असा होता ‘गजोधर भैय्या’ यांचा जीवन प्रवास

मुंबईत चालवली होती रिक्षा

    दिनांक :21-Sep-2022
|
मुंबई, 
राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. या क्षेत्रात काम करण्यासाठी ते मुंबईत आले. सुरुवातीला बराच संघर्ष करावा लागला. त्यांना येथे रिक्षाही चालवावी लागली होती. राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी उत्तरप्रदेशातील कानपूर येथे झाला होता. त्यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हे प्रसिद्ध कवी होते. लहानपणापासूनच राजू श्रीवास्तव यांना मिमिक्रीची आवड होती. शाळेतील शिक्षकांची तसेच विविध सेलिब्रिटींची मिमिक्री राजू करायचे. 1988 मध्ये राजू मुंबईत आले. पण, मुंबईमध्ये त्यांना स्ट्रगल करावा लागला.
 
Raju Srivastava
 
एका मुलाखतीमध्ये (Raju Srivastava) राजू यांनी सांगितलं होतं की, मुंबईमध्ये ते रिक्षा चालवत होते. रिक्षातील प्रवाशांचे ते मिमिक्री करून मनोरंजन करायचे. वाढदिवसाच्या पार्ट्यांमध्येही ते स्टँडअप कॉमेडी करायचे. या शोसाठी ते 50 रुपये मानधन घेत होते. त्यानंतर काही वर्षांनी विविध स्टेज शोमधून राजू हे प्रेक्षकांच्या भेटीस आले. 1993 मध्ये राजू आणि शिखा यांचे लग्न झाले. त्यांना मुलगी अंतरा आणि मुलगा आयुष्मान ही दोन मुलं आहेत.
 
 
राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांनी अनेक चित्रपट आणि कार्यक्रमांमध्ये काम केले. सलमान खानच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील त्यांच्या विनोदी अभिनयाने अनेकांची मने जिंकली. ‘बिग बॉस 3’, ‘नच बलिए’ आणि ’कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या कार्यक्रमामध्येही राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी कारकिर्दीची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केले. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळाली. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. ‘द किंग ऑफ कॉमेडी’ असेही राजू श्रीवास्तव यांना म्हणले जाते. त्यांच्या ‘गजोधर भैय्या’ या पात्राला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. विविध सेलिक्रिटींची मिमिक्री राजू श्रीवास्तव करायचेे.
श्रीवास्तव कुटुंबात कोण कोण आहे?
राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबाबद्दल फारच थोड्या लोकांना माहिती आहे. राजू यांच्या पत्नीचे नाव शिखा असून त्या गृहिणी आहेत. राजू आणि शिखा यांना दोन अपत्ये आहेत. राजूची मुलगी अंतरा सहायक दिग्दर्शक आहे. त्यांचा मुलगा आयुष्मान हा सतारवादक आहे. त्याने ‘बुक माय शो’च्या नई उडान या शोमध्ये काम केले आहे. राजू यांना पाच भाऊ आणि एक बहीण आहे. राजू आपले कौटुंबिक जीवन नेहमीच खाजगी ठेवत असे. फारच कमी वेळा त्यांनी समाज माध्यमांवर कुटुंबासोबतचे फोटो टाकले आहेत. ते आपल्या दोन्ही मुलांच्या खूप जवळ होते. राजू यांची कन्या अंतरा अतिशय धाडसी असून तिला राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते शौर्य पुरस्काराने 2006 मध्ये गौरविण्यात आले होते. ती आणि आई घरात एकट्याच असताना चोर शिरले होते आणि बारा वर्षांच्या अंतराने त्यांना पकडून देत आईचा तसेच स्वत:चा जीव वाचवला होता.
शेवटचे स्वप्न राहिले अपूर्णच...
राजू यांचे स्वप्न होते की उत्तरप्रदेश, बिहार या प्रांतातील कलाकारांना चित्रपटसृष्टीत नाव कमावण्यासाठी मुंबईत येण्याची गरज भासू नये. त्याच्यासाठी नोएडामध्ये उभारण्यात येणारी फिल्मसिटी उपाय ठरणार होती. त्यामुळे ते नोएडा फिल्म सिटीचे स्वप्न पाहत होते. ते उत्तरप्रदेश फिल्म डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्षही होते. आता त्यांचे फिल्म सिटीचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.
 
लोकांना हसवून कमावली कोट्यवधींची संपत्ती
राजू श्रीवास्तव यांनी रंगमंचापासून आणि चित्रपटांमध्ये कॉमेडी करून नाव, प्रसिद्धी आणि करोडोंची संपत्ती कमावली आहे. ते एका स्टेज शोसाठी 4 ते 5 लाख रुपये घेत होते. जाहिरात, होस्टिंग आणि चित्रपटातूनही त्यांनी भरपूर कमाई केली. प्राप्त माहितीनुसार, राजू सुमारे 15 ते 20 कोटींच्या मालमत्तेचे मालक होते. त्यांचे कार कलेक्शन फार मोठे नाही पण त्यांच्याकडे चांगल्या आणि आलिशान कार आहेत. त्यात इनोव्हा, बीएमडब्ल्यूसार‘या महागड्या वाहनांचा समावेश आहे. कानपूरमध्ये त्यांचे एक आलिशान घर आहे.