पत्नीची हत्या, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

- चांदूर बाजार शहरातील खळबळजनक घटना

    दिनांक :05-Aug-2022
|
तभा वृत्तसेवा 
चांदूर बाजार, 
पत्नीचा खून (Wife's murder) करून स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र पोलिस वेळेवर घटनास्थळी पोहोचल्यामुळे पतीचा जीव वाचला. ही घटना चांदूर बाजार येथील महात्मा फुले कॉलनीमध्ये घडली.
 
Wife's murder 
 
40 वर्षीय मृतक पत्नीचे नाव श्रुतिका सतीश उर्फ किशोर काळपाडे असून 45 वर्षीय आरोपी सतीश उर्फ किशोर काळपाडे रा. कोल्हा काकडा याने तिच्या अंगावर चाकूने वार केले. यात पत्नी श्रुतिका जागेवरच ठार झाली. त्यानंतर सतीशने सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस वेळेवर घटनास्थळी पोहचल्याने घराचे दार पोलिसांनी तोडून सतीशला वाचविले व सतीशला ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल केले.
 
 
मृतक श्रुतिका चांदूर बाजार येथील खाजगी संस्थेत नोकरी करीत होती. त्यामुळे चांदूर बाजार येथील महात्मा फुले कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात हे दोघे व त्यांचा एक मुलगा राहात होते. या दोघांमध्ये कधी कधी भांडणे होत असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास पती-पत्नीमध्ये वाद होऊन जेवण चालू असताना पतीने पत्नीच्या पोटामध्ये घरातील चाकूने सपासप वार केले. त्यामुळे पत्नी रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली व तिचा जागीच मृत्यू झाला. हे पाहून पतीने देखील दुपट्ट्याने गळफास घेतला. मात्र पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व दरवाजा तोडून सतीशचा गळफास कापून त्याचा जीव वाचविला.