उद्धव ठाकरे यांनी एक तरी मर्दासारखे काम केलेय का?

    दिनांक :22-Sep-2022
|
- हा जगातील सर्वात ‘ढ’ माणूस
- नारायण राणे यांचा हल्लाबोल
 
मुंबई, 
उद्धव ठाकरे नेहमी आपल्या भाषणात ‘मी मर्द आहे’, ‘मी मर्द आहे’ असे म्हणत असतात. पण त्यांनी एक तरी मर्दासारखे काम केले आहे का? सगळी कामे दुसर्‍याकडून करून घेता, उद्धव ठाकरे हा जगातील सर्वात ‘ढ’ माणूस आहे, असा जबरदस्त हल्लाबोल केंद्रीय मंत्री Narayan Rane नारायण राणे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुखांवर केला. येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. ठाकरे यांनी बुधवारी भाजपा आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर प्रखर टीका केली होती. या टीकेचा खरपूस समाचार घेताना राणे यांनी उद्धव यांच्यावर चौफेर टीका केली.
 
 
Narayan Rane
 
राणे म्हणाले, केंद्र सरकार नेहमीच मुंबईला मदत करते. यांना काही माहीत नाही, कधी वाचत नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास यांनी कधी वाचला नाही. केंद्र सरकारने मुंबईसाठी काय दिले, हे यांना कसे कळणार? हा किती वेळ बोलतो मी मर्द आहे, एकदा तपासावेच लागेल, अशा शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढविला. उद्धव ठाकरे चार खासदार, दहा आमदार निवडून आणू शकत नाही. संजय राऊतांसह उद्धव ठाकरेदेखील आत (तुरुंगात) जाणार असा गर्भित इशाराही Narayan Rane नारायण राणे यांनी दिला. याला आदिलशाह आणि अमित शाह यातील फरक कळत नाही? ते लोक आपल्यावर चालून आले. गृहमंत्री आपल्या देशाचे आहेत. त्यांना गिधाड संबोधताना लाज वाटली नाही का? पण लांडगा उपकाराची जाणीव ठेवत नाही, असा घणाघात राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला.
 
 
‘बाप पळवणारी टोळी आलीय’ अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. या टीकेलाही राणेंनी खरमरीत उत्तर दिले. एकनाथ शिंदे आणि त्यांसह गेलेले 40 आमदार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढतात. साहेब सन्मान करायचे असे ते सांगतात. मात्र उद्धव ठाकरेंनी पैशासाठी, सत्तेसाठी हिंदुत्वाशी गद्दारी केली, असा घणाघात Narayan Rane नारायण राणे यांनी केला. उद्धव यांनी मुंबई महापालिका धुतली, मुंबईतील नागरिकांचे शोषण केले, टक्केवारीसाठी मुंबई बकाल केली, असे आरोपही राणेंनी केले. उद्धव यांना हातात तलवार तरी धरता येते का? त्यांनी आयुष्यात तलवार कधी पकडली आहे का? भेट मिळालेली तलवार तरी कधी तरी उघडून पाहिली आहे का? दंगलींमध्ये कधी तलवार घेऊन बाहेर पडला का? अशा एकामागून एक टोकदार प्रश्नांची सरबत्ती राणे यांनी केली. उद्धव ठाकरे कोथळा काढणार अशी भाषा करत आहेत. कुणाच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र फिरून दाखवाच, अशा इशाराही राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला.