व्यसनमुक्तीसाठी कार्यप्रवण व्रतस्थ

    दिनांक :06-Aug-2022
|
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
साने गुरुजींनी इंग्रजांशी आपल्या पातळीवर लढा देताना शांतीमय बंडखोरीचा मार्ग अवलंबिला. त्यांच्या नंतरही त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रसेवा दलात तेच संस्कार केले जातात. आजही आयुष्यात येणार्‍या प्रत्येक संघर्षाप्रसंगी हे संस्कारच मदतीस येतात. कारण इंग्रजांची जागा आता नतद्रष्ट समाजव्यवस्थेने घेतली आहे. पावलोपावली दैनंदिन जीवनात अनेक दुष्कर प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळी असेच संस्कार लाभलेल्या वर्षा विद्या विलास यांचे Addiction व्यसनमुक्तीच्या कार्यासह विविध कार्यातून खरोखर सामाजिक दायित्व म्हणजे काय याची प्रचीती करून देणारे आहे. वर्षाताईंनी वयाच्या आठव्या वर्षांपासून या सेवाकार्यात वाहून घेतलं आहे. समाजामध्ये अनेक गोष्टींच्या बाबतीतील मिथके आहेत.
 
 
vidha
 
या मिथकांवर जो तो आपापले विचार घासत असतो; पण ही मिथकेच जर दूर केली तर समाज बर्‍यापैकी सुदृढ होऊ शकतो. हा विचार करूनच वर्षाजींनी शाळा-महाविद्यालयात असताना सामाजिक विषयांवरचे, राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणारे सांस्कृतिक कार्यक्रम राबवले. नृत्य, नाटक, गाणी, पथनाट्य यातून आपले विचार मांडले. 1994 ला उसळलेल्या दंगलीमध्ये मुंबईतील तुलसीवाडी दंगलखोरांच्या भक्ष्यस्थानी पडली. इथल्या लोकांच्या पुनर्वसनाच्या कामात वर्षाताईंनी दीड वर्ष मेहनत घेतली. हे सर्व समाजकार्य करीत असताना, पुढे चालून वर्षाताईंनी ‘दिशा फाऊंडेशन’ नावाची स्वतःची संस्था काढली. प्रगतिशील विचारांवर काम करणार्‍या विविध क्षेत्रांतील महिलांना एकत्र आणून उभारलेली ही संस्था होय. यात मोलाचा वाटा वर्षाताईंचा आहे. या संस्थेंतर्गत घरकाम करणार्‍या महिला, मोलमजुरी करणार्‍या महिला व पीडित महिलांना संघटित करून त्यांच्या मुलींसाठी स्ट्रिट स्कूल व आधार केंद्र चालविणे, महिला व मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे, सामाजिक व महिला कायदे माहिती करून देण्याच्या उद्देशाने Addiction शिबिर व कार्यक्रम राबविणे अशा पद्धतीचे उपक्रम राबविले गेले.
 
 
वेळोवेळी समाजात निर्माण होत असलेल्या प्रश्नांवर सरकार दरबारी दाद मागत आहेत. यामध्ये डान्सबार विरोधी मंचाद्वारे त्यांनी सर्वसामान्य जनतेला आणि विशेष करून तरुण वर्गाला डान्सच्या नावाखाली होत असलेल्या महिलांच्या शोषणावर जागृत करून आंदोलन चालवले. बारबालांच्या स्वावलंबनासाठी प्रकल्प सरकारसमोर ठेवला. अश्लीलता विरोधी मंचद्वारे प्रसार माध्यमांमध्ये दाखवल्या जाणार्‍या अश्लील जाहिराती, कार्यक्रमांविरोधात अभियान चालवले. यामध्ये मोर्चे, सभा, प्रश्नावली, सह्यांची मोहीम, धरणे आंदोलन, सेमिनार अशा माध्यमांचा समावेश होता.
 
 
समाजात मानवी मूल्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील राहणे व त्यासाठी स्वत: संस्था, संघटना स्थापन करून व इतर संस्थांच्या सहकार्याने आपल्या कार्याचा उद्देश पूर्ण होण्यासाठी मार्गक्रमण करीत असताना, महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ या सरकारी संस्थेच्या वर्षाताई सचिव झाल्या. याद्वारे नशाबंदी परिषदेचे आयोजन त्यांनी केले. वेगवेगळ्या विभागांत Addiction नशाबंदी केंद्रही त्या स्वत: चालवत आहेत आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. सरकारी आणि गैरसरकारी संस्थांचे सहकार्यदेखील त्यांना लाभते. दारू आणि अन्य प्रकारच्या नशायुक्त पदार्थांच्या सेवनाने त्रस्त लोकांना मुक्त करण्याचा वसा वर्षाताईंनी उचलला आहे. वस्ती, झोपडपट्टी स्तरावर तसेच विविध विभागांत व्यसनमुक्ती केंद्र चालविण्यास मार्गदर्शन, विविध स्पर्धा उदा. वक्तृत्व स्पर्धा, कवी संमेलन, पथनाट्य, शिबिरे आदींचे आयोजन, अन्नधान्यापासून दारूनिर्मिती धोरण विरोधी मंचाचे नेतृत्व व मुंबईत आंदोलन उभे केले, शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये व तंबाखूजन्य पदार्थ विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिका शिक्षण समिती, शिक्षणाधिकार्‍यांसोबत विशेष मोहीम राबवून रोक लावण्यासाठी प्रयत्न चालविले. यात त्यांना बर्‍यापैकी यश मिळाले आहे.
 
 
केंद्र शासनाचा उपक्रम म्हणून बालकामगारांसाठी डोंबिवलीत झोपडपट्टीत विशेष शाळा चालविली. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी समीप किड्स क्लबची स्थापना तसेच उमंग-प्रोजेक्ट राबविला. त्यांच्या या विविध क्षेत्रांतील कार्याची तर दखल सर्वत्र घेतली जात आहेच; मात्र या नशामुक्ती किंवा व्यसनमुक्ती अभियानाची, कार्याची दखल थेट भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. 2018 मध्ये भारत सरकारच्या राष्ट्रीय Addiction व्यसनमुक्ती सेवा क्षेत्रासाठी राष्ट्रपती पुरस्काराने आणि 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाने शाहू, फुले, आंबेडकर पुरस्काराने वर्षाताईंना सन्मानित केले आहे. तर, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, नरोत्तम सकसेरिया फाऊंडेशन सामाजिक कार्यकर्ता तंबाखू, व्यसनमुक्ती पुरस्कारासारखे तर अनेक पुरस्कार वर्षाताईंना मिळाले आहेत.
 
 
तसे व्रतवैकल्य करणार्‍या व्यक्तीला व्रतस्थ म्हणतात. मात्र, स्वामी विवेकानंदांचे मते आपले कार्य अखंड आणि अव्याहत, अथकपणे करतो त्याला व्रतस्थ म्हणावे. व्रतस्थास कोणतीही जात, पात, धर्म, पंथ, लिंग वा कोणत्याही भेदभावाचे बंधन नसते. विविध क्षेत्रांत लागलेले अनेक शोध, झालेली प्रगती, उभी राहिलेली मोठमोठी सामाजिक कामे या सगळ्यांच्या मुळाशी असाच व्रतस्थपणा असतो. वर्षाताईंच्या या व्रतस्थपणातदेखील असाच ध्येयवेडेपणा दिसतो. एका विशिष्ट ध्येयाने पछाडलेल्या Addiction व्यसनमुक्तीसाठी कार्यप्रवण व्रतस्थ वर्षाताई या केवळ एक विषय घेऊन पुढे जात नाहीत तर, त्यांच्या समोर येईल त्या विषयावर त्या समस्येवर तोडगा किंवा त्याचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असतात. त्यांच्या या उचललेल्या समाजसेवेच्या कार्यास अनेकानेक शुभेच्छा... 
 
-9270333886