ट्रेकिंगची पूर्वतयारी

    दिनांक :05-Aug-2022
|
इतस्तत:
- रविबाला काकतकर
अंगकामी या दोनदा एव्हरेस्ट सर केलेल्या वीराची मुलाखत घेतली गेली. ‘शिखरावर पोहोचल्यावर तुम्हाला काय वाटले?’ यावर त्यांनी दिलेले उत्तर आश्चर्य वाटविणारे होते. ‘मला झालेल्या आनंदापेक्षा चिंता सतावत होती की, मी सुरक्षित कसा उतरेन?’ उंच शिखरे पादाक्रांत करताना डोंगर चढ-उतारासाठी शरीराचीही पूर्वतयारी खूप महत्त्वाची असते. प्रथमच उंच डोंगर चढण्याची वेळ असेल तर जवळपासची एखादी टेकडी किमान तीन-चार वेळा चढून उतरलेली असेल तर मोठा Trekking ट्रेक सहज पूर्ण करता येतो. जंगल आणि दर्‍याखोर्‍यातील भटकंती जीवनाला संपन्न करते. निसर्गाशी नाते जोडल्यामुळे भरभरून मिळणारे मोठे अवकाश आपल्या व्यक्तिमत्त्वाची क्षितिजेही विशाल करतात. अनेकांशी सुसंवाद, नेतृत्वगुण, डोंगरातल्या अरुंद वाटांवरून चालण्यामुळे सतर्कता अंगी बाळगायला शिकणे इत्यादींसाठी Trekking ट्रेकिंग हे एक प्रभावी माध्यम आहे. डोंगर-चढाई, जंगलातील वास्तव्य यासाठीची तयारी आणि वस्तूंची जमवाजमव कशी करावी? याची मूलभूत माहिती त्यासाठी आवश्यक आहे.
 
 
Treking
 
महाराष्ट्रात भरपूर गड-किल्ले आणि डोंगर आहेत. एकेक-दोन-दोन दिवसांचे ट्रेक्स आखणार्‍या बर्‍याच संस्था आहेत. पहिलाच Trekking ट्रेक करणार्‍यांना अनामिक भीती असते. परंतु पुरेशा तयारीनिशी गेल्यास गैरसोय आणि धोकेही टाळता येतात; ट्रेकिंगचा आनंद घेता येतो. खूप दमलो तरी प्रत्येक अनुभव नवा धडा देत राहतो. त्याची गंमत वेगळीच असते. महाराष्ट्रांतर्गतचे ट्रेक्स आणि हिमालयीन बर्फातील ट्रेक्स यासाठी सामानाची तयारी मात्र भिन्न असते. महाराष्ट्रांतर्गत ट्रेक्ससाठी पावसाळा नसेल तर साधी पाठीवर घेण्याची थैली (Sack) चालते. बर्फात वॉटरप्रुफ कापडाची थैली हवी. एकापेक्षा जास्त दिवसांच्या सामानानुसार थैलीच्या आकाराची निवड करावी.
 
 
बरोबर नेण्याचे साहित्य : पावसाळ्यात चादर, कपडे इत्यादींचे पाण्यापासून संरक्षण व्हावे म्हणून प्लॅस्टिकच्या पिशव्या आवश्यक ठरतात. सध्या परवानगी असलेल्या जाड प्लॅस्टिक पिशव्या वापरू शकता. वापरलेले किंवा ओले झालेले कपडे वेगळे ठेवण्यासाठी, रबरी स्लीपर्स, छोटे कपडे जसे मोजे-रुमाल इत्यादींसाठी तसेच खाण्याचे पदार्थ, जंगलातल्या दुर्मिळ वस्तू, दगड, वनस्पती इत्यादी गोळा केल्यास ठेवण्यासाठी, वेगवेगळ्या पारदर्शी पिशव्या वापरण्यामुळे या वस्तू पटकन मिळतात. ग्लुकोज, बिस्किटांचा पुडा, इलेक्ट्रॉल पावडर, पाण्यासाठी बाटली, कॅप या आवश्यक होत. त्यातही अम्पायरसारखी बाजूला कड असलेली हरीं जरूर घ्यावी; हिच्यामुळे मागून-पुढून कुठूनच ऊन लागत नाही तसेच बर्फात सूर्यकिरण परावृत्त होण्यामुळे सनबर्नचा धोका अधिक असतो. त्यापासूनच्या बचावासाठी बर्फातल्या ट्रेक्सलाही ही हरीं अतिशय उपयुक्त ठरते! एक चांगली मध्यम जाड 15 फुटी दोरी अनेक उपयोगांसाठी जसे डरलज्ञ चा बेल्ट तुटल्यास, कपडे वाळत घालण्यासाठी, वेळ आल्यास दोन झाडांना बांधून पाण्याचा प्रवाह ओलांडण्यास उपयोगी ठरू शकते.
 
 
वर्तमानपत्रांचे कागद :Trekking  किमान सात-आठ. थंडीत उबेसाठी, दोन पांघरूणाच्या आत सेफ्टी पिनने टाचण्यासाठी, सतरंजीच्या खाली घातल्यास कागद उष्णतानिरोधक असल्यामुळे थंडीपासून बचावासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. पावसाळ्यात ओले बूट कोरडे होण्याकरिता आतून-बाहेरून खुपसून ठेवण्यासाठी, पावसाळ्यात ओले कपडे बांधून ठेवल्यास हडकण्यासाठी, खाण्याच्या वस्तूंसाठीदेखील.
 
विजेरी (Torch Battery) - जास्तीच्या सेल्स, मेणबत्ती- काडेपेटी, (लिम्लेट गोळ्या नकोत; त्यामुळे तहान लागते म्हणून त्याऐवजी आवळा सुपारी खूप उपयोगी ठरते.) टाल्कम पावडर मोजे घालण्यापूर्वी पावलांना लावल्यामुळे घाम कमी येतो. सतत चालण्याने घाम येतो; उत्साही वाटावे म्हणून अंगाला लावण्यासाठी. एखादा छोटा टॉवेल उन्हापासून संरक्षणासाठी, मानेवर ठेवण्यासाठी व इतर अनेक उपयोगांसाठी आवश्यक. एक प्लॅस्टिकची बाटली पाणी पिण्यासाठी, पाणी साठविण्यासाठी, एक एनामलचा mug जेवताना पातळ पदार्थ घेण्यासाठी ते, जंगलात प्रातर्विधीला जाण्यासाठी उपयोगी ठरतो. रात्रीचा मुक्काम असल्यास शाल-पांघरूण, ऋतूनुसार गरम कपडे. गॉगल बर्फात तर अत्यंत आवश्यक. अन्यथा सूर्यकिरण बर्फावरून परावर्तित होऊन अंधत्व येण्याची शक्यता असते. एखादी शबनम इरस संपूर्ण Sack घेण्यापेक्षा जवळच्या जवळ जाण्यासाठी थोडे सामान ठेवण्यासाठी.
 
 
गुळाच्या पोळ्या, सुकामेवा, चिक्की हे सर्वच पदार्थ पोटभरीचे, टिकावू आणि पौष्टिक होत. किमान औषधे जुलाब, तापावरील गोळ्या, कैलास जीवनची एकच ट्यूब भाजणे, कापणे, डोळ्यांची किंवा अंगाची आग, किडा चावल्यास अशा सर्वांसाठी उपयुक्त ठरते. मूव्ह किंवा आयोडेक्स- पाय मुरगळणे, सूज इत्यादींसाठी. सेफ्टीपिन्स, Rubber Bands, मोज्यांचे दोन जोड, बुटांच्या नाड्यांचा एक्स्ट्रा जोड अत्यंत आवश्यक. ब्रश, पेस्ट, कंगवा, साबणवडी इत्यादी. डायरी, पेन. पैसे दोन ठिकाणी विखरून ठेवावेत. बर्फातील ट्रेकसाठी-लोकरीच्या मोज्यांसकटचे सर्व कपडे लोकरीचे असावेत. हिमालयात अनेकदा पाऊस पडतो त्यामुळे बरसाती म्हणजे आपल्यासकट संपूर्ण sack झाकण्यासाठीचा पातळ मोठा रेनकोट हवा. जमिनीवर अंथरण्यासाठी Mat तसेच थंडीपासून संरक्षणासाठी आणि निजण्यासाठी स्लीपिंग Bag.. थंडीत त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते.
 
 
थैली पुढीलप्रमाणे भरावी : सर्वप्रथम एक मोठी प्लॅस्टिकची पिशवी थैलीच्या आत घालावी. यामुळे आतील वस्तूंचे पावसाळ्यात, बर्फात तर संरक्षण होतेच; परंतु इतर वेळीही कधी पाण्याच्या प्रवाहातून जाण्याची वेळ आल्यास थैली भिजू शकते. अशावेळी आतमधल्या मोठ्या पिशवीचा नेहमीच उपयोग होतो. सर्वात शेवटी थैली भरून पूर्ण झाल्यानंतर या पिशवीचे तोंड दोरीने बंद करून, उरलेला भाग आत खोचून टाकावा. थैलीचा जो भाग पाठीशी टेकेल, त्याजागी मऊ कपडे, चादरी इत्यादी सर्व वेगवेगळ्या प्लस्टिक पिशव्यांमधून ठेवावे. सर्वात खाली, सतत न लागणार्‍या व फक्त मुक्कामाच्या ठिकाणीच पोहोचल्यावर लागणार्‍या वस्तू ठेवाव्यात. उदा. जास्तीचे कपडे, जास्तीचे खाण्याचे सामान, रबरी स्लीपर्स इत्यादी. थैलीच्या वरच्या बाजूला प्लेट, सर्वात वर नॅपकिन, Ruksack च्या साईडच्या कप्प्यांमध्ये पाण्याची बाटली, ग्लास, ब्रश, पेस्ट, टॉयलेट पेपर आणि टिशू पेपर इत्यादी प्रसाधनाच्या वस्तू ठेवाव्यात.sack च्या सर्वात वरच्या कप्प्यामध्ये म्हणजे फ्लापमध्ये (flap) पैसे, गॉगल, चष्मा इ. ठेवण्यामुळे वरचेवर पूर्ण थैली उघडावी लागत नाही. या वस्तू कमरेला बांधण्याच्या पाऊचमध्येही ठेवता येतात. त्यामुळे या नाजूक गोष्टींचे संरक्षण होते. थैलीचा खालचा भाग आणि थैलीचे साईडचे भाग हे चालताना दगडांवर आपटू शकतात. म्हणून या वस्तू वरच्या कप्प्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवाव्यात. अशाप्रकारे सर्व वस्तूंची रचना केल्यावर न कंटाळता थैलीचे सर्व पट्टे लावावेत. घरून निघण्यापूर्वीच थैलीचे पाठीवरचे पट्टे नीट अ‍ॅडजेस्ट केलेले असावेत. थैली पाठीवर नीट बसेल. कमरेवर ओघळलेली नको इतके हे मुख्य पट्टे घट्ट असावेत. कमरेवर लोंबकळणार्‍या अवस्थेतील थैलीमुळे पाठ व कंबर दुखण्याची शक्यता असते तसेच पाठीच्या अवस्थेवरही परिणाम होतो. प्रवास पूर्ण होईपर्यंत, म्हणजे घरी पोहोचेपर्यंत पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतले पाणी संपवू नये. अनेकदा ट्रेक संपलेला असला, तरी परतीच्या प्रवासात निर्जन ठिकाणी बस वा वाहन बंद पडू शकते. म्हणून बिस्किटे व पाण्याचा साठा शेवटपर्यंत शिल्लक राहू द्यावा.
 
 
Trekking ट्रेकिंगमध्ये पाय आणि बूट यांची सर्वात अधिक काळजी घ्यावी लागते. पाव सलामत तो ट्रेक पचास! ट्रेकच्या आधीच किमान आठ दिवस तरी नव्या बुटांचा आवर्जून सराव करावा. नवे बूट हमखास पायांना लागू शकतात. पायांना येणारे ब्लिस्टर्स म्हणजे पाण्याचे फोड, प्रत्यक्ष ट्रेकपूर्वी होऊन, ते बरे होऊन, ट्रेकसाठी आपण तंदुरुस्त झालेलो हवे. त्यावर चालण्याचाही सराव झालेला हवा तर मोठे ट्रेक आपण आनंदात करू शकतो. पाण्याचे फोड झाले तरी त्याला वरून केवळ कैलास जीवन लावण्यामुळे ते लवकरात लवकर बरे होतात.
 
 
आळस न करता बुटांच्या लेसेस प्रत्येक छिद्रांमधून घालून बूट पायांबरोबर अगदी फिट्ट बसलेले हवेत. बूट पायांचा हा एक अविभाज्य भाग बनण्याइतका त्यांचा साईज नेमका हवा. साईज मोठा वा सैल असेल तर चालताना पकड राहत नाही व पावलांना बूट घासून हमखास फोड येतात. बूट जास्त घट्ट असतील तर सलग जास्त वेळ चालणे अशक्य बनते. बुटांची निवड करतानाही हंटर्स या प्रकारचे किंवा ज्या बुटांच्या तळांना चांगली पकड असलेला खडबडीत पृष्ठभाग हवा. मोजे कॉटनचे असावेत. नायलॉन मोज्यांमुळे पायांना पुरळ (Rash) येणे, घाम शोषला न गेल्यामुळे पाय गरम होणे इ. त्रास संभवतात. पावलांना टॉल्कम पावडर लावून मोजे घालावेत. एखादी काठी बरोबर ठेवल्यास गर्द झाडीतून वाट काढण्यास, चिखल वा निसरडी वाट असेल तर काठी खाली जमिनीत घट्ट खोचून पुढचे पाऊल सुरक्षितपणे टाकण्यासाठी निश्चित उपयोगी ठरते. बर्फात चालताना, ice axe म्हणजे बर्फात वापरण्याची कुर्‍हाड वापरावी. सकाळी लवकर ट्रेकला प्रारंभ करणे, ही बाब आवर्जून लक्षात ठेवावी. बर्फात दुपारी 12 नंतर हवामान अचानक बदलते. त्यामुळे हिमवादळ, पाऊस इत्यादीत अडकण्याऐवजी वेळेत मुक्कामी पोहोचता येते. तीच बाब महाराष्ट्रातील गडांच्या बाबत. अनावश्यक धोके न पत्करता, सतत खुणावणार्‍या उंच उंच शिखरांवर भरपूर प्रयत्नांनंतर पोहोचल्यावर येणारी सार्थकता प्रचंड आनंद देऊन जाते. 
 
- 9881743061
(लेखिका एनएलपी ट्रेनर, समुपदेशक व मुक्त पत्रकार आहेत)