एटीएसच्या मदतीने महाराष्ट्रातही छापेमारीचा धडाका

    दिनांक :22-Sep-2022
|
- मुंबईपासून मालेगावपर्यंत कारवाई
 
मुंबई,
पीएफआयच्या देशभरातील ठिकाणांवर आज झालेल्या कारवाईदरम्यान महाराष्ट्रात ATS team एटीएसच्या मदतीने एनआयए आणि ईडीने छापेमारीचा धडाका लावला. राज्यात मुंबईसह, पुणे, मालेगाव, औरंगाबाद, नाशिक व इतर ठिकाणी कारवाई करण्यात आली. ‘पीएफआय’च्या कार्यालयांची सध्या ईडी आणि एनआयएकडून झाडाझडती सुरू आहे. नवी मुंबईच्या नेरूळ परिसरात सेक्टर-23 मधील दारावे गावात पीआयएफच्या कार्यालयावर छापेमारी करण्यात आली. ही कारवाई सहा तासांपासून जास्त वेळ सुरू होती.
 
 
ATS team
 
पुण्यातील कोंढवा येथील कौसरबाग येथे पीएफआयच्या मुख्य कार्यालयावर आज सकाळपासून एनआयएची छापेमारी सुरू आहे. पीएफआयसंदर्भात पुण्यात चार ठिकाणी छापेमारी सुरू आहे. पीएफआयचा नेता रझी अहमद खानच्या कोंढव्यातील घरावर कारवाई सुरू आहे. कोंढवा येथील कौसरबाग मशिदीजवळील कोंढवा येथील पीएफआयचे राज्य कार्यालय आहे. या कार्यालयावर ही छापेमारी करण्यात आली. छापा टाकून काही वस्तू जप्त करण्यात आल्या. पीएफआयच्या दोन माजी सदस्यांना अटक केली. कयूम शेख आणि रजी अहमद खान अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कोल्हापुरात पहाटेपासूनच ही छापेमारी सुरू होती. मात्र, याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. कुठे आणि कुणावर छापेमारी झाली, याची माहिती मिळू शकली नाही. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक ठाणे, नवी मुंबईत एटीएसच्या पथकाकडून कारवाई सुरू होती.
 
 
नाशिकमध्ये एक ताब्यात
एनआयएच्या पथकाने मालेगावमध्ये कारवाई केली आहे. या छापेमारीत पीएफआय संघटनेचा सदस्य सैफुरेहमान याला मालेगावच्या हुडको परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. सैफु रेहमान हा पीएफआयचा जिल्हाध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे. सैफुरेहमानला ताब्यात घेतल्यानंतर त्यास तपासणीसाठी नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. तपासणी झाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन हे पथक रवाना झाले आहे. दरम्यान सैफुरेहमान याच्यावर काही गुन्हे दाखल आहे का, याचाही तपास पोलिस प्रशासनासह एनआयएचे पथक करीत आहे.
 
 
जळगावमध्ये एकाला अटक, संशियत जालन्याचा
अकोल्यातील ATS team एटीएसच्या पथकाने जालना येथील अब्दुल हादी रौफ याला आज जळगावतील मेहरून परिसरातून अटक केली आहे. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे. अकोला एटीसने आज सकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मेहरून परिसर, जळगाव येथून तीन जणांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर दोन जणांना सोडून देण्यात आले तर, एकाला अटक करण्यात आली. त्याबाबतची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मुंबई येथे दाखल असलेल्या एका गुन्ह्यात ही अटक केल्याची माहिती जळगाव पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, जळगावमधून टी. एस. रौफला ताब्यात घेतले आहे. अब्दुल हादी अब्दुल रौफ हा अनेक वर्षांपासून पीएफआयचे काम करतो. रौफ हा मूळचा जालन्यातील नेर सेवलीतील रहिवासी असून, तो संघटनेच्या जालन्यातील समाज माध्यमाचे काम पाहत असल्याची माहिती समोर येत आहे. जालना येथील अब्दुल हादी अब्दुल रौफ पीएएफआयच्या जालना शाखेचा खजिनदार तसेच संघटनेच्या समाज माध्यमाचे काम पाहतो.
 
 
औरंगाबदेत चौघांना घेतले ताब्यात
पीएफआयशी संबंधित असलेल्या चार जणांना औरंगाबदेतून ATS team एटीएसच्या पथकाने आज पहाटे चार वाजताच्या सुमारास विविध भागांतून ताब्यात घेतले. त्यातील एकाची 15 दिवसांपूर्वी पथकाने तब्यात घेत चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबादसह पुणे आणि मुंबईच्या पथकांनी ही संयुक्त कारवाई केल्याचे समोर आले आहे. चार जणांपैकी सय्यद फैसल आणि इम‘ान मिल्ली अशी दोघांची नावे असल्याचे सूत्रांनी सांगितले. सय्यद फैसल हा संघटनेचे काम करायचा. मात्र, काही दिवसांपासून त्याने हे काम सोडले होते. तो झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करीत होता. मिल्ली हा देखील पीएफआयशी संबंधित आहे. तब्यात घेतलेल्या चार जणांपैकी एकाला इतर जिल्ह्यातून तब्यात घेतले असल्याचे कळते. या चौघांची औरंगाबदेत चौकशी सुरू आहे.
 
 
परभणीमध्ये चौघांना, नांदेडमधून मु‘य सचिव ताब्यात
पीएफआयशी संबंधित चार जणांना परभणीतून ATS team एटीएसच्या नांदेड येथील पथकाने आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास विविध भागांतून तब्यात घेतले. पोलिस प्रशासनाकडून या कारवाईबाबत गुप्तता पाळण्यात येत असल्याने संबंधितांची नावे समजू शकलेली नाहीत. एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतलेल्यांना नांदेडला नेले. परभणीत आपना कॉर्नर भागात पथकाने छापा टाकून पीएफआयशी संबंधित तिघांना तब्यात घेतले आहे. यासह परभणी शहरातील दुसर्‍या एका ठिकाणावरून संघटनेशी संबंधित असलेल्या एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्यांची नावे समजू शकली नाहीत. परभणीतून ताब्यात घेतलेल्या संशयितांना नांदेड येथील न्यायालयामध्ये हाजर केले जाण्याची शक्यता आहे. नांदेडमध्येही एटीएस पथकाने कारवाई केली आहे. पीएफआयचा मुख्य सचिव मिराज अन्सारीला ताब्यात घेतले.