सचिन पायलटांना रोखण्यासाठी गहलोतांनी कंबर कसली

    दिनांक :23-Sep-2022
|
- मुख्यमंत्रिपदी मर्जीतल्या नेत्याला आणण्याची योजना
 
नवी दिल्ली, 
राजस्थानचे मुख्यमंत्री Ashok Gehlot अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. या पदावर निवडून आल्यास त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. अशा स्थितीत सचिन पायलट मुख्यमंत्री होणार नाही, याची पुरेपूर काळजी गहलोत घेत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. या शर्यतीत अशोक गहलोत आणि शशी थरूर यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. गहलोत यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असली, तरी राजस्थानबद्दलचा त्यांचा मोह सुटत नाही. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. गहलोत यांनी त्यांच्या जागी सोनिया गांधी यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्ष सी. पी. जोशी यांचे नाव सुचविल्याची चर्चा आहे. याशिवाय, त्यांच्याकडे अशी अनेक नावे आहेत, ज्यामुळे ते पायलट यांचा पत्ता कट करू शकतात.
 
 
Sachin Pilot - Ashok Gehlot
 
मुख्यमंत्रिपदासाठी रघु शर्मा आणि बी. डी. कल्ला यांच्या नावांचीही चर्चा आहे. शिवाय, गहलोत गटातील प्रभावशाली नेत्यांपैकी आहेत. शांतीलाल धारीवाल यांचेही नाव चर्चेत आहे. धारीवाल हे Ashok Gehlot अशोक गेहलोत यांच्या जवळचे असून, प्रभावशाली नेते आहेत. धारीवाल यांची राज्याच्या राजकारणात चांगली पकड आहे. परसादी लाल मीणा यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे, राजस्थानमध्ये 13 टक्के लोकसं‘या असलेला अनुसूचित जातीचा समाज हा दलितांनंतरचा दुसरा सर्वांत मोठा मतदार आहे. या प्रवर्गात सर्वाधिक संख्या ही मीणा बिरादरींची असून, ती राज्यात 7 टक्के आहे. अशा स्थितीत सामाजिक समतोल जपत अशोक गहलोत परसादी लाल मीना यांच्या नावाचाही प्रस्ताव देऊ शकतात. हायकमांडलाही यावर आक्षेप नसेल. याशिवाय सचिन पायलट गटही त्यांना विरोध करू शकणार नाही. कारण, तसे केल्यास या समाजात नाराजी निर्माण होण्याचा धोका आहे.