दोन ट्रकची धडक, तीन ठार, एक जखमी

- नागपूर-औरंगाबाद महामार्गावरची घटना

    दिनांक :05-Aug-2022
|
तभा वृत्तसेवा 
नांदगाव खंडेश्वर, 
नागपूर ते औरंगाबाद महामार्गावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिंगणापूर फाट्यावर दोन ट्रकची समोरासमोर धडक (Trucks collided) झाल्याने तीन जण ठार झाले, तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला. गुरूवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडला. किशोर मगना (25, रा. बदनेर, राजस्थान), प्रेम प्रकाश रुगाराम (30, रा. बदनेर, राजस्थान), सर्वेशकुमार झल्लासिंग (35, घनश्यामपूर, उत्तर प्रदेश ) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात कुलदीप सुरेश सिंग (24, कोशंबी, उत्तरप्रदेश ) हा गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याच्यावर नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
Trucks collided 
 
नागपूरहून औरंगाबादकडे जाणार्‍या आरजे 04/ जीसी 2258 क्रमांकाच्या ट्रकची विरूद्ध दिशेने येणार्‍या सीजी 04/एचझेड 8158 क्रमांकाच्या ट्रकला धडक बसली. रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते. शिंगणापूर फाट्यापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर हा अपघात घडला. एका ट्रमध्ये लोखंडी सळाखी होत्या. या सळाखी दोन्ही ट्रकमधील चालक आणि वाहकांच्या शरिरात शिरल्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. अमरावतीहून अग्निशमन विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने ट्रक एकमेकांपासून वेगळे करण्यात आले. या अपघातात दोन्ही ट्रक रस्त्यावर आडवे झाल्याने या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दहा ते बारा तासानंतर ट्रक बाजूला करून वाहतूक खुली करण्यात आली. महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.