीत

    दिनांक :05-Aug-2022
|
तभा वृत्तसेवा 
चिखलदरा, 
मेळघाटातील शिक्षणाकडे अधिकार्‍यांचे किती लक्ष आहे हे दहेंद्री ढाणा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरून दिसून येते. या ठिकाणची शाळा (School) म्हणजे विद्यार्थ्यांकरता कोंडवाडा झालेला असून एकच शिक्षक असल्याने पाच वर्गाचे 74 विद्यार्थी एकाच वर्गखोलीत कोंबून भरण्यात येतात.
 
School 
 
मेळघाटातील प्रत्येक गावात शाळा आहेत, शिक्षकही आहेत, परंतु शिक्षण अपवादानेच पाहायला मिळते. मेळघाटातील आदिवासी पाड्या, वस्तीतील मुले दहावीच्या पलीकडे शिक्षण घेताना दिसत नाहीत. साक्षरतेचे प्रमाण अजूनही मेळघाटात कमीच आहे. शासनाने शिक्षणाच्या बाबतीत मेळघाटात पाहिजे तसे प्रयत्न केलेले नाहीत. मागील पाच सहा वर्षात मेळघाटातील शिक्षण विभाग वार्‍यावर चालत आहे. कारण मेळघाटातील नागरिक अजूनही शिक्षणाच्या बाबतीत इतके जागरूक झालेले नाहीत ही मेळघाटची शोकांतिका आहे. मागील चार-पाच वर्षात शिक्षण विभागाचे मोठे अधिकारी किंवा संबंधित विभागाचे मंत्री सुद्धा मेळघाटात फिरकले नाहीत, त्यामुळे स्थानिक अधिकार्‍यांचा मनमानी कारभार सुरू आहे. असाच काहीसा प्रकार चिखलदरा तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या दहेंद्री ढाणा येथे दिसून आला.
 
 
येथे जिल्हा परिषदेची वर्ग 1 ते 5 पर्यंतची मराठी शाळा आहे, तसेच पटसंख्या 76 असून एकच शिक्षक आहे. यामुळे आदिवासी मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दहेंद्री ढाणा गावामध्ये नियमानुसार तीन शिक्षकांची गरज आहे. या अगोदर चिखलदरा पंचायत समितीच्या खंडविकास अधिकार्‍यांना पत्राद्वारे ही माहिती देण्यात आलेली आहे. एक शिक्षक एवढे विद्यार्थी सांभाळू शकत नाही तसेच 1 ते 5 वर्ग असून दोनच खोल्या आहेत. त्यामधीलही एक खोली पडक्या अवस्थेत आहे. एवढी मुले दोन खोल्यांमध्ये कोंबल्यासारखे बसविल्या जात आहेत. शाळेला नवीन इमारत देण्यात यावी आणि शाळेला अतिरिक्त शिक्षक देण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सरपंच संजू साकोम, उपसरपंच पुन्या येवले तसेच सदस्य संदीप पंडोले, पिंकू कास्देकर, अस्मिता येवले यांनी केली आहे.
 
 
याबाबत बोलताना चिखलदरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अरुण शेगोकर म्हणाले की, सध्या शिक्षकांच्या बदल्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. बरेचसे लोक चिखलदरा तालुक्यातून बदलून गेले आणि नवीन भरती सुद्धा बंद असल्यामुळे आणि त्यातच आपल्याकडे शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे आपण दहेंद्री ढाणा येथे शिक्षक देऊ शकत नाही.