सामान्यांचे घर, वाहनाचे स्वप्न महागणार

    दिनांक :05-Aug-2022
|
- रिझर्व्ह बँकेने केली व्याज दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ
 
मुंबई, 
भारतीय रिझर्व्ह बँकेने आज शुक्रवारी प्रमुख कर्जांवरील व्याजदरात 50 बेसिस पॉईंटने वाढ जाहीर केली. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाला मजबूत करण्यासाठी आणि inflation महागाईला नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे घर आणि वाहन घेण्याचे स्वप्न महागणार आहे. शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय पतधोरण आढावा समितीची तीन दिवसांपासून सुरू असलेली बैठक आज संपली.
 
 
House
 
बैठकीनंतर आयोजित पत्रपरिषदेत दास म्हणाले की, या निर्णयामुळे आता रेपो दर 5.40 टक्क्यांवर गेला आहे. यापूर्वी कोरोनापूर्व काळात म्हणजे ऑगस्ट 2019 मध्ये हा दर देशात पाहायला मिळाला होता. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याने गृह कर्ज, शैक्षणिक, वैयक्तिक आणि कारचे कर्ज महागणार आहे. आधीच inflation महागाईचा सामना करीत असलेल्या सर्वसामान्यांवरील भार आता आणखी वाढणार आहे. व्याज दर वाढवल्याने बाजारातील खरेदीवर नियंत्रण येते. परिणामी मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त झालेले प्रमाण काही प्रमाणात संतुलित होते. त्यामुळे महागाईला आळा बसण्यास मदत होते.
 
 
याआधी रिझर्व्ह बँकेने मे महिन्यात रेपो दरात 40 बेसिस पॉईंटची वाढ केली होती. त्यानंतर रेपो दर 4.40 टक्के झाला. त्यानंतर 8 जून रोजी रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी रेपो दर 4.90 टक्के झाला. म्हणजे, रिझर्व्ह बँकेने सलग दोन वेळा 90 बेसिस पॉईंटची वाढ केली. आता त्यात आणखी 50 बेसिस पॉईंटची भर पडली आहे.
जीडीपी दर 7.2 टक्के राहणार
वर्ष 2022-23 मध्ये भारताचा जीडीपी दर 7.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. सध्या जागतिकीकरण आणि जागतिक अर्थव्यवस्थांवर मोठा दबाव असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही होत आहे, असे सांगताना दास यांनी, देशातील inflation महागाईच्या मुद्यावर चिंता कायम असल्याचे सांगितले.
महागाईचा दर 6.7 टक्के अपेक्षित
मान्सून सामान्य राहिल्यास आणि कच्च्या तेलाच्या किमती 105 डॉलर्स प्रती बॅरेल राहिल्यास चालू आर्थिक वर्षात inflation महागाईचा दर 6.7 टक्के राहण्याचा अंदाज आहे. सध्या महागाई कमी होताना दिसत आहे. मान्सून सामान्यापेक्षा चांगला होत आहे. त्याचे परिणामही दिसत आहेत. मात्र, पुराचा फटका बसल्यास महागाईत वाढ होण्याची शक्यता दास यांनी वर्तवली. येत्या काही दिवसात खाद्य तेलाच्या किमती कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठळक वैशिष्ट्ये
- सलग तिसर्‍या आढावा बैठकीत रेपो दरात वाढ
- मे पासून आतापर्यंत 140 बेसिस पॉईंट्स वाढविले
- आर्थिक विकासाचा दर 7.2 टक्के राहण्याची शक्यता
- महागाईचा दर 7.1 टक्के राहण्याचा अंदाज
- देशाचे आर्थिक क्षेत्र मजबूत
- पुढील आढावा बैठक 28 सप्टेंबरसपासून